आजच्या काळात लोकांना मोबाईल आणि सोशल मीडियापासून काही मिनिटंही दूर राहणं अवघड झालं आहे. काहींना तर फोनचं व्यसन लागलं आहे. अशातच एक प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. UPSC नागरी सेवा परीक्षा (CSE) ची तयारी करताना नेहा ब्याडवाल हिने स्वतः याचा अनुभव घेतला. सुरुवातीला अपयश आल्यानंतर तिने मोठा निर्णय घेतला. ती जवळपास तीन वर्षे सोशल मीडियापासून दूर राहिली. अत्यंत महत्त्वाची कामं वगळता फोनचा मर्यादित वापर केला. या निर्णयामुळे अखेर तिच्या मेहनतीला फळ मिळालं आणि आयएएस अधिकारी होण्याचं तिचं स्वप्न पूर्ण झालं.
नेहा ब्याडवालचा जन्म राजस्थानच्या जयपूर येथे झाला. ती छत्तीसगडमध्ये लहानाची मोठी झाली. वडील श्रवण कुमार यांच्या सरकारी नोकरीमुळे राहण्याचं ठिकाण बदलत राहिलं. याच कारणामुळे नेहालाही अनेक शाळा बदलाव्या लागल्या. जयपूरमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर तिने छत्तीसगडमधील डीपीएस बिलासपूर आणि भोपाळमधील किडझी हायस्कूल, डीपीएस कोरबा या शाळांमध्ये शिक्षण घेतलं. नेहा अभ्यासात हूशार होती.
नेहाने रायपूरच्या डीबी गर्ल्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि युनिव्हर्सिटी टॉपर झाली. वडिलांच्या सेवेने प्रेरित होऊन नेहाने नागरी सेवेमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. आयएएस होण्याचा प्रवास नेहासाठी सोपा नव्हता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने यूपीएससी सीएसईची तयारी सुरू केली. मात्र त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पहिल्या तीन प्रयत्नांत ती परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही.
नेहाला वाटलं की, सोशल मीडिया आणि मोबाईल तिच्या अभ्यासात अडथळा आणत आहेत. त्यामुळे तयारीच्या वेळी त्याच्यापासून पूर्णपणे दूर राहण्याचा तिने निर्णय घेतला. तीन वर्षे नेहाने स्वतःला पूर्णपणे अभ्यासात वाहून घेतलं. तिने स्वत:ला तिच्या मित्रपरिवारापासून दूर केलं.
नेहाने तयारीदरम्यान अनेकवेळा एसएससीची परीक्षा पास केली, पण नोकरी केली नाही. नेहाचं खरं ध्येय आयएएस अधिकारी बनण्याचं होतं. अखेर २०२१ मध्ये नेहाच्या मेहनतीला फळ मिळालं. चौथ्या प्रयत्नात तिने CSE परीक्षा ५६९व्या ऑल इंडिया रँकने (AIR) उत्तीर्ण केली. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी तिने आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. तिचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.