अभिनेत्यांची मुलं म्हणजेच स्टार किड्स अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असतात. आई-वडिलांसोबत ही मुलं अनेकदा एअरपोर्टवर, एखाद्या आऊटींगला किंवा हॉटेलमध्ये जाताना दिसतात. पार्ट्या करतात. अफेअर्स होतात. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरलही होतात.मात्र प्रसिद्ध अभिनेते आणि भाजपा खासदार रवी किशन यांची मुलगी सध्या एकदम चर्चेत आहे. त्या मुलीची कर्तबगारीच अशी आहे की तिची चर्चा तर होणारच. किशन यांची मुलगी इशिता, ती अग्निपथ योजनेअंतर्गत संरक्षण दलात सामील होणार आहे. इशिता शुक्ला असे तिचे नाव आहे. ट्विटरवर रवी किशन आणि इशिता यांनी ट्विट केल्यानंतरच जगाला ही बातमी कळली (Ishita Ravi kishan Agniveer).
इशिता अग्नीवीर कशी झाली?
इशिता दिल्ली संचालनालयाच्या '७ गर्ल बटालियन'ची कॅडेट आहे. एनसीसीमध्ये असलेल्या इशिताने कठोर प्रशिक्षण घेऊन राजपथ दिल्ली येथील शिबिर पूर्ण केले. २१ वर्षीय इशिताने यावर्षी २६ जानेवारी रोजी आयोजित परेडमध्ये सहभाग घेतला होता. एनसीसीकडून परेडमध्ये सहभागी झालेल्या १४८ महिलांपैकी ती एक होती. आपल्याला सैन्यदलात जायचे आहे हे वडिलांना सांगितल्यावर त्यांनी गो अहेड म्हटले आणि मगच इशिताने यासाठी आवश्यक तयारी सुरू केली. मागील ३ वर्षांपासून ती तयारी करत होती आता सीडीएसअंतर्गत ती सैन्यदलात सहभागी होणार आहे.
काय आहे अग्निपथ योजना ?
देशाचे सैन्य अधिक तंदुरुस्त आणि तरुण बनवण्याच्या उद्देशाने केंद्राने अग्निपथ भर्ती मॉडेल सुरू केले होते. हा कार्यक्रम लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी सैन्य भरती करण्यासाठी डिझाइन करण्यात आला असून याअंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी सशस्त्र दलात सेवा करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
अग्निपथ भरती योजनेंतर्गत तरुणांना ४ वर्षांसाठी सैन्यात भरती केले जाईल. त्यामुळे एका बाजूला सैनिकांच्या कमतरतेची समस्या दूर होईल. त्याचबरोबर सैनिकांवर होणारा खर्चही कमी होण्याची शक्यता आहे. तरुणांसाठी नवीन नियमांनुसार ऑल इंडिया स्तरावर भरती केली जाईल. ६ महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे, प्रशिक्षणानंतर सैनिकांना 'अग्नवीर' म्हटले जाईल. ४ वर्षांचा कालावधी संपल्यानंतर सुमारे ७५ टक्के जवान निवृत्त होतील. त्या बदल्यात त्यांना १० ते १२ लाख रुपयांची आकर्षक रक्कम दिली जाईल. तर २५ टक्के जवानांना दीर्घ कालावधीसाठी मुदतवाढ दिली जाईल.