आपण खूप श्रीमंत असावं असं आपल्यापैकी अनेकांना वाटतं. पण सगळ्यांचेच हे स्वप्न सत्यात उतरते असे नाही. प्रचंड कष्ट घेण्याची तयारी, जिद्द आणि हुशारी यांच्या जोरावर तुम्हाला स्वत:ला सिद्ध करावे लागते आणि मगच समाजात तुमचे स्थान निर्माण होते. तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळाली तर मात्र हे स्वप्न तुमच्यापासून फारकाळ दूर राहू शकत नाही. नुकतेच पुण्यातील एका तरुणीच्या बाबतीत हे प्रत्यक्षात घडले आहे. नुकतीच आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२२ (IIFL WEALTH HURUN INDIA RICH LIST) प्रसिद्ध झाली आहे, या यादीमध्ये पुण्याच्या नेहा नारखेडे (Neha Narkhede) या तरुण उद्योजिकेच्या नावाचा समावेश आहे. नेहा नेमक्या काय करतात आणि त्यांचे शिक्षण काय झाले आहे हे समजून घेणे औत्सुक्याचे ठरेल.
नेहा या मूळच्या पुण्यातील असून त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणही पुण्यातच झाले आहे. पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी कॉलेज, एससीटीआरमधून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर २००६ मध्ये त्या जॉर्जिया येथे कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी गेल्या. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. शिक्षण पूर्ण झाल्यावर नेहा यांनी ओरॅकल आणि लिंक्डइन येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कामाला सुरूवात केली. मात्र अंगी असलेली जिद्द आणि वेगळं काहीतरी करण्याची उर्मी त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यामुळे लिंक्डइन येथील काही सहकाऱ्यांच्या मदतीने नेहा यांनी २०१४ मध्ये कॉन्फ्लुएंट या कंपनीची स्थापना केली. नेहा अवघ्या ३७ वर्षांच्या असून इतक्या लहान वयात श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवणाऱ्या त्या कदाचित पहिल्याच भारतीय महिला उद्योजिका आहेत.
या यादीत त्या ३३६ व्या स्थानावर असल्या तरी महाराष्ट्रासाठी आणि विशेषत: पुण्यासाठी ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीत अमेरीकन सेल्फ मेड महिला उद्योजकांच्या यादीत नेहा यांचा ५७ वा क्रमांक होता. मागील १५ वर्षांपासून त्या अमेरिकेत स्थायिक आहेत. हुरुन इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीत यंदा ११०३ जणांचा समावेश असून त्या सगळ्यांची संपत्ती १ हजार कोटी आणि त्याहून जास्त आहे. मागच्या वर्षीशी तुलना केली तर यंदाच्या यादीत ९६ नावांची भर पडली असल्याचे सांगण्यात आले.