आपण अंतराळात जावं, तिथून पहावं आपली पृथ्वी कशी दिसते हे स्वप्न लहानपणी किती मुली पाहतात. पण मोठं होताहोता ती स्वप्न तशीच राहतात आणि जगण्याचं अवकाश भलत्याच दिशेला घेऊन जातो. पण अथिरा प्रिथा रानी या मुलीचं तसं झालं नाही. तिनं जी स्वप्न पाहिली ती जिद्दीनं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि आता वयाच्या फक्त २४ व्या वर्षी तिनं आपलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं एक मोठी भरारी घेतली आहे. अथिरा प्रिथा रानीची नासाच्या अवकाश प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. हे प्रशिक्षण तिथं यशस्वीरित्या पूर्ण केलं तर सुनीता विल्यम्स, कल्पना चावला यांच्यानंतर अवकाशात जाणारी ती तिसरी भारतीय महिला ठरु शकेल.
(Image : google)
केरळच्या तिथरुवनंतपुरमची अथिरा. लहानपणापासूनच तिचं स्वप्न होतं आपण अवकाशात जायचं. आपण ॲस्ट्रॉनॉट व्हायचं. त्यासाठी तिनं पायलट व्हायचं ठरवलं आणि तिनं त्यासाठीचं प्रशिक्षणही घेतलं. त्यानंतर तिनं रोबोटिक्सचा अभ्यास करण्यासाठी कॅनडा गाठलं. कॅनडातल्या ओटावा येथील अल्गोनिक्विन कॉलेजमधून तिनं रोबोटिक्सची डिग्रीही घेतली. यासाऱ्या प्रवासात ती गोकुळच्या प्रेमातही पडली. दोघांनी लग्न केलं. त्या दोघांनी मिळून एक्सो जिओ नावाची एक कंपनीही सुरु केली. त्यांचं असं उत्तम सुरु असतानाही अथिराच्या मनात आपलं अवकाशात जाण्याचं स्वप्न काही काळवंडलेलं नव्हतं. त्यासाठी ती प्रयत्न करतच होती. त्यातून ती नासाच्या अंतराळ प्रशिक्षण निवड प्रक्रियेत सहभागी झाली. जगभरातून अनेकजण त्यात सहभागी झाले, त्यातून निवडक काहीजणांची प्रशिक्षणासाठी निवड झाली. त्यापैकीच एक अथिरा. इंटरनॅशनल इन्स्टिस्ट्यूट ऑफ ॲरॉनॉटिकल सायनस ॲस्ट्रॉनॉन ट्रेनिंग प्रोग्राम यासाठी तिची निवड झाली आहे. नासा, कॅनडिअन स्पेस एजन्सी, नॅशनल रिसर्च कौन्सिल ऑफ कॅनडा यांच्यावतीने हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. किमान ३ ते ५ वर्षे हे ट्रेनिंग चालेल. तांत्रिक, शारीरिक, मानसिक कौशल्यांचा तिथं कस लागेल आणि ते प्रशिक्षण जर यशस्वरित्या पूर्ण केलं तर अथिराला अंतराळात जाण्याची, स्पेस मिशनमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकेल.
आता त्यादृष्टीनं तिची वाटचाल सुरु झाली आहे. मूळ भारतीय असलेल्या अथिराच्या जिद्दीचं आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या मेहनतीचं म्हणूनच कौतुक करायला हवं.