विलास जळकोटकर
मृत्यूनंतरही आई आपल्या मुलाच्या विवाह सोहळ्यात आशीर्वाद देण्यासाठी आली. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना. हो ही गोष्ट खरीय. पण प्रत्यक्ष देहरुपानं नव्हे. अवयवदानाच्या रुपानं ती माता ज्या रुग्णाला अवयव प्रत्यारोपण केलं त्याच्या रुपानं अवतरली. मुलाला आशीर्वाद दिला. या भावनिक प्रसंगानं अवघा मांडव गलबलून गेला. सोलापुरातील पूर्व भागात गुण्यागोविंदानं नांदणारं चंद्रकांत निली हे हसतं खेळतं कुटुंब.. अचानक या सुखी संसाराला दृष्ट लागली अन् घरातील रथाच्या दोन्ही चाकापैकी एक शारदा नीली यांच्या रुपानं जानेवारी २०२२ रोजी निखळलं. वैद्यकीय तज्ञांनी उपचार केले मात्र पदरी निराशा आली. त्यावेळी कुटुंबीयांनी डॉ. संदीप होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शारदा निली यांचं अवयव दान झालं होतं.
डायलिसिस पेशंट असणारे बार्शीचे राहुल जयस्वाल यांना शारदा निली यांच्या किडनीचं बार्शीच्या राहूल जयस्वाल यांना प्रत्यारोपण झालं होतं. यामुळे त्यांना नवजीवन मिळालं. अवयवदानाच्या रुपानं का होईना आपली पत्नी या जगात आहे अशी भावना बाळगून चंद्रकांत विडप कुटुंबीय आपल्या दिनचर्येत रमले.
दहा महिन्यानंतर २८ नोव्हेंबरला चंद्रशेखर निली आणि स्व. शारदा निली यांचा मुलगा नितीन याचा पुरुषोत्तम विडप यांचं विवाह योग जुळून आला. निली कुटुंबीयांना किडनी दिलेल्या रुग्णांची माहिती होती. या विवाह सोहळ्याला अवयव रुपानं संबंधीत रुग्णानं उपस्थित राहावं, अशी निली कुटुंबीयांची इच्छा होती.
त्यानुसार डॉ. संदीप होळकर यांनी जयस्वाल कुटुंबीयांना लग्नाचं निमंत्रण दिले. विनंतीनुसार निली यांची ज्यांना किडनी प्रत्यारोपण झाली ते राहुल जयस्वाल आणि त्यांचे आई, वडीलही या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिले. त्यांनीही निली कुटुंबीयांचे आभार मानताना शारदा निली यांच्या किडनी प्रत्यारोपणामुळेच आपल्या मुुलाला जीवदान मिळाले अशी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. मांडवात उपस्थित शेकडो लोकांच्या उपस्थितीत प्रत्येकानं अवयवदान चळवळीला हातभार लावावा, अशी इच्छा व्यक्त केली.आई मानून केले चरणस्पर्श
नवदाम्पत्य नितीन आणि भावना या दोघांनी अवयवदान प्रत्यारोपन झालेल्या राहुल जयस्वाल यांना आई समजून नमस्कार केला. जणू आपली आईच लग्न मंडपात आशीर्वाद देण्यासाठी आली आहे, या समर्पित भावनेने चरणस्पर्श केला. या प्रसंगाने निली कुटुंबीय भारावले. त्यांचे डोळे दु:खावेग आणि आनंदाश्रूने डबडबले. या माध्यमातून स्व. शारदा निली यांचे पती चंद्रकांत निली आणि मुलगा नितीन यांनी समाजाला अवयवदानाचा संदेश दिला.अवयवदान ही काळाची गरज आहे. मेंदूमृत रुग्णांच्या नातेवाइकांनी सामाजिक भावनेतून अवयवदान केले तर अवयवाच्या रुपाने तो आयुष्यभर जिवंत राहतो. मृत्यूनंतरही आपला अवयव गरजूच्या कामी येऊ शकतो, ही आत्मिक समाधानाची बाब आहे.- डॉ. संदीप होळकर, अवयवयदान प्रत्यारोपणतज्ज्ञअवयवदानाचा संदेश पेरला
अवयवदानाबद्दलची गुप्तता बाळगली जाते. मात्र याच काळात विडप कुटुंबीयांनी आपलं माणूस या जगात नाही तरी ज्यांना किडनी प्रत्यापण झालं याची माहिती त्यांनी मिळवली. यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील मंडळीशी हातापाया पडून आपल्या मुलाचं लग्न आहे. त्याला आशीर्वाद देण्यासाठी अवयव प्रत्यारोपण केलेल्या रुग्णानं उपस्थित राहवं अशी प्रामाणिक भावना व्यक्त केली. अन् त्यानंतर सर्व हालचाली झाल्या. या निमित्तानं अवयवदानामुळं कोणाचातरी जीव वाचू शकतो हा संदेश या निमित्तानं पेरला गेला.