Join us  

जिद्द असावी तर अशी! खेड्यात घर-वडिलांच्या बदल्या, इंजिनिअर होऊन करतेय चंद्रयान मोहिमेत काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2023 3:30 PM

ISRO Sushmita Chaudhari Chandrayaan 3 Journey : कष्ट करण्याची तयारी आणि आई वडीलांचे पाठबळ असेल तर काय होऊ शकते याचे उदाहरण...

चांद्रयान-३ हा भारतीयांच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची बाब. तर जगाचे लक्ष वेधणारा हा प्रकल्प अनेक दृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे. या चांद्रयान मोहिमेसाठी कार्यरत असलेल्या प्रत्येकासाठी तर हे सगळे एका स्वप्नाप्रमाणे आहे. याच टिमचा भाग असलेली एक तरुणी म्हणजे सुश्मिता चौधरी. लाँच व्हिकल ट्रेजेक्टरी डीझाईन करण्यात सुश्मिताची अतिशय महत्त्वाची भूमिका होती. एका अतिशय लहानशा खेड्यातून आलेली ही तरुणी इस्त्रोपर्यंत कशी पोहोचली हे समजून घेणे अतिशय रंजक आहे. वडीलांची नोकरीनिमित्त सतत होणारी बदली, आजुबाजूला असणारे संकुचित वातावरण मात्र तरीही शिक्षणासाठी आई वडीलांचा असणारा खंबीर पाठींबा आणि तिची कष्ट करण्याची तयारी याच्या जोरावर तिने इस्त्रोपर्यंतचा टप्पा गाठला आहे (ISRO Sushmita Chaudhari Chandrayaan 3 Journey).

सुश्मिता सांगते, वडील रेल्वेमध्ये इंजिनिअर असल्याने त्यांची सतत ट्रान्सफर होत असे. सुरुवातीला ते चित्तोड    गढला राहत होते. मात्र ती ७ वी मध्ये असताना त्यांची कोटा येथे बदली झाली. कोटामधील श्रीनाथपुरम येथून सुश्मिताने ७ वी ते १२ वीचे शिक्षण घेतले. कोटामध्येच आयआयटीसाठीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर २०१४ मध्ये तिला हिमाचल प्रदेशच्या मंडी येथे प्रवेश मिळाला. इलेक्र्टीकल विषयात स्पेशलायजेशन करत असतानाच २०१८ मध्ये शिक्षण पूर्ण होण्याच्या वेळी आयआयटीमध्ये इस्त्रोची टिम आल्याचे ती सांगते. यात सिलेक्शन झाले आणि त्यानंतर गेली ५ वर्षे आपण इस्त्रोसोबत काम करत असल्याचे सुश्मिता म्हणते. 

(Image : Google)

आता तिच्या वडीलांची मुंबईच्या चर्चगेट येथे नियुक्ती झाली असून आई आणि ३ लहान बहिणी कोटा येथेच राहतात. दोन्ही बहिणी आयआयटी आणि मेडीकलसाठी प्रयत्न करत आहेत. लहानपणापासूनच गणित विषय आवडत असल्याने आपण इंजिनिअरींगला प्रवेश घेणार हे निश्चित ठरले होते असे ती म्हणते. इस्त्रोच्या बाबतीत आपल्याला सुरुवातीला काहीच माहित नव्हते. मात्र आयआयटीला प्रवेश घेतल्यानंतर शास्त्रज्ञ कसे काम करतात, इस्त्रओ नेमकी काय काम करते हे समजायला लागले आणि याठिकाणी आपणही काम करावे अशी इच्छा झाली. एकाएकी कॅम्पस रिक्रूटमेंटसाठी इस्त्रोची टिम आली आणि माझी निवडही झाली असे ती सांगते. 

(Image : Google)

मी कल्पना चावला यांना माझी आदर्श मानते. आपल्या महाविद्यालयातील इस्त्रोमध्ये जाणारी मी पहिली मुलगी आहे हे सांगताना सुश्मिताचा उर आनंदाने भरुन येतो.  येत्या ४० दिवसांत चांद्रयान मोहिम यशस्वी होईल आणि पूर्ण जग इस्त्रोकडे अतिशय अभिमानाने पाहत असेल. यावेळी इस्त्रो आणि देश एक नवीन कहाणी लिहीत असतील अशीही भावना सुश्मिता व्यक्त करते. ग्रामीण भागात मुली काही ना काही कारणाने शिक्षण अर्धवट सोडतात, मात्र असे करणे योग्य नाही. आपल्याला आई वडीलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आपण आज इथपर्यंत पोहोचू शकलो असेही ती वारंवार सांगते.  

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीइस्रोचांद्रयान-3