श्रद्धाचे सगळेच व्हिडियो जबरदस्त व्हायरल होत असून टिकटॉकवर तिला अवघ्या २७ दिवसांत १ मिलियन व्ह्युवर्स मिळाले होते. अगदी सहज गंमत म्हणून श्रद्धा टिकटॉकवर तिचे व्हिडियोज टाकत होती. कधी माझे व्हिडियोज व्हायरल होत गेले आणि कधी मी एवढी फेमस झाले, हे माझं मलाच कळलं नाही, असं श्रद्धा अगदी निरागसपणे सांगते आहे. श्रद्धाच्या व्हिडियोज एवढीच चर्चा तिच्या लुक्सची पण होत आहे. समोरच्या साईडने रसना कट केलेली श्रद्धा अगदी एखाद्या बाहुलीसारखीच दिसते. म्हणूनच तर तिच्या चाहत्यांनी तिला महाराष्ट्राची डॉल हे नाव दिले आहे. तिच्या या प्रवासाविषयी श्रद्धाने मारलेल्या या दिलखुलास गप्पा.
कशी झाली व्हिडियोज बनविण्याची सुरुवात?लॉकडाऊन लागल्यावर आता काय करायचे? हा सगळ्या जगाला पडलेला प्रश्न श्रद्धालाही पडला होता. टिकटॉकवर व्हिडियो बघण्याची तिला आवड होतीच. म्हणून मग आता वेळ आहे, तर आपणही असेच व्हिडियो बनवूया असे म्हणत श्रद्धाने सुरुवात केली. पण व्हिडियो बनविण्यासाठी तेव्हा श्रद्धाकडे मोबाईल नव्हता. मग मोठ्या भावाकडे श्रद्धाने हट्ट धरला आणि दिवसभरात थोडा वेळ त्याचा मोबाईल वापरण्याची परवानगी घेतली. सुरुवातीला तिच्या व्हिडियोला ७- ८ हजार व्ह्यूज मिळायचे. ते पाहूनही श्रद्धा प्रचंड खुष व्हायची.
इथून झाली खरी सुरुवातआपले व्हिडियो लोक बघत आहेत, त्यांना ते आवडत आहेत, हे बघून श्रद्धा खुश होत होती. अशातच मागच्या वर्षी १४ एप्रिलला तिने एक व्हिडियो बनवला आणि तो जबरदस्त व्हायरल झाला. यानंतर लगेचच पुढच्या एक- दोन दिवसात तिने 'पाया मैने पाया, तुम्हे रबने बनाया..' आणि 'गोमू माहेरला जाते हो नाखवा...' असे दोन व्हिडियो बनविले आणि ते ही सोशल मिडियावर तुफान चालले.
अवघ्या तीन- चार दिवसांतच तिच्या व्हिडियोंना प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या. तिचा व्हिडियो आपण कुणाच्या तरी स्टेटसवर पाहिला आहे, असे भावांना आणि आई- वडिलांना फोन यायला सुरूवात झाली आणि तिथून श्रद्धाच्या लोकप्रियतेची गाडी भरधाव वेगाने धावू लागली. मग तिने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरही अकाऊंट सुरू केले. तेथेही तिचे फॉलोवर्स जबरदस्त वाढले.
व्हिडियो बनविण्याची अफलातून आयडिया..एखाद्या गाण्याच्या ओळींवर श्रद्धाने ॲक्टींग आणि लिप मुव्हमेंट केलेल्या असतात. अशा प्रकारचे १५ सेकंद ते ५ मिनिटांचे तिचे व्हिडियो असतात. शुटिंग करण्यासाठी तिच्याकडे सुरूवातीला कोणतेही साधन नसायचे. मग गॅलरीत उन आलं की ती पिठाचा डबा गॅलरीत ठेवायची. त्या डब्यावर एक इस्त्री ठेवायची आणि त्याचा उपयोग मोबाईल स्टॅण्डसारखा करायची. तरीही तिचे व्हिडियोज एवढे प्रोफेशनल वाटायचे की हे व्हिडियो कसे बनवले, हे तिला तिचे चाहते विचारायचे...
अवघे आयुष्यच बदललेश्रद्धा म्हणते बाजारात, हॉटेलमध्ये गेल्यावर आता मला तिथे माझे फॅन्स भेटतात. मी दिसताच माझा व्हिडियो लावतात. फोटो घेतात. खूप मजा येते. ज्या आयुष्याचा कधी विचारच केला नव्हता, आज ते आयुष्य मी जगत आहे. मला कधीच वाटले नव्हते की माझ्याबाबतीत कधी असंही होईल. आपल्या लेकीच्या या प्रसिद्धीमुळे श्रद्धाचे आई- वडिल आणि दोन्ही भाऊही खूप आनंदी आहेत. श्रद्धा रोज रात्री ११ वाजता व्हिडियो टाकते, हे आता तिच्या चाहत्यांना माहिती आहे. तिचा व्हिडियो येताच लगेचच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो. हे सगळं खूप खूप छान आहे, असं श्रद्धा अतिशय आनंदी होऊन सांगते. श्रद्धाला डान्सची खूप आवड असून ती लावणी डान्सर आहे. आता डान्स व्हिडियो पण लवकरच सुरू करणार असल्याचे श्रद्धाने सांगितले.