माधुरी पेठकर
समोर आव्हानं असतील तर प्रयत्नांना आणखी धार चढते, असा टीनेसा कौर या ३२ वर्षीय महिलेचा अनुभव आहे. भारतीय वंशाच्या या शीख महिलेने इंग्लंडमधे स्वत:ची ओळख तयार केली. एक वेळ टीनेसा स्वत:च निराधार होती, तीच टीनेसा आज इंग्लंडमधील तरुण मुलांच्या आयुष्याला योग्य दिशा मिळावी म्हणून प्रयत्न करते आहे. टीनेसा कौरला नुकताच इंग्लंडमधील वकिली पेशातला अत्यंत मानाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळेच जगाला टीनेसा कौर कोण आहे, तिचं काम नेमकं काय हे समजलं.
एकवेळ होती टीनेसाला इंग्लंडमधे राहायला घर नव्हतं. ती शाळेत असतानाच टीनेसाचे वडील घरातून निघून गेले. ती रस्त्यावर आली. तेव्हा ती १७ वर्षांची होती. रस्त्यावरचं असुरक्षित जगणं, टवाळांचा त्रास या साऱ्याला तोंड देत तिने त्याही परिस्थितीत आपलं शिकणं सुरू ठेवलं. नंतर टीनेसाच्या वडिलांना पोलिसांनी पकडलं, तुरुंगात टाकलं. पण तिला स्वत:च्या पायावर उभं राहण्यावाचून पर्याय नव्हता. तिनं वकील व्हायचं लहानपणापासून ठरवलं होतं. पश्चिम लंडनमधील ग्रीनफोर्ड येथील शीख समुदायानं तिला मदत केली. त्या मदतीच्या जोरावर शालेय शिक्षण पूर्ण केलं. २०१३ मध्ये तिने कायद्याची पदवी घेतली. पुढच्या सहा वर्षांत तिने बारचा अभ्यास पूर्ण केला आणि तिला बारमधून बोलावणंही आलं. वयाच्या ३२ व्या वर्षी टीनेसाला शिष्यवृत्ती मिळाली आणि नुकताच 'यंग प्रो बोनो बॅरिस्टर ऑफ द इयर' हा अत्यंत मानाचा पुरस्कारही तिने मिळवला.
रस्त्यावर राहून आपलं स्वप्नं पूर्ण करण्याच्या या प्रवासात गरजूंना मदत करणं, जे नाडले गेले आहे त्यांना न्याय मिळवून देण्याचं कामही टीनेसाने सुरू ठेवलं होतं. इंग्लंडमधील वंचित समुदायांना कायद्याची मदत ती मिळवून देते. मानवी अधिकारांसाठी लढा देते. 'जस्ट कट इट आउट नाऊ' हा उपक्रमही चालवते. स्वत:समोर हजार समस्या असताना ती इतरांच्या मदतीसाठी प्रयत्न करते आहे.