आपण आयुष्यात लहानसं काही झालं की निराश होतो आणि हातात आहे ते सगळं सोडून विचार करत बसतो किंवा निराशेत काही काळ घालवतो. पण अनेकांच्या हातात काहीच नसताना ते केवळ संधीचं सोनं करतात आणि स्वप्नातही विचार केला नाही असे काम करुन जातात. अशा लोकांच्या बातम्या आपण सगळेच कधी ना कधी वाचतो. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण आपल्या मर्यदांवर मात करायला हवी असेही आपल्याला सांगितले जाते. आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्याकडे ना पुरेसे शिक्षण आहे, ना त्यांची परिस्थिती खूप चांगली आहे ना त्यांना प्रसिद्धीचे वलय आहे. मात्र अतिशय प्रतिकूल परीस्थितीवर मात करत उतारवयात ही महिला आपले स्थान निर्माण करते आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वत:ची ओळख निर्माण करते. या महिलेचे नाव आहे मिल्कुरी गंगव्वा (Famous You tuber milkuri gangavva Inspirational story farm worker to South Famous Star).
कोण आहेत मिल्कुरी गंगव्वा?
६२ वर्षीय मिल्कुरी गंगव्वा या तेलंगानाच्या लम्बाडीपल्ली गावातील रहिवासी आहेत. मिल्कुरी यांची जीवनकहाणी खऱ्या अर्थाने एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी आहे. यूट्यूबर होण्याआधी कुटुंबातील ५ लोकांचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या शेतात रोजंदारीवर काम करायच्या. मिल्कुरी फक्त पहिलीपर्यंत शिकल्या आहेत. लग्नानंतर त्यांचे पती दारू पिऊन त्यांना मारझोड करायचे. कुटुंबातील गरीबी आणि शिक्षण नसल्याने मजुरी करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. स्वत:ला शिक्षण नसल्याने त्यांना शिक्षणाचे महत्त्व वेळीच पटले आणि त्यांनी आपल्या ४ मुलांच्या शिक्षणात कधीच कमी पडू दिले नाही. त्यामुळेच त्यांची मुले आज उच्च शिक्षित असून आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत.
६२ वर्षांची आजी फेमस युट्यूबर झाली कशी?
मिल्कुरी यांनी कधी स्वप्नातही पाहिले नसेल इतक्या त्या आज प्रसिद्ध झाल्या आहेत. तर त्याचे झाले असे, गंगव्वा यांचे जावई श्रीकांत श्रीराम My Village Show नावाचं एक युट्यूब चॅनल चालवतात. या चॅनलवर ते आपल्या गावातील काही ना काही गोष्टी आणि कधी विनोदी व्हिडिओज दाखवतात. त्यांच्या चॅनेल स्थानिक भाषिकांना चांगलाच आवडत असल्याने मोठ्या प्रमाणात पाहिला जातो. एकदा श्रीकांत यांनी एका व्हिडिओत आपल्या सासूला म्हणजेच मिल्कुरी यांच्यावर एक व्हिडिओ बनवला. गंगव्वा आजीचा साधाभोळा आणि निरागस चेहरा बघताच अनेकांना हा व्हिडिओ आवडला आणि काही दिवसांत तो प्रचंड व्हायरल झाला.
आजी अचानक इतक्या फेमस कशा झाल्या?
आजींच्या जावयाने त्यांना घेऊन व्हिडिओ बनवायला सुरूवात केली. यात काही व्हिडिओमध्ये गंगव्वा आजी अॅक्टिंग करतानाही दिसत होत्या. त्यांचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागले. सोशल मीडियावर आजी गाजायला लागल्यानंतर त्यांना तेलगु चित्रपट आणि टीव्ही सीरियलमधून ऑफरही यायला लागल्या. मग त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये आणि एका टिव्ही शोमध्ये काम केले. त्यामुळे या आजी आता साध्यासुध्या आजी राहिल्या नसून एक अत्रिनेत्री झाल्या. आता त्यांची प्रसिद्धी इतकी वाढली आहे की तेलगु आणि तमिळ चित्रपटातील बरेच कलाकार या आजींना फॉलो करतात. त्यामुळे मजूर ते सेलिब्रिटी हा त्यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे.