दैनंदिन जीवनात उतार वयातही काबाड कष्ट करून पोट भरणारे अनेक चेहरे आपल्याला दिसतात. सामाजिक जाणिवेतून त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं खूप कमी लोकांना वाटतं. सोशल मीडियावर एक मनाला भिडणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जगात माणूसकी अजूनही शिल्लक आहे याचा प्रत्यय हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच येईल. रस्त्यावर कचरा वेचणाऱ्या आजींना मदत करणारा एक तरूण आणि त्याचे प्रामाणिक प्रयत्न या व्हिडियोच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत. (Boy surprises to women who working on road video goes viral)
या आजीचं वय जवळपास ७५ वर्ष असावं. व्हिडिओच्या सुरूवातीला या आजी कचरा वेचत असतात एक तरूण त्या ठिकाणी येऊन तुम्ही कचरा वेचत आहात का? या कचऱ्याचं तुम्ही काय करता असं विचारतो. यावर आजी मी हा कचरा विकते असं सांगतात. त्यानंतर तो आजींसोबत एक कप चहा पितो आणि त्यांच्या घरी जातो. घरी पोहोचल्यानंतर आजी घरच्या बिकट स्थितीबद्दल त्याला सांगतात आणि भावूक होतात. त्यानंतर हा तरूण त्यांना किराणामालाच्या दुकानात घेऊन जातो.
त्यानंतर एका भाजी मंडईतून गोण्याभरून भाज्या घेऊन त्या कारमध्ये ठेवतो. यावेळी आजींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो. भाज्या घेतल्यानंतर एक नवी कोरी हात गाडी आणि वजन काटा विकत घेतात. हा व्हिडिओ जसजसा पुढे जातो तशी पाहणाऱ्याची उत्सुकता शिगेला पोहोतचे. हा तरूण एव्हढ्यावरच थांबत नाही तर तो आजींना साडीच्या दुकानात घेऊन जाऊन नवी कोरी साडी घेऊन देतो. आजींच्या घराबाहेर हात गाडी लावून सर्व भाजीपाला त्यावर ठेवतो, आजी वजन काटा आणि नव्या हातगाडीची पूजा करतात आणि कामाला शुभारंभ करतात.
यावेळी आजूबाजूचे सगळेचजण आजींचा नवा व्यवसाय पाहायला जमा होतात. आजी या तरूणाला भरभरून आर्शिवाद देतात आणि व्हिडिओचा शेवट होतो. 'व्हेरी गूड, देव तुम्हाला नेहमी सुखी ठेवो. अशी कमेंट एका युजरनं हा व्हिडिओ पाहून केली आहे. जवळपास १ लाखांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. या व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी त्याला सलाम ठोकत आहेत. 'मन जिंकलंस' असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे.