Join us  

गरोदरपणात ‘तिने’ केला १४ देशांचा प्रवास, वर्षाच्या बाळाला घेऊनही फिरतेय एकटी जगभर, कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2023 6:01 PM

I Travelled to 14 Countries While Being Pregnant & With My 1-YO Baby; Why Wouldn’t I? : गरोदरपण-बाळ झाल्यावर बायकांनी घरातच राहावं, प्रवास करु नये असे काही असं सांगणारा एक प्रवास

"गरोदरपणा म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्म असे म्हटले जाते." या काळात स्त्रीला खूप काळजी घ्यायला सांगितले जाते. स्त्री आई बनण्याच्या काळात तिला अनेकांकडून भरपूर सूचना, सल्ले ऐकावे लागतात. हे खाऊ नको, असं करू नको, इथे जाऊ नको अशा नानाविध सल्ल्यांची पारायण केली जातात. हा काळ आई व बाळासाठी खूप काळजी घेण्याचा असतोच, परंतु आपल्याकडे याचा फारच बाऊ करुन होणाऱ्या आईवर काहीवेळा फारच बंधन लाधली जातात. काही महिला तर अशा काळात आपली नोकरी, आपले स्वप्न, पॅशन, काहीतरी करून दाखविण्याची जिद्द या सगळ्याचा विचार करणंच सोडून देतात. 

"तुम्ही गरोदर आहात किंवा तुम्हाला मूल झाले म्हणून तुमची आवड सोडू नका. आपली ओळख गमावू नका." असे सांगत जगभर प्रवास करणाऱ्या आणि आपले पॅशन जपणाऱ्या अनिंदिता चॅटर्जी हिची ही अनोखी गोष्ट. गरोदरपणात स्त्रीला काय करु नका असे प्रामुख्याने सांगितले जाते. ज्यामध्ये गरोदर महिलांनी प्रवास करू नये यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश असतो. परंतु हा समज मोडून काढत आणि तीच आयुष्य उत्तम जगत अनिंदिता चॅटर्जी हिने गरोदरपणात चार देशांचा प्रवास केला होता आणि आपल्या छंदात कधीही खंड पडू दिला नव्हता(I Travelled to 14 Countries While Being Pregnant & With My 1-YO Baby; Why Wouldn’t I?).     

प्रवास करण्याच्या या अनोख्या छंदाची सुरुवात कशी झाली... 

अनिंदिताची प्रवासाची आवड तिच्या आई-वडिलांनी तिच्या मनात बिंबवली. ती लहान असल्यापासूनच तिच्या आईवडिलांनी तिला देशभर सहलीला नेले. अनिंदिता मोठी झाल्यावर, नोकरीला लागल्यावरही तिने आपल्या या छंदात कोणताही खंड पडू दिला नाही. नोकरी करत असताना देखील तिने आपला हा प्रवास सुरूच ठेवला. अनिंदिता हिने १७ वर्षांच्या पूर्णवेळ नोकरीसह आपल्या जगभर प्रवास करण्याच्या छंदाला तितक्याच आवडीने जोपासले. वर्षाच्या सुरुवातीला जसे कॅलेंडर प्रकाशित होते तसे लगेच ते विकत आणून ती सुट्ट्यांचे नियोजन करीत असे. अनिंदिता सांगते, मी २० वर्षांची असताना अर्थात माझ्याकडे परदेशात जाण्यासाठी पैसे नव्हते, त्यामुळे सुरुवातीला मी महाराष्ट्रातच छोट्या सहलीला जाऊ लागले. जसजशी मी मोठी होत गेले तसे मी हळुहळु परदेश प्रवासाला सुरुवात केली. आपली हीच आवड जोपासत तिने २०१७ मध्ये इंस्टाग्रामवर @travel.chatter नावाने अकाऊंट सुरु करुन त्यावर तिच्या ट्रॅव्हल संदर्भातील व्हिडीओ टाकायला सुरू केले. आपला छंद जोपासण्यासाठी तिने २०२० मध्ये नोकरी सोडून दिली. आता अनिंदिता पूर्णवेळ ट्रॅव्हल कंन्टेन्ट क्रिएटर आहे. अलीकडे, ती तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलद्वारे गर्भधारणेच्या संदर्भातील समज - गैरसमज यांबाबतचे व्हिडीओ प्रसारित करत असते. 

गरोदरपणात असा केला प्रवास... 

अनिंदिता चॅटर्जी हिने गरोदरपणात चार देशांचा प्रवास केला होता. आजवर अनिंदिताने एकूण ७८ देशांचा प्रवास केला आहे. द बेटर इंडियाला मुलाखत देताना  अनिंदिता म्हणते, "मी ४० व्या वर्षी गरोदर राहिले, मला प्रवास करायला आवडतो, मग माझी प्रेग्नन्सी वेगळी का असावी? असे म्हणत तिने आपल्या गरोदरपणात  देखील भरपूर प्रवास केला आहे. माझ्या डॉक्टरांनी मला प्रवास करण्याची परवानगी दिल्यानंतर, मी कोलंबिया, मेक्सिको, अरुबा आणि कुराकाओ येथे ४५ दिवसांच्या बेबीमूनची योजना आखली. मी कोलंबियातील मातीच्या ज्वालामुखीमध्ये तरंगले, स्नॉर्केल केले, दररोज सुमारे १० किलोमीटर चालले, गिर्यारोहण केले आणि मला जे करायचे होते ते सर्व केले," सामान्यतः स्त्रिया ४० व्या वर्षी गरोदर होतात तेव्हा अनेक पूर्वकल्पना असतात. "उशीरा गर्भधारणेशी संबंधित अनेक समज - गैरसमज आहेत. माझ्या बाबतीत म्हणायचे झाले तर मी खरोखरच माझ्या प्रेग्नन्सीचा आनंद घेतला. मी गरोदर होण्यापूर्वी मला जे काही करायचे होते ते बरेच काही साध्य केले. मी १७ वर्षे कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये काम केले. माझ्या गरोदरपणापूर्वी मी ६८ देशांमध्ये प्रवास केला,आणि आता मी बाळासोबत जीवनाचा आनंद घेत आहे. अनिंदिताची लहान मुलगी कियारा हिने आतपर्यंत वयाच्या पहिल्याच वर्षी आईसोबत १० देशांचा प्रवास केला आहे.   

स्वप्न सोडू नका... 

अनिंदिता असंख्य गरोदर स्त्रियांना आपले स्वप्न न सोडण्याचा संदेश देताना म्हणते, “तुम्ही गरोदर आहात किंवा तुम्हाला मूल झाले म्हणून तुमची आवड सोडू नका. आपली ओळख गमावू नका. मला प्रवास करायला आवडते, म्हणून मी प्रवास करते आणि माझ्या मुलीला देखील सोबत घेऊन जाते. मी तिच्याशी जुळवून घेण्याऐवजी तिने माझ्या जीवनशैलीशी जुळवून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. मी माझ्या स्वप्नांचे अनुसरण केले तरच ती मोठी झाल्यावर तिचे अनुसरण करेल."

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी