कलेच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच नवनवीन, सुंदर, अद्भूत, कल्पक गोष्टी पाहायला मिळतात. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू हा ट्रेंड लोकप्रिय असला तर फार कमी लोक टाकाऊ वस्तुंपासून काहीतरी टिकाऊ करण्याचा प्रयत्न करतात. अशाच एक कौतुकास्पद प्रयत्न हा पूनम शाह (३७) यांनी केला आहे. कलाविश्वातील त्यांचा हा प्रवास त्यांच्या कुतूहलातून सुरू झाला. मुलीच्या बालपणीतील गोड आठवणींशी त्या जोडल्या गेल्या. त्यांची आवड आता एका छानशा, हटके व्यवसायात रुपांतरीत झाली आहे.
पूनम जुन्या खेळण्यांचं अनोख्या रेझिन आर्ट फर्निचरमध्ये रूपांतर करतात. प्रत्येक वस्तूची एक गोष्ट असते, आठवणी असतात. काही वस्तू या मनाच्या खूप जवळ असतात. त्यामुळे त्या कामाकडे फक्त काम म्हणून पाहत नाहीत. पूनम यांचा जन्म मुंबईत झाला. यूकेमधून मास्टर डिग्री पूर्ण केल्यानंतर काही वर्षे डेलॉइटमध्ये काम केलं. लग्न झाल्यानंतर त्या फिलाडेल्फियाला गेल्या. त्यावेळी परिस्थिती बदलली. सहा वर्षांच्या वास्तव्यादरम्यान त्यांना पहिल्यांदा रेझिन कलेबाबत माहिती मिळाली.
"त्यामध्ये काहीतरी असं होतं ज्याने माझं लक्ष वेधून घेतलं आणि मी त्याकडे आकर्षित झाले. माझ्यासाठी रचनात्मकतेचं एक नवीन जग उघडलं असं वाटलं आणि मला ही कला अधिक एक्सप्लोर करायची होती. माझी आई कलात्मक होती. त्यामुळे मलाही कलेची आवड होती. पण त्यावेळी भारतात व्यावसायिकरित्या कला क्षेत्रात काम करणं सामान्य नव्हतं. एक दशकापूर्वी, लोक विचारायचे - तुम्ही खरोखर यातून उदरनिर्वाह करू शकता का? सुदैवाने, आता मानसिकता बदलत आहे आणि कलेला नवी ओळख मिळत आहे" असं पूनम यांनी द बेटर इंडियाशी संवाद साधताना म्हटलं आहे.
रेझिन आर्ट शिकण्याचा घेतला निर्णय
रेझिन आर्ट शिकण्याच्या पूनम यांच्या निर्णयाने सुरुवातीला काही लोकांना आश्चर्य वाटलं. पण जेव्हा तिने तिच्या कुटुंबाला तिच्या प्लॅनबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी पूनम यांना प्रोत्साहन दिलं. फिलाडेल्फियामध्ये असताना रेझिन आर्ट समजून घेण्यासाठी दोन कार्यशाळांमध्ये सहभागी झाल्या. त्या वारंवार आर्ट गॅलरींना भेट देत असे. कोरोनाच्या आधी भारतात परतल्यानंतरच त्यांनी पूर्णवेळ रेझिन आर्ट शिकण्याचा निर्णय घेतला. ऑनलाइन ट्युटोरियल्स आणि संसाधनांमध्ये स्वतःला झोकून दिलं, या कौशल्यात प्रभुत्व मिळवण्याचा आणि स्वतःचं काहीतरी सुरू करण्याचा निर्धार केला.
कलात्मक प्रवासाला नवीन दिशा
पूनम यांनी त्यांच्या सात वर्षांच्या मुलीशी संवाद साधल्यानंतर त्यांनी खूप विचार केला. माझ्या खेळण्यापासून तू काहीतरी बनवू शकते का असं मुलींनी विचारलं आणि त्यानंतर कलात्मक प्रवासाला एक नवीन दिशा मिळाली. "सुरुवातीला मला काय बनवायचं हे माहित नव्हतं, म्हणून मी माझ्या मुलीच्या खेळण्यांपासून रेझिन स्लॅब बनवायला सुरुवात केली. ते काही महिने माझ्या स्टुडिओमध्ये पडले. कोणीतरी ते टेबलमध्ये बदलण्याचा सल्ला दिला, ते खूप सोपं वाटलं. मग विचार आला अयानाच्या खेळण्यांचा वापर करून तिच्यासाठी एक छोटी रॉकिंग चेअर का बनवू नये?"
एक महिन्यापेक्षा जास्त वेळ
"मुलीची जुनी खेळणी, पझल पीस, ब्लॉक आणि तुटलेल्या रंगीत खडूंपासून रेझिन आर्ट फर्निचर तयार करायला सुरू केलं आहे. त्यानंतर ते सुंदर कलेत बदललं. ग्राहक त्यांच्या मुलांची छोटी छोटी खेळणी, कार, रबर पाठवतात. मी ते साच्यामध्ये व्यवस्थित फिट करते. त्याआधी त्यांना नेमकं काय डिझाईन हवं याची चर्चा करते. त्यानंतर साचा बनवते. रेझिन हा एक कठीण पदार्थ आहे. त्याला पॉलिश करण्यासाठी हँडहेल्ड मशीनचा उपयोग करते. हे खूप मेहनतीचं काम आहे. या प्रक्रियेसाठी एक महिन्यापेक्षा जास्त वेळ लागतो."
फर्निचरमध्ये दिसतात आपली खेळणी
"मुलांना फर्निचरमध्ये जेव्हा आपली खेळणी दिसतात. तेव्हा त्यांना फार आनंद होतो. माझ्या कामाला खऱ्या अर्थाने इन्स्टाग्रामवरून लोकप्रियता मिळाली. माझे क्लाइंट मला इन्स्टावर शोधतात. कारण मी तिथेच जास्तीत जास्त फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. माझं काम दाखवण्यासाठी आणि नव्या ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी तो एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. माझ्या टीममध्ये सात ते दहा लोक आहेत. जे मोल्ड मेकिंग, सँडिंग आणि पॉलिशिंगमध्ये मदत करतात. मी डिझाईन आणि कस्टमायझेशनकडे जास्त लक्ष देते" असं पूनम यांनी म्हटलं आहे.