सोपं कुठं असतं मुलींनी काहीही खेळणं. गल्लीत बघा, रोज सायंकाळी मुलं खेळताना दिसतील. मैदानांवर दिसतील. पण मुली? मुलींनी खेळणंच आपल्या समाजात बातमीचा विषय. आता महिला आयपीएल होणार असलं तरी एकुणच मुलींच्या खेळाकडे काहीतरी टामटूम म्हणून पाहिलं जातं. आजही हे वास्तव आहे. कटू असलं तरीही. आता काल वर्ल्ड चॅम्पिअनशिपमध्ये ५२ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकणारी बॉक्सर निखत झरीन. तिची गोष्ट तरी काय वेगळी आहे. लहान लहान शॉर्ट्स आणि टी शर्ट्स घालून मुलगी खेळणार का? त्यातही बॉक्सिंग. डोळ्यावर ठोसा बसला, चेहऱ्याचं रंगरुप बदललं तर लग्न कोण करणार पोरीशी असं तिच्या आईवडिलांना सांगायलाही नातेवाईकांनी कमी केलं नाही. मात्र लेक चॅम्पिअन खेळाडू व्हावी असं स्वप्न वडिलांनी मनाशी बाळगलं आणि लेकीच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. एकदा निखतच्या डोळ्याला पंच बसला, ब्लॅक आय, काळानिळा झाला डोळा, आई वैतागून म्हणाली लग्न कसं होणार चेहरा असा बिघडला तर? त्यावर वडील म्हणाले, थांब, एक दिवस लेकीच्या कौतुकासाठी रांगा लागतील आपल्या घराबाहेर. आणि तो दिवस उजाडलाच. आता जगभरात त्यांच्या लेकीचं कौतुक होतं आहे.
(Image : Google)
पण सोपा नसतोच इथवर प्रवास. भारतात तर नसतोच खेळाडू होऊ पाहणाऱ्या मुलींची वाट,निखतची गोष्टही तशीच. तिचे वडील मोहंमद जमील स्वत: खेळाडू होते. ते फुटबॉल, क्रिकेट खेळत. त्यांना चार मुली. निखत तिसरी. आपल्या मुलींनीही खेळावं असं त्यांना वाटे. पण बाकी मुलींना खेळाचा ध्यास नव्हता, आवडीपुरता खेळ मर्यादित राहिला. निखतमध्ये मात्र ते पॅशन होतं. वयाच्या १४ व्या वर्षी ती वर्ल्ड युथ चॅम्पिअन झाली. खेळत होती. साईचं प्रशिक्षणही मिळालं. उत्तम काेचही लाभले. त्यात घरात तिचे काका बॉक्सर. त्यांची मुलं इथेशामुद्दीन आणि इमीशामुद्दीन दोघे बॉक्सर. निजामाबादच्या या कुटुंबाला खेळाचं वेड होतं. पण तेलंगणातल्या छोट्या शहरात मुलांनी खेळण्याला हरकत नव्हती, मुलींनी खेळाचं मात्र भवताली सर्वांनाच वावडं होतं. त्यात लहान लहान कपडे घालून मुलगी घराबाहेर खेळायला जाते हे तर फारच खूपत होतं. वडील मात्र निखतच्या मागे उभे राहिले.
(Image : Google)
मुलींनी खेळावं शिकावं म्हणून त्यांनी कष्टही उपसले. आता निखतच्या मोठ्या दोन बहिणी डॉक्टर आहेत. निखत तर बॉक्सिंग करिअर शिखरावर नेतेय. मेरी कोमच्या छायेत तिचं करिअर उभं राहिलं. इंज्युरीत काही वर्षे वाया गेली. पण ती हरली-खचली नाही. तिनं आपलं चॅम्पिअन होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत निखतचे वडील म्हणतात ते अगदी खरंय, निखतच्या यशानं मुस्लीम आणि सर्वच तरुण मुलींना आपली स्वप्न साकार होऊ शकतात, आपण मोठी झेप घ्यायला हवी असं वाटू लागेल. आणि ते वाटणंच महत्त्वाचं आहे.ज्या देशात मुलींच्या खेळण्यालाच नाही तर स्वप्नांनाही अजून दुय्यम स्थान आहे तिथं निखतचं निखळ यश फार महत्त्वाचं ठरतं.