Join us  

जिद्द असावी तर अशी! इच्छाशक्तीमुळे ४२ व्या वर्षी झाल्या डॉक्टर, मेहनतीचा आदर्शवत प्रवास

By श्रीकिशन बलभीम काळे | Published: October 04, 2022 10:35 AM

Inspiring Journey of Dr. Sharda Bapat Who Become Doctor at The age of 42 : ३६५ दिवस काम करायचे होते. एकही सुटी न घेता बारा तास काम करून बापट यांनी ही क्लर्कशिप पूर्ण केली.

ठळक मुद्देवैद्यकीय प्रॅक्टिस करताना त्यांना अन्नात कस नसल्याने आजार वाढत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आता शाश्वत शेती करण्यावर लक्ष दिले आहे.हे करताना जो मोकळा वेळ मिळाला, त्यात पायलट लायसन्सचे प्रशिक्षण पूर्ण केले, त्यामुळे विमान उडविण्याचा आनंदही घेता आला असे डॉ. बापट सांगतात. 

श्रीकिशन काळे 

आईची तब्येत बरी नसते, म्हणून तिला बरं करण्यासाठी स्वत:च डॉक्टर होण्याचा निर्धार त्यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी केला. कला शाखेच्या असल्याने त्यांनी पुन्हा विज्ञान शाखेतून बारावी केली. महाविद्यालयात मेडिकलचे नियमित  शिक्षण घेण्यासाठी कुठेच प्रवेश मिळेना. मग त्यांनी परदेशातील विद्यापीठून डॉक्टरकीची पदवी घेण्याचे ठरवले. इतकेच नाही तर तब्बल ३६५ दिवस एकही सुटी न घेता क्लर्कशिप केली. लहान मुलाला सोडून, कुटुंबापासून दूर राहून अखेर ४२ व्या वर्षी त्या डॉक्टर झाल्या याचे एकमेव कारण म्हणजे अंगी असलेली जिद्द. त्यांचे नाव डॉ. शारदा बापट (Inspiring Journey of Dr. Sharda Bapat Who Become Doctor at The age of 42).

शिक्षण घेण्याची इच्छा ठायी असेल तर वय, देश अशा कोणत्याच सीमा त्याला रोखू शकत नाहीत, हेच डॉ. बापट यांनी दाखवून दिले. बी.ए नंतर बापट यांनी कॉम्प्युटर अॅप्लिकेशनचे शिक्षण घेतले. १९९३ मध्ये त्यांनी व्यावसायिक कामाला सुरुवात करत एलएलबीचे शिक्षणही घेतले. २००५ पर्यंत बापट यांनी इलेक्ट्रॉनिक सुरक्षा उपकरणांच्या व्यवसाय केला. दरम्यान त्यांच्या आईची तब्येत बरी नसल्याने मेडिकलविषयी शिक्षण घेण्याची इच्छा निर्माण झाली. ही इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न केल्याचे डॉ. बापट सांगतात. 

पायलट लायसन्स घेऊन आकाशात भरारी

हुजूरपागेत बारावी विज्ञान केले. त्यानंतर डॉक्टरकीच्या प्रवेशासाठी अनेक महाविद्यालयात चौकशी केली, पण वयामुळे प्रवेश मिळेना. मग फिलिपाइन्स विद्यापीठातर्फे मेडिकलचा अभ्यासक्रम करायचे ठरवून त्याला प्रवेश घेतला. यासाठी दोन वर्ष फिलिपाइन्समध्ये शिक्षण घ्यावे लागणार होते. घरी नवरा आणि लहान मुलाला सोडून परदेशात गेले. तिथे दोन वर्षांचे मेडिकल शिक्षण झाले. हे करताना जो मोकळा वेळ मिळाला, त्यात पायलट लायसन्सचे प्रशिक्षण पूर्ण केले, त्यामुळे विमान उडविण्याचा आनंदही घेता आला असे डॉ. बापट सांगतात. 

३६५ दिवस रोज बारा तास काम !

फिलिपाइन्समधील दोन वर्षाच्या मेडिकल शिक्षणानंतर रूग्णालयात एक वर्षाची क्लर्कशिप करायची होती. त्यात ३६५ दिवस काम करायचे होते. एकही सुटी न घेता बारा तास काम करून बापट यांनी ही क्लर्कशिप पूर्ण केली. त्यानंतर भारतात येऊन मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे प्रमाणपत्र पूर्ण केले. त्यासाठीही बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. मात्र वयाच्या ४२ व्या वर्षी जिद्दीने डॉक्टर झाले हा आनंद गगनात मावत नव्हता असे डॉ. बापट म्हणतात. 

आता शाश्वत शेतीकडे !

डॉ. शारदा बापट यांनी आता डॉक्टरकीच्या कामातून निवृत्ती घे शाश्वत शेती करण्याकडे वळल्या आहेत. वैद्यकीय प्रॅक्टिस करताना त्यांना अन्नात कस नसल्याने आजार वाढत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी वयाच्या ५६ व्या वर्षी आता शाश्वत शेती करण्यावर लक्ष दिले आहे. सध्या डॉक्टर आणि रूग्ण यांच्यात विश्वासाचे नाते राहिले नाही. प्रत्येकाला आपल्या गरजा भागवायच्या आहेत. मुलांचे शिक्षण व इतर खर्चासाठी नफेखोरी केली जाते. युनिव्हर्सल हेल्थकेअर सुविधा नागरिकांना मिळायला हवी, पण कोणीही त्याकडे लक्ष देत नाही. यासाठी आम्ही एक संघटना स्थापन करुन त्यामार्फत जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो असेही डॉ. बापट सांगतात. 

 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीपुणेडॉक्टर