Join us  

अभिमानास्पद! भारतीय महिला पायलटची संख्या जगात सर्वाधिक; अहवाल सांगतो, मोठी आकाश भरारी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2022 5:51 PM

India Has Highest Share of Female Pilots in World : भारताच्या आणि महिलांच्या दृष्टीने ही खरंच अभिमानास्पद आणि मान उंचावणारी गोष्ट आहे.

ठळक मुद्देरशिया-युक्रेन युद्ध असो किंवा कोरोनासारखी महामारी अशा संकटप्रसंगीही भारतीय महिला वैमानिकांनी आपली जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडलीक्षेत्र कोणतेही असो आम्ही मागे नाही हेच महिला दिवसेंदिवस सिद्ध करत आहेत.

भारतीय महिलेने चूल-मूल यांच्या पलिकडे जात आकाशाला गवसणी घातली आहे असे आपण अनेकदा म्हणतो. महिला घराबाहेर पडली, कमावती झाली, आपले कर्तृत्व सिद्ध करु लागली हे सगळे तर खरे आहेच पण विज्ञान, तंत्रज्ञान, संरक्षण, अवकाश अशा पुरुषांचे  वर्चस्व असलेल्या क्षेत्रातही महिलांनी आपले आगळेवेगळे स्थआन निर्माण केले आहे. कधी गावातील एखादी महिला बस ड्रायव्हार होते तर कधी तीच पेट्रोल पंपावर हिमतीने उभी राहते. फायटर पालयट म्हणून कामगिरी करणाऱ्या सैन्यातील तरुणींची आपल्याला ओळख आहेच इतकंच नाही तर पायलट म्हणून काम करणाऱ्या भारतीय महिलांची संख्या जगात सर्वाधिक असल्याचे एका अहवालावरुन नुकतेच समोर आले आहे. भारताच्या आणि महिलांच्या दृष्टीने ही खरंच अभिमानास्पद आणि मान उंचावणारी गोष्ट आहे (India Has Highest Share of Female Pilots in World). 

(Image : Google)

देशात व्यावसायिक विमान उड्डाण करणाऱ्या पायलटसमध्ये स्त्री पायलटसचे प्रमाण १२.४ टक्के आहे. ही आकडेवारी जागतिक सरासरीच्या दुपटीहून अधिक आहे. जगभरातील व्यावसायिक विमान कंपन्यांकडे कार्यरत असणाऱ्या स्त्री वैमानिकांची सरासरी टक्केवारी ५.८ आहे. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ वूमेन एअरलाईन पायलटस या संस्थेने ही आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध केली. भारतात देशांतर्गत उड्डाणे करणाऱ्या स्त्री वैमानिकांचे प्रमाण तर १३ टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. भारतातील महिला पायलट या प्रवासी विमाने चालवण्याचे प्रमाण जास्त असून अमेरीका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या प्रगत देशांमध्ये मात्र मालवाहू विमाने चालवण्याची जबाबदारी स्त्रियांवर दिली जाते. 

(Image : Statista)

एकूण भारतीय महिला असंख्य प्रवाशांना एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी सुखरुपपणे पोहचवण्याचे काम करतात ही आनंदाची बाब आहे. इतकेच नाही तर रशिया-युक्रेन युद्ध असो किंवा कोरोनासारखी महामारी अशा संकटप्रसंगीही भारतीय महिला वैमानिकांनी आपली जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडत असल्याचे माध्यमांतून आपल्या समोर आले आहे. त्यामुळे क्षेत्र कोणतेही असो आम्ही मागे नाही हेच महिला दिवसेंदिवस सिद्ध करत आहेत. आताच्या अहवालात भारतानंतर आयर्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, अमेरिका आणि इंग्लंडचा क्रमांक लागतो. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीवैमानिकमहिला