जन्मापासून त्या दोघींचे डोके एकमेकाला जोडलेले. शरीरं दोन असली तरी डोके जोडलेले असल्याने त्यांच्या सगळ्याच हालचालींवर आणि दैनंदिन गोष्टींवर बंधनं. मात्र असं असूनही या दोघींनी आणि त्यांच्या पालकांनी कधीच हार मानली नाही. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक अडचणींवर मात करत या मुलींनी सामान्यांप्रमाणेच जिद्दीने शिक्षण घेतलं. विशेष म्हणजे या दोघी नुकत्याच बारावीही झाल्या. या मुलींचे नाव आहे वीणा आणि वाणी. तेलंगणा राज्यात राहणाऱ्या या दोघी जन्मापासून शरीराने एकमेकींना चिकटलेल्याच आहेत. डोकं एकच असलं तरी त्यांचे मेंदू वेगळे असल्याने त्यांना मेंदूशी निगडीत कोणतीही अडचण नाही. त्यामुळे त्या इतर सगळ्या गोष्टी सामान्य व्यक्तींप्रमाणेच करु शकतात (Hyderabad conjoined twins pass intermediate exam).
अशाप्रकारे एकच डोके असल्याने ते वेगळे करण्यासाठी त्यांच्या पालकांनी अनेक डॉक्टरांच्या भेटी घेतल्या. मात्र मेंदूतील सूक्ष्म पेशी आणि रक्तवाहिन्या एकमेकांमध्ये गुंतल्याने ही शस्त्रक्रिया काहीशी कठिण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच या शस्त्रक्रियेसाठी १० कोटी रुपये खर्च येणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय त्यांच्या पालकांनी घेतला. नुकताच तेलंगणा बोर्डाचा निकाल लागला. यामध्ये त्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. कॉमर्स शाखेत शिकत असलेल्या वीणाला १००० पैकी ७१२ मार्कस मिळाले असून वाणीला ७०७ मार्कस मिळाले आहेत. पुढे या दोघींना सीए व्हायचे असल्याचे त्यादृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इयत्ता १० वी मध्येही या दोघींनी चांगले यश मिळवले होते. त्यावेळी वीणाला ९.३ पॉईंटस तर वाणीला ९.२ पॉईंटस मिळाले होते. विशेष म्हणजे या दोघींना स्पेशल केस म्हणून पेपर सोडवण्यासाठी जास्तीचा वेळ दिला जातो. मात्र त्यांनी अशाप्रकारे जास्तीचा वेळ घेऊन परीक्षा देण्याला नकार दिला. त्यामुळे इतर सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच त्या आपला पेपर पूर्ण करतात असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. १०१९ पासून या दोघींच्या शिक्षणाचा खर्च तेलंगणा सरकार करत असल्याची माहितीही समोर आली आहे. पण शारीरिकदृष्ट्या अवघडलेल्या अवस्थेत असताना दैनंदिन व्यवहार आणि अभ्यास करुन इतक्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे ही खरंच कौतुकास्पद बाब आहे.