यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणं खूप कठीण आहे असं अनेकदा म्हटलं जातं. काही सामान्य विद्यार्थी असे आहेत जे सुरुवातीला शिक्षण घेताना नापास झाले परंतु नंतर त्यांच्या चुकांमधून शिकत मोठं यश मिळवलं आहे. आयएएस डॉ. अंजू शर्मा यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत त्या नापास झाल्या होत्या. पण कठोर परिश्रम आणि समर्पणाने त्या पहिल्याच प्रयत्नात UPSC पास झाल्या आहेत.
आयएएस अंजू शर्मा यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. त्यांचा जन्म राजस्थानमधील भरतपूर येथे झाला. सुरुवातीला त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दहावीच्या प्री-बोर्ड परीक्षेत त्या नापास झाल्या होत्या. नंतर, बारावीतही अर्थशास्त्र विषयातही नापास झाल्या. मात्र अपयशामुळे अंजू निराश झाल्या नाहीत किंवा खचल्या नाहीत.
अंजू यांनी त्यांचं नेमकं काय चुकतंय ते शोधलं आणि त्यानुसार आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला. पुढे त्यांच्या कष्टाचं चीज झालं. त्यांनी डिग्री घेतली आणि गोल्ड मेडल जिंकले. यानंतर त्यांनी एमबीए (मास्टर ऑफ बिझनेस एडमिनिस्ट्रेशन) केलं आणि यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. १९९१ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी, अंजू शर्मा यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC CSE उत्तीर्ण केली आणि IAS अधिकारी झाल्या.
आयएएस अंजू शर्मा गुजरात केडरमधील आहेत. त्यांची पहिली नियुक्ती १९९१ मध्ये राजकोटमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून झाली. नंतर त्या जिल्हाधिकारी झाल्या आणि गांधीनगसारख्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये त्यांनी महत्त्वाची पदं भूषवली. त्यांचं विशेष सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिव या पदांवर प्रमोशन झालं आहे. त्यांच्यापासून अनेक तरुणांना प्रेरणा मिळत आहे.