Join us  

International Women’s Day 2022: महाराष्ट्रातील ३ महिलांना राष्ट्रीय नारीशक्ती पुरस्कार, वाचा त्यांच्या जिद्दीची कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2022 4:05 PM

International Women’s Day 2022: राज्यातील दिव्यांग कथ्थकनर्तिका सायली आगवणे, महिला सर्पमित्र वनिता बोराडे आणि सामाजिक उद्योजिका कमल कुंभार यांचा यामध्ये समावेश आहे.

ठळक मुद्देविविध क्षेत्रात अतिशय धाडसाने आपला ठसा उमटवणाऱ्या या तीन महिलांचा राष्ट्रीय पातळीवर होणारा सन्मान महाराष्ट्रासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते या महिलांना दिल्ली येथे सन्मानित कऱण्यात आले. 

जागतिक महिला दिन (International Women’s Day 2022)म्हणजे महिलांच्या कामाच्या, त्यांच्या कतृत्त्वाचा सन्मान कऱण्याचा दिवस. एकीकडे कुटुंबाची जबाबदारी आणि दुसरीकडे स्वत:चे स्थआन सिद्ध कऱण्यासाठी तिची असणारी धडपड आपण सगळेच पाहतो. केंद्र सरकार देशातील महिलांच्या कार्यासाठी आणि धडाडीसाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देते.  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील २९ महिलांना यंदा हा राष्ट्रीय नारीशक्ती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन महिलांचा समावेश असून राज्यासाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. राज्यातील दिव्यांग कथ्थकनर्तिका सायली आगवणे, महिला सर्पमित्र वनिता बोराडे आणि सामाजिक उद्योजिका कमल कुंभार यांचा यामध्ये समावेश आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त (international womens day) राष्ट्रपती राम नाथ कोविंद (president ramnath kovind) यांच्या हस्ते या महिलांना दिल्ली येथे सन्मानित कऱण्यात आले. 

वनिता बोराडे या बुलढाणा येथील असून त्यांचे काम महिलांना प्रेरणा देणारे आहे. वनिता यांनी आत्तापर्यंत ५१ हजार पेक्षा अधिक विषारी आणि बिनविषारी सापांना जीवदान देत त्यांना जंगलात सोडले आहे. मराठवाड्यात अतिशय प्रतिकूल परिस्थितीततून पुढे येत आज अनेक महिलांसाठी आदर्श असलेल्या कमल कुंभार यांची गोष्ट थक्क करणारी आहे. कमल यांनी १९९८ मध्ये अतिशय कष्टाने कमल पोल्ट्री आणि एकता प्रोड्युसर कंपनी सुरू केली. व्यवसाय किंवा मार्केटिंगचे कोणतेही ज्ञान नसताना केवळ दोन हजार रुपयांच्या तुटपुंज्या रकमेत कंपनी सुरु करण्याचे केलेले धाडस आणि वीस वर्षांनंतर कंपनीला दरमहा सुमारे एक लाखांपर्यंत मिळणारा नफा ग्रामीण महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. इतकेच नाही तर कमल यांनी आतापर्यंत पाच हजारहून अधिक महिलांना असेच उद्योग सुरू करण्यासाठी आणि स्वयंपूर्ण होण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. 

तर पुण्यातील दिव्यांग कथक नर्तिका सायली नंदकिशोर आगवणे हिचाही या पुरस्कारामध्ये समावेश आहे. पुण्यात राहणारी सायली दिव्यांग असूनही तिने आजपर्यंत वेगवेगळ्या नृत्य स्पर्धेत सादरीकरण करीत आपला ठसा उमटविला आहे. विविध वाहिन्यांवरील नृत्यांच्या शोमध्ये देखील ती भाग घेते. यापुर्वीही तिला अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून तिने परदेशातही आपले सादरीकरण केले आहे. त्यामुळे विविध क्षेत्रात अतिशय धाडसाने आपला ठसा उमटवणाऱ्या या तीन महिलांचा राष्ट्रीय पातळीवर होणारा सन्मान महाराष्ट्रासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. 

 

 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीमहिलाजागतिक महिला दिन