कठीण परिस्थितीशी झुंज देत उम्मुल खेर IAS झाल्या आहेत. आयुष्यात असंख्य अडचणी आल्या. १६ फ्रॅक्चर आणि आठ सर्जरी झाल्या. तरी उम्मुल यांनी हार मानली नाही. सर्व परिस्थितीशी धीराने आणि एकटीने तोंड दिलं. आव्हानांचा सामना करत घवघवीत यश संपादन केलं आहे. उम्मुल यांच्या आईच्या निधनानंतर वडिलांनी दुसरं लग्न केलं. त्यांच्या सावत्र आईला उम्मुल यांचं शाळेत जाणं आवडत नव्हतं. शिक्षणासाठी उम्मुल यांनी घर सोडलं आणि एकट्याच राहू लागल्य़ा.
१६ फ्रॅक्चर आणि आठ सर्जरी
राजस्थानमधील पाली येथील रहिवासी असलेल्या उम्मुल खेर या लहानपणापासूनच दिव्यांग होत्या. कुटुंबाची परिस्थिती ही अत्यंत हलाखीची होती. त्यांना बोन फ्रॅजाइल डिसऑर्डर होता. या आजारात शरीराची हाडं कमकुवत होतात. यामुळेच उम्मूल यांची हाडं अनेकदा मोडायची. त्यांच्या आयुष्यात त्यांच्यावर १६ फ्रॅक्चर आणि आठ सर्जरी झाल्या आहेत.
उम्मुल यांच्या कुटुंबात त्यांचे आईवडील आणि तीन भावंडं आहेत. जेव्हा त्या खूप लहान होत्या तेव्हा वडील कुटुंबासह दिल्लीतील निजामुद्दीन भागात असलेल्या झोपडपट्टीत राहू लागले. वडील कपडे विकायचे. सरकारच्या आदेशानुसार तिथल्या झोपडपट्ट्या पाडण्यात आल्या. त्यांच्या कुटुंबाला स्थलांतर करावे लागले आणि ते त्रिलोकपुरीच्या झोपडपट्टीत राहू लागले.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप वाईट
उम्मुल खेर यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि फी भरण्यासाठी त्यांनी ७ वी पासून ट्यूशन घ्यायला सुरुवात केली. त्या नववीत असताना आईचं निधन झाले. मग त्यांच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. उम्मुल यांच्या सावत्र आईला त्यांचं शाळेत जाणं आवडत नव्हतं. उम्मुल शिक्षण सोडू शकत नव्हत्या. शिक्षणासाठी त्यांनी आपलं घर सोडलं आणि एकट्याच राहू लागल्या.
आयएएस बनून सर्वांसाठी ठरल्या आदर्श
उम्मुल यांनी दहावीत ९१ टक्के आणि बारावीत ९० टक्के गुण मिळाले. दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी कॉलेजमधून मानसशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर जेएनयूच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधून एमए आणि एमफिल केलं. स्वतःचा मार्ग निवडला आणि आयएएस बनून सर्वांसाठी आदर्श ठरल्या आहेत. यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली आणि २०१६ च्या सीएसई परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात ४२० वा रँक मिळवला.