ज्या देशातून कुणीही महिला युएस ओपनपर्यंत आजवर पोहोचलीच नाही त्या देशातली २१ वर्षांची तरुणी. इगा स्वातेक. (iga swiatek) साऱ्या जगाला ठणकावून सांगते. स्काय इज द लिमिट. आता तर कुठं सुरुवात झाली आहे. यावेळी तर मला स्वत:लाही वाटलं नव्हतं की चॅम्पिअनशिप जिंकेल, मी माझं मलाच सरप्राइज दिलं आहे. सिझन सुरु झाला तेव्हा मला वाटत होतं की मी चांगली खेळतेय, पण चॅम्पिअन होईल असं वाटलं नव्हतं. अशी ही मनमोकळं बोलणारी, भरपूर रॉक म्युझिक ऐकणारी, वाचन करणारी मनस्वी मुलगी. तिचं जगात सर्वात जास्त कशावर प्रेम असेल तर आधी टेनीस आणि तिची आवडती काळी मांजर ग्रापा. या दोन्हीवर मन:पूत प्रेम करत ही मुलगी म्हणता म्हणता ३ ग्रॅण्डस्लॅम जिंकते आणि जसं काही आपण फार मोठं केलंच नाही इतकं सहज जगते.
(Image : Google)
इगा कुणाही २१ वर्षीय मुलीसारखीच भन्नाट जगते. बिंधांस्त. तिचे वडील खेळाडू होते. रोवर होते. त्यांना वाटायचं आपल्या मुलींनी ॲथलिट व्हावं. टीम गेम न खेळता वैयक्तिक खेळात प्रगती करावी म्हणजे यशस्वी होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ते स्वत: १९८८ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पोलंड्च्या संघात सहभागी झाले होते. त्यांना दोन मुली. मोठी मुलगी अगाथा. ती स्विमिंग करायची पण तिनं ते सोडलं आणि टेनीस खेळू लागली.
Lift it up, Iga! 😗🏆#USOpen | @iga_swiatekpic.twitter.com/cBwcXhaxYs
— US Open Tennis (@usopen) September 10, 2022
बहीण खेळते म्हणून आपणही खेळायचं, तिला हरवायचं चिडवायचं म्हणून इगाचं टेनीस सुरु झालं. पण मग तिनं त्यात अशी काही गती पकडली की म्हणता म्हणता ज्युनिअर चॅम्पिअनशिप जिंकून वयाची विशी ओलांडताना तिच्यागाठी ३ ग्रॅंडस्लॅम जमा झाले. पण इथंच तिची गोष्ट थांबत नाही. ही मुलगी आपल्या विचारांवर ठाम आहे. पॉलिटिकल सोयीची भूमिका न घेता तिनं जगजाहीर युक्रेनला पाठिंबा दिला. युक्रेनच्या झेंड्याच्या रंगाचे स्कार्फ, बॅण्ड घालून ती खेळली. जाहीरपणे तिनं राजकीय भूमिका घेतली. आपल्या करिअरवर त्याचा काय परिणाम होईल, लोक कायम म्हणतील असा किस न पाडता २१ वर्षींय मुलगी जे वाटते ते करते, ते जगते.
(Image : Google)
म्हणून इगा वेगळी दिसते. जितकी साधी तितकीच खंबीर.
ती आजच्या पिढीची प्रतिनिधी दिसते ते म्हणूनच..