अनन्या भारद्वाज
नूशीन अल खादीर (Nushin al Khadeer). हे नाव कालपर्यंत ना लोकप्रिय होतं ना कुणा सेलिब्रिटीचं होतं ना माध्यमांच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं, पण आज ते नाव महत्त्वाचं आहे. नव्हे, नूशीनने हे सिद्ध केलं आहे की, मी आणि माझ्यासारख्या या देशातल्या स्वप्न पाहणाऱ्या, लढणाऱ्या, प्रसंगी हरणाऱ्या, पण न रडता पुन्हा लढायला उभ्या ठाकणाऱ्या आम्ही साऱ्या जणी महत्त्वाच्या आहोत. तुम्ही आम्हाला मोजा ना मोजा, आम्ही आहोत आणि आम्ही चॅम्पियन होऊ शकतो. त्या चॅम्पियन मुलींची ही गोष्ट. भारतीय महिला संघाने अण्डर १९ विश्वचषक जिंकण्याची गोष्ट आणि त्या जिंकण्याच्या स्वप्नाची नूशीनची गोष्ट (Indian Womens Cricket Under 19 World Cup Championship).
नूशीन मूळची कर्नाटकाच्या कळबुर्गीची. आता वयाच्या चाळीशीत असलेली, भारतीय संघात एके काळी खेळणारी उत्तम खेळाडू. २००५ मध्ये भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध विश्वचषक फायनल खेळायला मैदानात उतरला आणि त्या सामन्यात शेवटची विकेट पडली ती नूशीनची. भारतीय संघ हरला आणि ऑस्ट्रेलियाने विश्वचषक स्पर्धा जिंकली. १८ वर्षे उलटली त्या घटनेला, पण नूशीनच्या मनात ती बोच कायम होती. समोर विश्वचषक होता आणि आपल्या संघाने, आपण तो गमावला. क्रिकेट ती खेळतच होती, पण एक संधी पुन्हा दार ठोठावत आली. अंडर १९ महिला संघाची प्रशिक्षक व्हायची संधी नूशीनला मिळाली. तिच्यासमोर होत्या देशभरातून आलेल्या १६ मुली. वय वर्षे जेमतेम १५ ते १९ वयातल्या. मात्र, अनेक जणी गावखेड्यातल्या, हातातले स्मार्टफोन आणि रील्स परिचयाचे असले, तरी ‘इंडिया’च्या जेन झी पेक्षा पूर्णत: वेगळं आणि आव्हानात्मक आयुष्य जगणाऱ्या ‘भारता’तल्या मुली.
ज्यांना क्रिकेट खेळण्यासाठीच झगडावं लागलं, मुलांसोबत खेळावं लागलं. आर्थिक परिस्थिती तर इतकी परीक्षा पाहणारी की, मोठी स्वप्न पाहूच नयेत, पण तरी या जेमतेम टीनएजर मुली भारतीय संघापर्यंत पोहोचल्या होत्या आणि त्यांच्यासमोर १५ जणांचा सपोर्ट स्टाफ घेऊन उभी होती नूशीन. नूशीन सांगते, ‘एक फायनल मी हरले होते. यावेळी मात्र मी ठरवलं होतं, रिकाम्या हातानं परतायचं नाही. माझ्यासोबत झपाटून खेळणाऱ्या मुलींचा संघ होता, सपोर्ट स्टाफ होता. मी मुलींना एकच सांगत होते, आपल्याला जिंकायचं आहे. तुम्ही जिंकू शकता, तुमच्यात क्षमता आहे. मुळात एक खेळाडू म्हणून आमची ताकद काय असते, तर जिंकण्याचं स्वप्न पाहणं. हार वाट्याला येतेच कधीतरी, पण ती स्वीकारून अपयशाचं रूपांतर यशात, जिंकण्यात करणं, हे एवढंच तर हातात असतं. माझ्या आणि माझ्या डोळ्यासमोर फक्त हा अंडर १९ वर्ल्ड कप होता.’
फायनल ते फायनल हा नूशीनचा प्रवास सगळ्या मोटिव्हेशनल भाषणांपलीकडे जाणारा केवळ जिद्द आणि मेहनत यांचा प्रवास आहे. ‘या काय करणार?’ म्हणून ज्यांनी-ज्यांनी आजवर या मुलींना नाकं मुरडली, त्या सर्वांसाठी ‘धडा’ आहे.
...आणि त्याचं उत्तम उदाहरण आहे शफाली वर्मा.
वयाच्या सोळाव्या वर्षी आणि केवळ सोळा आंतरराष्ट्रीय सामन्यांतच टी-२०मधील ती जगातील पहिल्या क्रमांकाची खेळाडू बनली होती. ती अंडर नाइनटीन संघाची कप्तान झाली, ते केवळ वय कमी आणि अनुभव दांडगा म्हणून. हरयाणातली शफाली. एका सर्वसामान्य घरातली मुलगी. तिच्या वडिलांचं सराफा व्यवसायाचं एक छोटंसं दुकान आहे. त्यांना स्वत:लाही क्रिकेटची फार आवड, पण त्यांचं क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही. ते मुलानं, साहिलने करावं, म्हणून त्यांनी त्याला क्रिकेटचं ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. शफाली, पण उत्तम क्रिकेट खेळू शकते, हे वडिलांच्या लवकरच लक्षात आलं. ती भावापेक्षा जास्त दणकून बॉल हाणायची. गल्लीत मुलांबरोबर क्रिकेट खेळू लागली, पण मुलं म्हणत, ‘अरे, तू तो छोरी है. तू क्या क्रिकेट खेलेगी? चल हट. बॉल-वॉल लग जाएगा, तो रोते बैठोगी.’
एक दिवस ती वडिलांना म्हणाली, ‘वो लडके मुझे खिला नहीं रहे है, मैं मेरे बाल कटवा सकती हूं क्या?’ वडीलही तिला म्हणाले, ‘क्रिकेट के लिए तू कुछ भी कर सकती है.’त्याच दिवशी शफाली आपले मोठे केस कापून आली. त्या दिवसापासून ते अगदी आजपर्यंत तोच तिचा हेअरकट आहे! आणि ब्रीद तेच, ‘क्रिकेट के लिए तू कुछ भी कर सकती है!’
शफालीने हा विश्वचषक जिंकेपर्यंत तेच केलं. ती मैदानात उतरली की बॉलरला बुकलून काढते, या स्पर्धेत कप्तान म्हणूनही तिने तिची पात्रता सिद्ध केली आहे. शफाली आणि नूशीन या काही दोनच मुलींची ही गोष्ट नाही. संघात खेळलेल्या प्रत्येकीची अशी कहाणी आहे. कुणाच्या मागे वडील, कुणाचा भाऊ, शिक्षक, आई अतिशय खंबीरपणे उभे राहिले. आपल्या लेकीनं क्रिकेट खेळावं, म्हणून त्यांनी दुनियाभरची दुषणं ऐकली, त्रास सहन केला. पैसा उभा केला, पण मुलींना क्रिकेट सोड, असं म्हटलं नाही. आज त्याच मुली देशासाठी विश्वचषक जिंकून आल्या आहेत. उद्या आयपीएल खेळतील, पैसाही कमावतील... मात्र, आजची त्यांची गोष्ट एकच सांगते, भारतीय महिला क्रिकेट बदलत आहे... जिंकत आहे...