मुलांना हा आत्मविश्वास द्या की ते तुम्हाला काहीही विचारु शकतील, तुमच्याशी सगळ्या गोष्टी मोकळेपणाने बोलू शकतील. ठराविक वयानंतर मुलांशी मैत्री करायला हवी पण त्यालाही मर्यादा असायला हवी. मैत्रीमध्ये मुले आपल्याला ग्राह्य धरु शकतात, त्यामुळे पालक म्हणून असलेला धाक आणि अधिकारवाणी असायलाच हवी, यातील सीमारेषा पालकांना कळायला हवी.
कधी मुलांच्या समोर इतरांशी बोलत किंवा कधी थेट मुलांना काही प्रश्न विचारुन नातेसंबंध, लैंगिकता, त्यांच्या मनात असणारे त्याविषयीचे विचार याबाबत त्यांना बोलते करायला हवे. जेणेकरुन ते काय आणि कशापद्धतीने विचार करतात हे समजणे सोपे होईल असे मत पुण्यातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वंध्यत्व तज्ज्ञ डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर व्यक्त केले.
‘लोकमत सखी’तर्फे (Lokmat Sakhi) जागतिक महिला दिनाचे (International Women’s Day 2022) औचित्य साधत #BeTheChange हा खास उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी सहभागी झाल्या होत्या. गेल्या काही वर्षात लहान मुलींचं बदललेलं जग आणि त्याचा त्यांच्या शारीरिक, मानसिकतेवर होणारा परिणाम याविषयी त्यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. पूर्वीच्या मानानी हल्ली कमी वयात मुलींच्या आयुष्यात लवकर बदल होतात.
पूर्वी १३ ते १४ व्या वर्षी सुरु होणारी पाळी आता १० ते ११ व्या वर्षात सुरू होते. यामध्ये शरीरातील हार्मोन्सचा समन्वय बिघडतो. एकीकडे शरीरात होणारे बदल मात्र वय लहान असल्यानी मुलींमध्ये असणारे अल्लडपण यामुळे या छोट्य़ा मुली गांगरुन जातात. या बदलाला सामोरे जाताना मुलींची आणि मुलांचीही धावपळ होते, मात्र अशावेळी त्यांच्या सर्वात जवळ असणाऱ्या पालकांनी त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधायला हवा असं डॉ. शिल्पा म्हणाल्या.
सोशल मीडियाचा अतिवापर, कमी वयात मिळणारी अतिरीक्त माहिती यामुळे मुलींना आणि मुलांनाही अकाली प्रौढत्व येतंय. पण त्यांना मिळत असलेली सगळीच माहिती योग्य असेल असे नाही. त्यामुळे एकूणच त्यांच्या मानसिकतेत घोळ होण्याचीच शक्यता जास्त असते. १५ ते १६ व्या वर्षी मुलांना मुली आवडणे आणि मुलींना मुलगे आवडणे हे अतिशय सामान्य आहे. अशावेळी मुलींना मित्र करण्यापासून रोखणे, त्यांना मित्रमैत्रीणींसोबत बाहेर न जाऊ देणे हे करणे योग्य नाही. कारण त्यामुळे ते चुकीचे वागू शकतात. पण त्यांच्यासोबत कोण मित्रमैत्रिणी आहेत, ते नेमके कोणत्या प्रकारच्या हॉटेलमध्ये जातात याकडे बारकाईने लक्ष ठेवायला हवे.
काही कारणाने त्यांच्या मित्रमैत्रीणींना घरी बोलावणे, त्यांच्याशी गप्पा मारणे असे केल्यास सगळेच नाते मोकळेपणाचे राहू शकेल. आपण आणि आपलं शरीर व्हॅल्यूएबल आहे हे मुलांना समजायला हवे. भिन्नलिंगी व्यक्तीशी मैत्री करत असताना लैंगिक जवळीक, नातेसंबंधात अडकणे यामुळे मुलांचा मेंदू, हृदय यावर परिणाम होतो. कालांतराने नैराश्य येणे, अभ्यासात आणि करीयरवर त्याचा परिणाम होणे असे परिणाम दिसायला लागतात.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलींनी काय आणि कसे कपडे घालावेत हे मुलींना आणि मुलांनाही सांगणे गरजेचे आहे. मुलं लहान असताना त्यांना तोकडे कपडे घालायचे आणि मोठ्या झाल्यावर त्यांना अचानक तसे कपडे घालण्यास नकार देणे हे चुकीचे आहे. लहानपणापासूनच त्यांना तशी सवय लावल्यास त्याचा त्यांच्या घडणीत उपयोग होऊ शकतो.