माणसाच्या जगण्यातल्या अनेक गोष्टी आज केवळ विज्ञान-तंत्रज्ञानानं सोप्या झाल्या आहेत. सध्या जगभरात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची चर्चा सुरु आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करुन जगात विविध प्रयोग सुरु आहेत. असाच एक प्रयोग केरळमधील एका शाळेत झाला, ज्याची चर्चा संपूर्ण देशात आहे. केरळ राज्यातल्या एका शाळेत मुलांना शिक्षण आनंददायी वाटावं यासाठी शिकवताना एआयचा वापर केला आहे. माणसासारखी वागणारी एआय स्त्री शिक्षक मुलांना वर्गात जावून शिकवत आहे. 'इरिस' असं या स्त्री शिक्षकाचं नाव आहे. केरळच्या तिरुवंतपुरम येथील 'केटीसीटी हायर सेकंडरी स्कूल'मध्ये इरिस या एआय शिक्षकाची नेमणूक झाली आहे. या शाळेने 'मेकरलॅब्स एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीच्या सहयोगाने इरिस या एआय शिक्षकाची निर्मिती केली आहे.
इरिस नेमकी काय करते?
इरिस ही एआय शिक्षक तीन भाषा बोलू शकते. अभ्यासक्रमातील अवघड प्रश्नांची उत्तरं देते. उत्तरं देताना इरिस आवाज नियंत्रित सहायकाच्या भूमिकेत असते. उत्पादनक्षम कृत्रिम बुध्दीमत्ता तत्त्वांवर म्हणजेच जनरेटिव्ह एआय प्रिन्सिपलनुसार काम करते. यात आवाजाचे मजकुरात आणि मजकुराचे आवाजात रुपांतर होते. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणे, संकल्पना समजावून सांगणे हे तिचं काम. पण इरिस केवळ विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचं काम करते असं नाही तर विद्यार्थ्यांसोबत संवादात्मक पध्दतीने उपक्रम घेते. विद्यार्थ्यांना स्वत: काही प्रश्न विचारते. इरिसच्या शिकवण्याच्या या पध्दतीमुळे मुलांना इरिससोबत संवाद साधायला फार मजा येते.
(Image : google)
एकतर इरिस ही एआय शिक्षक मुलांना कधीच रागवत नाही. चिडत नाही. वैतागत नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे असतं. शिवाय ती विद्यार्थ्यांना गृहपाठ देत नाही. इरिस ही मुलांना शेकहॅण्ड करते. अभ्यासाव्यतिरिक्त ती मुलांना खूप गोष्टीही सांगते.
इरिसच्या पायाला चार चाकं आहेत. या चाकांच्या सहाय्याने इरिस वर्गात तिला हवं तिथे जाते. प्रत्येक विद्यार्थ्याजवळ जावू शकते. इरिसला दोन हात देखील आहेत. या हातांच्या सहाय्याने इरिस वस्तू उचलते. ती वस्तू विद्यार्थ्यांना दाखवते, त्या वस्तूबद्दल बारकाईने समजावून सांगते.
इरिस हे रोबोटिक तंत्रज्ञान आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेचं स्वरुप असलेली इरिस म्हणजे रोबोटिक तंत्रज्ञान. संवादात्मक शिक्षण पध्दतीत इरिसचा प्रयोग फायदेशीर ठरत असल्याचं केरळच्या शाळेतील प्रयोगाने दिसून येत आहे. मुलांना इरिससोबत संवाद साधायला मजा येते.
इरिसबाबतीत जशा अनेक सकारात्मक गोष्टी आहेत तशा नकारात्म गोष्टीही आहे, पण त्याचं प्रमाण कमी आहे. वर्गातील स्त्री शिक्षक ज्याप्रमाणे बोलते, त्याप्रमाणे इरिसही बोलते. ती वेगवेगळ्या प्रकारे कृती करते. पण मानवी शिक्षकांचे आपल्या विद्यार्थ्यांसोबत जसं जिव्हाळ्याचं, आपुलकीचं भावनिक नातं असतं. प्रत्येक विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचं जसं नातं असतं तसा त्यांच्याशी संवादही असतो. त्यामुळे शिक्षक भावनिक पातळीवर विद्यार्थ्यांशी भावनिक नातं तयार करतात, तसं नातं इरिस सारखं एआय तंत्रज्ञान निर्माण करु शकत नाही.
केरळमधील शाळेत विद्यार्थ्यांना ए आय शिक्षक, त्यांची शिकवण्याची पध्दत खूपच आवडल्याने भविष्यात या शाळेत आणखी एआय शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे.