गौरी पटवर्धन
युद्ध! जगाच्या इतिहासात कधी नव्हता इतका हा शब्द आज सर्वसामान्य जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. गेली काही वर्षे जगात कुठेना कुठे युद्ध सुरूच आहेत. सतत कुठला ना कुठला देश कोणाशी ना कोणाशी युद्ध करतोय. काही वेळा ते त्या देशांच्या सीमावर्ती भागापुरतं मर्यादित असतं, तर काही वेळा रशिया- युक्रेन युद्धासारखं एका प्रचंड मोठ्या भूभागाला वेढून टाकणारं असतं. त्याही पलीकडे जाऊन अनेक देशांमध्ये युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होत असते. सर्बिया, अफगाणिस्तान, लिबिया, सीरिया, येमेन, इराण, इराक, इस्त्रायल यासारखे अनेक देश आपल्याला केवळ युद्धाच्या संदर्भातच माहिती आहेत; पण आपल्यासमोर युद्ध हे कायम आकडेवारीच्या स्वरुपात येतं.
म्हणजे आज रशिया आणि युक्रेनमध्ये एक महिना युद्ध सुरू आहे, हे आपल्याला बातम्यांमधून समजतं; पण युद्ध काही खेळाच्या मैदानासारखं ठरवून दिलेल्या ठिकाणी आणि ठरवून दिलेल्या वेळात होत नाही.
युद्ध वाळवंटात होतं. जंगलात होतं. लहान गावात होतं. मोठ्या शहरात होतं. युद्धात शाळेवर, हॉस्पिटलवर बॉम्ब टाकले जातात. युद्धात पिण्याचं पाणी प्रदूषित होतं. युद्धात त्या प्रदेशाचा अन्नपुरवठा बंद होतो. काही दिवसांनी कणिक, तेल, मीठ इतक्या साध्या गोष्टीदेखील मिळेनाशा होतात. घराबाहेर पडता येत नाही. बाहेर नेमकं काय चालू आहे, ते कळत नाही. वीजपुरवठा केव्हाच बंद झालेला असतो आणि घरातदेखील तुम्ही सुरक्षित असाल, याची काहीही शाश्वती नसते.
(Image : Google)
अशा परिस्थितीत जर घरात लहान मुलं असतील तर?
दोन- पाच- सात वर्षांच्या मुलांना यातून कसं वाचवायचं? तान्ह्या बाळांसाठी दूध कुठून आणायचं? शहरात सगळीकडे बॉम्ब फुटत असताना बाळंतपण कसं करायचं? लहान मुलांना लागणारी औषधं कुठून आणायची? घरातल्या बाळाला ताप आला म्हणून औषध आणायला गेलेला त्याचा बाप बॉम्बहल्ल्यात मारला गेला तर त्या कुटुंबाने काय करायचं? दोन्ही पालक मारले गेले आणि फक्त लहान मुलं अशा युद्ध परिस्थितीत उरली तर त्यांनी कसं जगायचं?
युद्धापासून दूर जाण्यासाठी मैलोन मैल चालत निघालेले लाखो लोकांचे तांडे आपण गेली अनेक वर्षे टीव्हीवर आणि सोशल मीडियावर बघतो आहोत. त्यांच्यातली लहान मुलं त्या काळात कशी जगत असतील? त्यांना पुढे सुरक्षित वातावरण मिळतं का? समजा मिळालं तरी असे अनुभव घेऊन झाल्यानंतर त्यांना पुन्हा कधी निवांत सुरक्षित वाटू शकतं का?
आपण साध्या प्रवासाला जायला निघतो, त्यावेळी आपण घरातल्या मुलांची आबाळ होऊ नये म्हणून किती तयारी करतो? त्याऐवजी फक्त मूल उचला आणि पळत सुटा, अशी परिस्थिती येते तेव्हा माणसांचं काय होत असेल? त्यातली आजारी बाळं कशी जगत असतील का नसतीलच जगत?
युध्दानं लहान मुलांची कायमची वाताहात होते आणि त्यातून एक संपूर्ण पिढी भयानक आयुष्य घेऊन जगते..
(Image : Google)
युक्रेन-रशियाच्या युद्धात आजवरच्या इतिहासापलीकडे दुसरं काय होतंय?
युद्ध परिस्थितीचा मुलांवर काय परिणाम होतो त्याचा जगात अनेक संस्था आणि संघटना अभ्यास करत असतात. लहान मुलांवर युद्धाचे जे भयंकर मानसिक- शारीरिक परिणाम होतात, त्यातून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्याही अनेक संघटना आहेत. या सगळ्यांना दिसणारी आकडेवारी भयंकर आहे.
१. आज जगात युद्धसदृश्य परिस्थितीत राहणाऱ्या मुलांची संख्या २५,००,००,००० इतकी आहे.
२. आज जगात एकूण ३,००,००० बालसैनिक असावेत आणि त्यापैकी ४० टक्के मुली असतील, असा अंदाज आहे.
३. गेल्या दहा वर्षांत युद्धामुळे २० लाख मुलं मारली गेली आहेत.
४. ४० ते ५० लाख मुलांना अपंगत्व आलं आहे.
५. १ कोटी २० लाख मुलं बेघर झाली आहेत.
६. दहा लाखांहून अधिक मुलं अनाथ झाली आहेत किंवा त्यांची त्यांच्या पालकांपासून ताटातूट झाली आहे.
७. एखादा कोटी मुलं मानसिक आजारांची शिकार झाली आहेत.
८. सध्या सीरियामधील निर्वासितांमधील मुलांची संध्या वीस लाखांहून अधिक आहे, तर सोमालियातील निर्वासितांमध्ये ८ लाख ७० हजार मुलं आहेत.
९. आजघडीला जगातल्या प्रत्येक सहा मुलांपैकी एक मूल युद्ध परिस्थितीत जगतं आहे.
(Image : Google)
लहान मुलांवर युद्धाचे काय काय परिणाम होतात?
१. मृत्यू. काही मुलं युद्धात मरतात.
२. इजा/ गंभीर इजा. काहींना गंभीर दुखापत होते.
३. कायमचं अपंगत्व येतं.
४. आजारपण मागे लागतात, पोेषण होत नाही.
५. बलात्कार, लैंगिक अत्याचारांना सामोरं जावं लागतं.
६. मानसिक आजार. ताण, दु:ख, ट्रॉमा हे सारं आयुष्यभर पुरू शकतं.
७. नैतिक मूल्यांना कायमचा धोका पोहोचणं. जीवाची खात्री नाही तिथं बाकी काय करणार?
८. सामाजिक आणि सांस्कृतिक नुकसान.
९. बालसैनिक म्हणून युद्धात सहभागी व्हावं लागणं हे सगळ्यात वाईट लहानपण वाट्याला येतं.