Join us  

‘तान्हं बाळ घरी एकटं ठेवून मी..’- सैन्यात सेवा ते ब्यूटी कॉण्टेस्ट; प्रीती शेरावत यांची जिद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2022 2:34 PM

Mrs. beyond profession in 2022 हा किताब जिंकणाऱ्या प्रीती शेरावत यांचा संघर्षमय प्रवास

ठळक मुद्देकुटुंबातील सैन्यदलात जाणारी पहिली व्यक्ती असल्याचा त्यांना विशेष अभिमान आहे असे त्या सांगतात. मिसेस इंडिया स्पर्धेत सहभागी होत Mrs. beyond profession in 2022 हा किताब मिळवला.

सैन्यदलाची कौटुंबिक पार्श्वभूमी नाही, क्षेत्र पुरुषप्रधान, क्षमतांचा कस पाहणारं, त्यात आपलं मूल-संसार; देशाचं रक्षण करणाऱ्या सैन्यदलात आपला निभाव लागेल का असा प्रश्न प्रीती शेरावत यांच्याही मनात होताच.  २०११ मध्ये त्या सैन्यदलात दाखल झाल्या. आपल्या साडेसात महिन्याच्या बाळाला घरी ठेवून कामावर जाण्यापासून ते उत्तम काम करत सहकाऱ्यांचा आदर कमावण्यापर्यंत अनेक गोष्टींनी परीक्षा पाहिली मात्र त्यांनी कच खाल्ली नाही. आता त्या चर्चेत आहेत कारण सैन्यदलातून बाहेर पडल्यावर आपली बुद्धीमत्ता आणि सौंदर्य यांच्या जोरावर त्यांनी Mrs beyond profession in 2022 हा किताब जिंकला. 'शी द पीपल' या पोर्टलने त्यांची सविस्तर मुलाखत प्रसिध्द केली आहे. त्यात प्रीती शेरावत सैन्य ते ब्यूटी कॉण्टेंस्ट हा आपला प्रवास सांगतात. 

(Image : Google)

प्रीती सांगतात, सैन्यदलाचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिलं पोस्टींग २०११ मध्ये जोधपूरला झाले. त्यावेळी त्यांच्याकडे जवळपास ४ वर्षांसाठी संपूर्ण राजस्थान राज्याची जबाबदारी होती. त्याठिकाणी १००० जणांच्या टिममध्ये एकट्या महिला अधिकारी होत्या. त्या सांगतात, माझ्यासोबत असलेल्या पुरुष सहकाऱ्यांना ज्युनिअर सहकारी ‘साहाब’ म्हणायचे पण मला मात्र मॅडम म्हणायचे. पण ६ महिने याठिकाणी काम करुन आपणही पुरुषांपेक्षा कुठेही कमी नाही हे सिद्ध केल्यावर मात्र एक दिवस एक व्यक्ती मला साहेब म्हणाली. त्यावेळी मला मी अधिकारी असल्यासारखे वाटले आणि हा मान मी माझ्या कृतीतून मिळवला. २०१५ मध्ये माझे शिलॉंगला पोस्टींग झाले त्यावेळी माझे लग्न झाले होते. नंतर मूल झाले. या सगळ्या काळात मला आपल्या यंत्रणेकडून अतिशय चांगला पाठिंबा मिळाला. मात्र त्यानंतर २०१८ मध्ये माझे नागरोटामध्ये पोस्टींग झाले, ही पोस्टींग फिल्डवरची असल्याने आणि बाळ अवघे ७ ते ८ महिन्यांचे असल्याने माझ्यासाठी हे खऱ्या अर्थाने आव्हान होते. बाळाला सांभाळायला कोणीही नसताना २ महिने मी त्याठिकाणी एकही परेड चुकवली नाही की कारणं सांगितली नाही. नंतर मूल लहान असल्याने माझी मेट्रो सिटीमध्ये बदली व्हावी यासाठी मी वरिष्ठांना विनंती केली तेव्हा मला दिल्लीमध्ये बदली मिळाली.

आर्मीमध्ये असताना प्रिती यांनी वाळवंटापासून ते पूर्वेकडील जम्मू-काश्मीर सारख्या बंडखोरी असणाऱ्या सगळ्या ठिकाणी काम केले. अखेर २०२१ मध्ये त्यांची सेवा संपली आणि त्या दिल्लीतील अदानी ग्रुप ऑफ क्लस्टर सिक्युरीटी येथे प्रमुख म्हणून रुजू झाल्या. त्यावेळी याठिकाणीही सुरक्षा विभागात काम करणाऱ्या प्रीती या पहिल्या महिला अधिकारी होत्या. त्यानंतर त्यांनी मिसेस इंडिया स्पर्धेत सहभागी होत Mrs. beyond profession in 2022 हा किताब मिळवला. सैन्यात आपल्याला मिळालेला आत्मविश्वास, स्वत:ची झालेली ओळख यामुळे आपण हा किताब मिळवू शकलो असे त्यांचे म्हणणे आहे. प्रिती यांच्या कुटुंबातील कोणीच सैन्यदलात नव्हते, मात्र त्या कुटुंबातील सैन्यदलात जाणारी पहिली व्यक्ती असल्याचा त्यांना विशेष अभिमान आहे असे त्या सांगतात. आपल्या कुटुंबियांच्याही सामर्थ्य, पुरुषी वर्चस्व याबद्दल काही कल्पना होत्या. पण या सगळ्या संकल्पनांना फाटा देत मी स्वत:ला कायम सिद्ध करत गेले आणि त्यासाठी वडिलांनी अतिशय उत्तम साथ दिली असंही त्या आवर्जून सांगतात.

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीमहिलासंरक्षण विभाग