Join us  

India’s First lady Detective : भारतातील पहिल्या महिला गुप्तहेर, 80 हजार प्रकरणांचा छडा लावणारी डिटेक्टिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2022 4:30 PM

India’s First lady Detective : गुप्तहेरीच्या बाबतीत जेम्स बॉंडपेक्षा कमी नसलेली एक महिला भारतातील पहिली महिला गुप्तहेर म्हणून नावारुपास आली.

ठळक मुद्देपुरुषांचे क्षेत्र समजल्या जाणाऱ्या या क्षेत्रात एका महिलेने अशाप्रकार आपली ओळख निर्माण करणे हे नक्कीच सोपे काम नव्हते. आपल्या कौशल्याच्या आधारावर त्यांनी आजपर्यंत ८० हजारांहून अधिक लहान-मोठी प्रकरणे हाताळली आहेत.

गुप्तहेर म्हटला की एखादा भारदस्त पुरुष अशी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उबी राहते. याचे कारणही तसेच असते. गुप्तहेर म्हणून काम करण्यामध्ये अनेक अडचणी असतात. विशिष्ट माहिती शोधून काढण्यासाठी एखाद्या गोष्टीवर किंवा व्यक्तीवर बारीक लक्ष ठेवावे लागते. इतकेच नाही तर हे काम करताना जीवालाही धोका असू शकतो. त्यामुळे महिला साधारणपणे या क्षेत्रात येताना बराच विचार करतात. (India’s First lady Detective) पण आपल्या गुप्तहेरीच्या बाबतीत जेम्स बॉंडपेक्षा कमी नसलेली एक महिला भारतातील प्रसिद्ध गुप्तहेर म्हणून प्रसिद्ध आहे, त्यांचे नाव आहे रजनी पंडित (Rajani Pandit). या क्षेत्रात काम करताना त्यांच्यासमोरही अनेक आव्हाने आली, पण त्यांनी हार न मानता आपल्या कौशल्याने या आव्हानांचा सामना केला. पाहूयात रजनी कशा झाल्या देशातील पहिल्या गुप्तहेर म्हणून प्रसिद्ध...

(Image : Google)

कोण आहेत रजनी पंडित ? 

एका सामान्य घरातून आलेल्या रजनी तुमच्या आमच्या सारख्याच होत्या. स्वत:च्या पायावर उभे राहायचे स्वप्न पाहणाऱ्या रजनी यांनी महाविद्यालयात पदवीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतल्यानंतर नोकरी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्या एका कार्यालयात कारकून म्हणून रुजू झाल्या. याठिकाणी काम करत असताना त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका महिलेच्या घरात नियमित चोरी होत असल्याचे त्यांना कळाले. त्यावेळी या महिलेला आपली सून चोरी करत असल्याचा संशय होता. पण रजनी यांनी केलेल्या शोधात त्यांची सून नाही तर त्यांचा मुलगाच चोर असल्याचे समोर आले. चौकशीमध्ये मुलाने आपला गुन्हा कबूलही केला. ही त्यांची पहिलीच केस होती, त्यावेळी त्या अवघ्या २२ वर्षांच्या होत्या. 

कौटुंबिक पार्श्वभूमी 

रजनी यांचे वडील शांताराम पंडित पोलिस खात्यात होते, त्यामुळे गुप्तहेरीबाबत त्यांना चांगले ज्ञान होते, त्यांच्याकडून रजनी यांना बऱ्याच गोष्टी कळत गेल्या. रजनी पंडित यांच्या गुप्तहेरीविषयी जेव्हा लोकांना समजले तेव्हा लोक आपल्या अडचणी घेऊन रजनी यांच्याकडे येऊ लागले. त्यानंतर रजनी प्रसिद्ध होऊ लागल्या आणि त्यांची पहिली भारतीय महिला गुप्तहेर म्हणून ओळख निर्माण झाली. रजनी यांच्या या कामाबाबत त्यांच्या वडिलांना सुरुवातीला कल्पना नव्हती. पण जेव्हा त्यांना हे कळाले तेव्हा त्यांनी रजनी यांना हे काम करण्यापासून न रोखता या क्षेत्रात असलेल्या आव्हानांबाबत जागरुक केले. मात्र त्यानंतर रजनी यांनी खुलेपणाने आपले गुप्तहेरीचे काम सुरू केले. 

जीवनातील सर्वात अवघड केस कोणती होती? 

एका पुत्राची हत्या झालेली असताना ही हत्या कोणी केली याचा काही केल्या तपास लागत नव्हता. ही केस रजनी यांच्याकडे आली. तेव्हा या पिता-पुत्राच्या घरात कामवाल्या बाईचा वेश करुन रजनी गेल्या. याठिकाणी ६ महिने घरकाम केल्यानंतर रजनी यांना खऱ्या मारेकऱ्याचा तपास लागला. घरात उपस्थित असलेल्या महिलेनेच आपल्या प्रियकराच्या साथीने या दोघांची हत्या केल्याचे त्यांच्या तपासातून समोर आल्याचे त्या सांगतात. मात्र अशाप्रकारचे काम त्यांना गुप्तहेर म्हणून काम करताना करावे लागले. 

(Image : Google)

असा होता करिअर ग्राफ...

अशाप्रकारे गुन्हेगारी क्षेत्रात गुप्तहेर म्हणून काम करणाऱ्या रजनी यांनी प्रत्यक्ष काम १९८३ मध्ये सुरू केले असले तरी १९९१ मध्ये त्यांनी आपली गुप्तहेर यंत्रणा रजिस्टर केली. पुरुषांचे क्षेत्र समजल्या जाणाऱ्या या क्षेत्रात एका महिलेने अशाप्रकार आपली ओळख निर्माण करणे हे नक्कीच सोपे काम नव्हते. मात्र आपल्या कौशल्याच्या आधारावर त्यांनी आजपर्यंत ८० हजारांहून अधिक लहान-मोठी प्रकरणे हाताळली आहेत. करीयर करत असताना आपल्याला फॅमिली नको या विचारातून त्यांनी लग्नही केले नाही. आतापर्यंत त्यांना त्यांच्या अमूल्य अशा कामासाठी अनेक सन्मान मिळाले असून चेहऱ्यामागचा चेहरा आणि मायाजाल या पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.  

 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी