Join us  

पतीची आत्महत्या, 7000 कोटीचं कर्ज आणि.. सीसीडीच्या मालविका हेगडेंनी कशी घेतली यशस्वी झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 3:52 PM

नवऱ्यानं आत्महत्या केली. कंपनीवर हजारो कोटींचं कर्ज आणि 25 हजार कर्मचाऱ्यांचं धोक्यात आलेलं भविष्य. आपल्या वैयक्तिक हानीचं दु:ख बाजूला ठेवून मालविका हेगडी सीसीडीसाठी खंबीरपणे उभ्या राहिल्या. पडद्यामागून काम करणाऱ्या मालविकांनी आघाडीवर येऊन सर्व भार स्वत:च्या खांद्यावर पेलला आणि सीसीडीहा विश्वासाचं आणि लोकप्रियतेचं वैभव मिळवून दिलं. 

ठळक मुद्देआपल्या नवऱ्याच्या या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी आपलं वैयक्तिक दु:ख, हानी मालविका यांनी बाजूला ठेवून एक करारी, जबाबदार, कर्तव्यनिष्ठ आणि पक्का निर्धार केलेल्या व्यावसायिकाची भूमिका धारण केली.आज व्यावसायिक क्षेत्रात मालविका यांनी दाखवलेली हिंमत आणि कर्तृत्त्वाच्या बळावर 'वाॅरियर लेडी' म्हणून ओळख निर्माण केली आहे.2019मधे सीडीईएलवर असलेल्या 7200 कोटींचा कर्जाचा बोजा कमी करुन आज केवळ कंपनीला1731 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करायची आहे.

मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारायच्या आहेत, काही बिझनेस संदर्भात नवीन योजनांबद्दल बोलायचं आहे, मिळवलेल्या यशाची आपल्या प्रियजनांना ट्रीट द्यायची आहे तर मग चला सीसीडीला.. सीसीडीला जाऊन बसणं, मनमुराद गप्पा मारणं सोबत आपल्या आवडत्या काॅफीचा आस्वाद घेणं ही अनेकांच्या सुखाची कल्पना झाली आहे.2019 पर्यंत  सीसीडीने आपल्या सेवेने, सेवेतील आपुलकीच्या भावनेने देशभरातील ग्राहकांशी भावनिक नातं जोडलं होतं. सीसीडी ही अनेकांसाठी आपुलकीची आणि हक्काची, स्ट्रेस घालवून निवांत होण्याची जागा बनली होती  पण आपलं आवडतं सीसीडी आता बंद होंणार या शंकेनं कितीतरी लोकांच्या हदयात वेदनेची कळ उठली होती.

Image: Google

मार्च 2019 मध्ये व्ही.जी सिध्दार्थ सीसीडीचे संस्थापक यांना आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या बायकोप्रमाणेच सर्वांना कळालं की सीसीडी ही तोट्यात चालू आहे. कंपनीवर हजारो कोटींचे 7200 कोटी रुपयांचं कर्ज आहे. आयकर विभागाच्या तगाद्यानं हैराण केलं आहे, कंपनीतील गुंतवणूकदारांचाही विश्वास उडाला आहे.. हा सर्व ताण सहन न झाल्यानं सिध्दार्थ यांनी आत्महत्या केली होती. ही बातमी प्रसिध्द झाल्या झाल्या ज्यांना सीसीडीत जाऊन बसायची सवय होती त्यांच्या डोळ्यासमोर सीसीडी क्लोज्ड नावाचे बोर्ड येऊ लागले. या बातमीनं सीसीडीचा ग्राहक एवढा हादरला होता तर प्रत्यक्ष देशभरातील सीसीडीच्या शाखांमधील कर्मचाऱ्यांचं काय झालं असेल? सिध्दार्थ यांच्या कुटुंबियांची काय अवस्था असेल असे प्रश्न तेव्हा पडले होते. 

पण तीन वर्षांच्या आतच सीसीडीच्या कार्यकारी अध्यक्षांमुळे राखेतून जसा फिनिक्स पक्षी नव्या उमेदीने झेप घेतो तशी झेप कंपनीने घेतल्याच्या बातम्या प्रसिध्द होऊ लागल्या, तशा लोकांच्या भुवया उंचावल्या. मालविका हेगडे य कर्तबगार स्त्रीकडे संपूर्ण देशाचं लक्ष गेलं. व्यावसायिक क्षेत्रात मालविका हेगडे यांची ओळख होती. पण सामान्यांनना ती माहीत असण्याचं कारण नव्हतं. पण आता मालविका हेगडे या चर्चेत आल्या कारण एकटीच्या खांद्यावर त्यांनी डबघाईला आलेल्या , दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या सीसीडीला वर आणलं आहे. व्यावसायिक जगात सीसीडीला पुन्हा प्रसिध्दीचं वलय प्राप्त करुन दिलं आहे. जुन्या गुंतवणूकदारांमधे आपली गुंतवणूक योग्य जागी असल्याचा विश्वास निर्माण केला आहे तर नवीन गुंतवणुकदारांना सीसीडीत गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित केलं आहे. आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना मी तुमच्या आर्थिक सुरक्षिततेची काळजी घेण्यास समर्थ आहे हा दिलासा दिला आहे. मालविका हेगडे म्हणजे सिध्दार्थ यांच्या पत्नी आणि 'काॅफी डे एंटरप्रायजेस लिमटेड'च्या कार्यकारी अध्यक्ष. आज व्यावसायिक क्षेत्रात मालविका यांनी दाखवलेली हिंमत आणि कर्तृत्त्वाच्या बळावर 'वाॅरियर लेडी' म्हणून ओळख निर्माण केली आहे. 

Image: Google

पण मालविका यांना आपल्या नवऱ्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. नवऱ्यानं बघितलेलं स्वप्न त्यांना पूर्ण करायचं आहे. आपल्या नवऱ्यानं आत्महत्या केली, कंपनीवर 7200 कोटींचं कर्ज या अशा आघातांनी मालविका सुरुवातीला कोसळल्या होत्या. त्यांच्याकडे इतकी वैयक्तिक गुंतवणूक  होती की त्या बळावर परदेशात जाऊन त्यांना सहज सन्मानानं जगता आलं असतं. पण मग असं केलं तर नवऱ्याच्या स्वप्नाचं काय, त्यानं एवढ्या कष्टानं उभ्या केलेल्या  साम्राज्याचं काय? सीसीडीतल्या 25000 कर्मचाऱ्यांचं काय? या प्रश्नांनी नवऱ्याच्या मृत्यूने कोलमडलेल्या मालविकामधील एक जबाबदार स्त्री खंबीर झाली आणि तिने मालविका यांना निर्धारानं उभं केलं.

Image: Google

पगारासाठी संपावर जाण्याच्या भूमिकेत असणाऱ्या आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना तुमचं आर्थिक भविष्य सीसीडीत सुरक्षित राहिल यासाठी मी बांधिल आहे. सीसीडीचं व्यवस्थापनं कंपनीवरील कर्जाचा बोजा कमी करुन कंपनीला पुन्हा  नफ्याच्या  आणि यशाच्या उंबरठ्यावर घेऊन येईल असं भावनिक आवाहन करणारं आणि व्यावसायिक आश्वासकता देणारं पत्रं लिहिलं. देशभरातील सीसीडीच्या सर्व शाखा सुरळीत सुरु राहिल्या. इकडे मालविका यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाला हाताशी धरुन आपलं सर्व कौशल्य पणाला लावून, वैयक्तिक गुंतवणूक कंपनीवरील कर्ज फेडण्यासाठी खर्च करुन सीसीडीचा कोसळता डोलाऱ्याला खंबीर खांब उपलब्ध करुन दिले.

Image: Google

कोविड 19 च्या साथीतही सीसीडीच्या सर्व शाखांनी उत्तम व्यवसाय केला. ग्राहकांशी पुन्हा त्याच ऊर्मीनं व्यावसायिक आणि भावनिकरित्या नातं निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या. जुन्या गुंतवणुकदारांचा ना तोटा होवू दिला ना कर्मचाऱ्यांना आर्थिक झळ पोहोचू दिली. 2019मधे सीडीईएलवर असलेल्या 7200 कोटींचा कर्जाचा बोजा कमी करुन आज केवळ कंपनीला1731 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करायची आहे. 

Image: Google

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एका 'मन की बात'मधे  देशाला आत्मनिर्भरतेची प्रेरणा देण्यासाठी सीसीडीचं उदाहरण दिलं होतं. तेव्हापासून सिध्दार्थ यांना सीसीडीला देशातील सर्वात यशस्वी आत्मनिर्भर कंपनी करायचं होतं. आपल्या नवऱ्याच्या या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी आपलं वैयक्तिक दु:ख, हानी मालविका यांनी बाजूला ठेवून एक करारी , जबाबदार, कर्तव्यनिष्ठ आणि पक्का निर्धार केलेल्या व्यावसायिकाची भूमिका धारण केली.

2019 पूर्वी सीसीडीत मालविका यांनी पडद्याच्या मागील भूमिका पार पाडल्या होत्या. इंजिनिअर झालेल्या मालविका यांनी आपल्या नवऱ्याच्या ध्येयामागे प्रेरणेच्या रुपात उभं राहाण्याचा निर्धार केला होता. पण नवऱ्याच्या मृत्यूने त्यांच्यावर आघाडीवर येवून जबाबदारी सांभाळण्याची , आव्हानं पेलून काम करण्याची वेळ आली. ही जबाबदारी एका व्यावसायिक निर्धारानं पार पाडताना सिध्दार्थ यांनी उभ्या केलेल्या साम्राज्याला व्यावसायिक जगात , जुन्या नव्या गुंतवंणुकदारात, ग्राहकांच्या विश्वात सन्मानाचं, आदराचं  विश्वासाचं आणि आपुलकीचं वैभव मिळवून दिलं आहे.  

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीमहिला