Join us  

सातारची लेक चालवतेय पुण्याची मेट्रो! अपूर्वा अलाटकर झाली पुणे मेट्रोची पहिली महिला चालक, ती म्हणते ठरवलं तर..

By सायली जोशी-पटवर्धन | Published: August 21, 2023 1:52 PM

Inspiring Story of First Loco pilot of Pune Metro Apurva Alatkar From Satara : अमुक गोष्ट तू करु शकत नाही असं कोणी म्हटलं म्हणून निराश न होता, आपण जे ठरवू तेच करायचं असं मी ठरवलं, अपूर्वा अलाटकर सांगतेय..

सायली जोशी-पटवर्धन

महिलांनी गाडी चालवणे, तेही पुण्यासारख्या प्रचंड गर्दीच्या ठिकाणी याकडे आजही चेष्टेचा विषय म्हणूनच पाहिले जाते. महिलांना गाडी चालवता येत नाहीत, त्यांच्यामुळे अपघात होतात अशी दूषणे आजही बहुतांश जणांकडून दिली जातात. पुण्यासारख्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कितीही चांगली असली तरी स्वत:चे वाहन चालवण्यालाच प्राधान्य दिले जात असल्याने शहरातील आणि इतर शहरे किंवा राज्यातून शिक्षण, नोकरीसाठी येणारे सगळेच जण खाजगी वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. पुणेमेट्रो हे त्यादृष्टीने टाकलेले एक अतिशय आशादायी पाऊल आहे असे म्हणावे लागेल. यामुळे शहारातील वाहतूक व्यवस्थेवर येणारा ताण काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. अशातच पुणेमेट्रोचे स्टेअरींग सातारच्या तरुणीकडे जाणे ही अतिशय आनंदाची आणि महिलांसाठी प्रेरणादायी बाब आहे असे म्हणावे लागेल. पुणे मेट्रो चालवणाऱ्या या तरुणीचे नाव आहे अपूर्वा अलाटकर (Inspiring Story of First Loco pilot of Pune Metro Apurva Alatkar From Satara).

जिद्द असावी तर अशी! खेड्यात घर-वडिलांच्या बदल्या, इंजिनिअर होऊन करतेय चंद्रयान मोहिमेत काम

चांद्रयान मोहिमेचे नेतृत्व महिला करु शकते, फायटर जेटने आकाशात भरारी घेऊ शकते तर मेट्रो चालवण्याची जबाबदारी महिला का घेऊ शकत नाही असा अतिशय साधा प्रश्न अपूर्वाला पडला आणि सुरु झाला तिच्या जिद्दीचा प्रवास. महिलांना अमुक एक गोष्ट जमणार नाही किंवा तु या फंदात पडू नकोस असे कोणी अपूर्वाला म्हटले की आपण तेच करायचे अशी जिद्द कायमच तिच्यात असायची. याच जिद्दीतून अशक्य वाटणारी गोष्टही तिने शक्य करुन दाखवायचे ठरवले. अतिशय सामान्य कुटुंबातून आलेली तुमच्या आमच्या सारखीच ही तरुणी मेकॅनिकल इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण करते आणि वेगळी वाट धरायची या ध्येयापोटी जिद्दीने सरकारी नोकऱ्यांचे फॉर्म भरते. 

ट्रान्समिशन या क्षेत्राची लहानपणापासून असलेली आवड आणि सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करण्याची जिद्द असल्याने ती पुणे मेट्रोचा फॉर्म भरते. “मेट्रो चालवणं आपल्यासारख्याचं काम आहे का”, “तुला हे जमेल का”, “इतका ताण असणारा जॉब कशाला करायचा” अशा अनेक गोष्टी आजुबाजूला बोलल्या जात असताना ती मात्र तिच्या निर्णयावर ठाम असते. अखेर ही परीक्षा उत्तीर्ण होते, २ महिन्यांचे ट्रेनिंग यशस्वीपणे पूर्ण करते आणि इतक्या लहान वयात मेट्रोची धुरा आत्मविश्वासाने सांभाळते. तिला पाहून अनेकांच्या भुवया उंचावत असताना मुलगी असलो म्हणून काय झालं, ठरवलं आणि जिद्द असेल तर आपण सगळं काही करु शकतो असं अगदी ठामपणे सांगते. याच अपूर्वाशी लोकमत सखीने संवाद साधला असता तिने मोकळेपणाने आपले विचार मांडले..पहिल्यांदाच पुणे मेट्रो एका महिलेने चालवण्याबाबत ती काय म्हणते पाहूया...  

१. शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे? 

सातवीपर्यंतचे शिक्षण बापूसाहेब चिपळूणकर या शाळेत झाले. इयत्ता ८ वी ते १० वी गुरुकूल पद्धतीने अनंत इंग्लिश स्कूल शाळेत शिकले. सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत शाळा असायची. आठवीपासून सेमी इंग्रजी माध्यमातून शिकले पण गुरुकूल पद्धत असल्याने शाळेचे शेड्यूल टाइट असायचे. इंजिनिअरींग करायचे डोक्यात पहिल्यापासून नक्की होते त्यामुळे लगेचच डिप्लोमाला अॅडमिशन घेतली. टक्के चांगले असल्याने गव्हर्नमेंट कॉलेजला प्रवेश मिळाला. त्यावेळी ईएनटीसीची क्रेझ होती पण मला तिथे मिळाली नाही म्हणून मेकॅनिकलला प्रवेश घेतला. पुढे मेकॅनिकल आवडेल की नाही माहित नव्हतं पण ड्रॉईंग आवडत होतं आणि मेकॅनिकलला ड्रॉईंग वर्क खूप असायचं त्यामुळे इंटरेस्ट वाढत गेला. डिप्लोमा सोलापूरमधील महाविद्यालयातून केल्यानंतर डिग्री पुन्हा साताऱ्यातून पूर्ण केली. 

२. मेट्रो चालवू असं कधी वाटलं होतं का? अनुभव कसा आहे? 

मेट्रो चालवेन असा कधीही विचार केला नव्हता. पण परीक्षा दिली आणि सिलेक्शन झालं. तांत्रिक काम मुलांनी करावं असं म्हटलं जातं पण अमुक गोष्ट तुम्ही करु शकत नाही असं कोणी म्हटलं की मला तेच करायचे असते असा माझा लहानपणापासूनचा स्वभाव आहे. सिलेक्शन झाल्यावरही अनेक जण म्हणत होते जमतंय का नाहीतर राहूदे. पण आव्हान म्हणून मी ते स्वीकारले आणि करुनही दाखवले. मुलींनी ठरवले आणि जिद्दीने, प्रयत्नाने एखादी गोष्ट केली तर त्या काहीही साध्य करु शकतात हे नक्की.  

३. मेट्रो चालवताना आव्हानात्मक काय वाटतं? ताण कितपत असतो?

आव्हानात्मक म्हणजे आपण दुचाकी किंवा चारचाकी चालवतो तेव्हा २ किंवा ४ माणसे आपल्यासोबत असतात. पण इथे हजारो व्यक्तींना घेऊन जाण्याची जबाबदारी असते. त्यातही स्टेशन सुटले, उतरायला विसरलो अशा बऱ्याच गोष्टी होतात. तसेच गाडी चालवताना ट्रॅकमध्ये एखादा प्राणी आला, तांत्रिक अडचण निर्माण झाली तर त्यावेळी आव्हान असते. तारेत पतंग अडकणे, पक्षी अडकणे अशाही घटना घडतात रुट नीट सेट नसेल, रुटवर काही पडले असेल तर अशा बऱ्याच गोष्टी असतात. मात्र अशावेळी अलर्ट राहावं लागतं आणि डोकं शांत ठेवून निर्णय घ्यावा लागतो. ताणाचं विचाराल तर आजकाल प्रत्येकच क्षेत्रात ताण असतो. पण आवडीचं काम असेल आणि एकदा सवय झाली की तितका ताण वाटत नाही. 

४. पुण्यात महिलांच्या गाडी चालवण्याबाबत चेष्टा केली जाते, त्याबद्दल काय सांगाल? 

कोणतीही गोष्ट करताना प्रोत्साहन देणारे असतात तसंच नावं ठेवणारे आणि आडकाठी आणणारेही असतातच. पण त्यातल्या कोणाकडे किती लक्ष द्यायचे हे आपण ठरवायला हवे. अशावेळी स्वत:वर विश्वास ठेवून चुकत असेल तर सकारात्मकपणे आपल्यात बदल करणे महत्त्वाचे असते. बोलणारे बोलत असतात पण आपल्याला त्याचा तितका फरक पडता कामा नये. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीपुणेमेट्रो