महिला दिन आपल्याला माहिती असतो पण १५ ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस (International Day of Rural Women 2022) आहे. ग्रमाीण महिला असं म्हंटल्यावर डोळ्यासमोर सहसा काय चित्र येतं? खरं तर या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी समोर येतात ते केवळ कष्ट. सतत, चोवीस तास कष्ट. शेतकऱ्याचे प्रश्न असं आपण म्हणतो तेव्हा शेतकरी महिलांचे प्रश्न त्यात मोजतो का? शेतीतले महिलांचे कष्ट मोजतो का? असं म्हणतात की शेतीचा शोध बाईनं लावला. तिला आपल्या कच्च्याबच्च्यांची भूक दिसते. दोन घास अन्न मिळावं म्हणून शेतकरी महिला शेतात राबते तेव्हा कुठं भूक भागते. या ग्रामीण महिलांचे ऋण मान्य करुन गरीबी आणि भूकेशी त्यांचा सुरु असलेल्या लढ्याला सलाम करायचा. गरीबी, भूक, कुपोेषण या समस्यांवर मात करुन जग संपन्न सुदृढ व्हावं म्हणून जनजागृती अशी या दिनाची गोष्ट आहे.
(Image : google)
या दिनाला म्हणूनच ग्रामीण, शेतकरी, कष्टकरी महिलांचे ऋण साऱ्यांनी मानायला हवे. ती मायमाऊली अखंड शेतात राबते. गायीगुरांची काळजी घेते. घरात कष्ट करते. शेतकरी महिलांचे कष्ट कुणाला दिसत नाही इतक्या त्या अखंड राबतात. शेतात शेकडो कामं असतात ती सारी कामं करत त्या पीकाची, लेकराबाळाची, गायीगुरांची काळजी घेत साऱ्या कुटुंबाला बांधून ठेवतात. त्यांच्या कष्टांचा ना कोणता मेहनताना असतो ना त्यांना कुणी इन्क्रीमेण्ट देतं. ग्रामीण भागात पाण्याची, विजेची समस्या असूनही, अनेक ठिकाणी मुलभूत सोयी नसूनही बायका साऱ्यांना सुख लाभावं म्हणून कष्ट उपसत असतात.जगभरातल्या शेतकरी,ग्रामीण महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून हा दिवस साजरा होतो.शहरी जगण्यापासून दूर, सुखसोयींपासून दूर ज्या मायमाऊली राबतात, त्यांना मनापासून साऱ्यांनीच धन्यवाद म्हंटलं पाहिजे. आणि त्यापलिकडे जाऊन त्यांची जीवन सुखकर व्हावं म्हणून प्रयत्नही व्हायला पाहिजे. काळजी आणि कदर दोन्ही हवं.. तरच हे प्रश्न सुटतील.