प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सतत चर्चेत असते. कधी कोणत्या वादामुळे तर कधी एखाद्या गोष्टीवर भाष्य केल्यामुळे तिच्या नावाची चर्चा होत असते. नुकतीच तिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे जी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये कॅन्सरवरील उपचार सुरु असतानाच्या कठिण काळातील तिच्या प्रवासाबद्दल सांगितले आहे. ‘राष्ट्रीय कॅन्सर जागरुकता दिवसा’च्या निमित्ताने तिने उपचारांदरम्यानची काही छायाचित्रेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहेत. तिच्या या पोस्टला २३ तासांमध्ये २३ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून तिच्या चाहत्यांनी तिच्या कॅन्सरसोबतच्या लढ्याबद्दल तिचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले आहे.
कॅन्सरसारख्या दुर्धर आजारामुळे प्राण गमवावे लागणाऱ्यांविषयी सन्मानाची भावना मनीषाने व्यक्त केली आहे. आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते, “आताच्या कठिण परिस्थितीत कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या सर्वांना मी शुभेच्छा देते. तसेच सगळ्यांना खुप सारे प्रेम आणि यश मिळावे यासाठीही शुभेच्छा. हा प्रवास अवघड जरुर आहे पण आपण त्याला हरवले पाहिजे. या आजाराला जे सामोरे जात आहेत त्यांना मी सन्मान देऊ इच्छिते आणि ज्यांनी ही लढाई जिंकली आहे त्यांच्यासोबत मला सेलिब्रेट करायचे आहे.”
पुढे मनिषा लिहीते, “या आजाराच्या बाबतीत आपण जागरुकता निर्माण करणे गरजेचे असून, या आजाराशी लढा देणाऱ्यांच्या आशादायक कहाण्या इतर रुग्णांना आणि सामान्यांना वारंवार सांगायला हव्यात. या परिस्थितीत आपण स्वत:च्या आणि समाजाच्या बाबतीत दयाळू असायला हवे, सगळ्यांचे स्वास्थ्य आणि चांगल्यासाठी मी प्रार्थना करते, धन्यवाद”. यावेळी मनीषा कोईरालाने जो फोटो शेअर केला आहे त्यामध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर आराम करताना दिसत आहे. तसेच परिवारातील सदस्यांसोबत फोटोसाठी पोज देत असल्याचेही दिसत आहे.
२०१२ मध्ये मनिषाला ओवरीजचा कॅन्सर झाला होता. यावेळी तिने या आजाराशी मोठा लढा दिला आणि २०१५ मध्ये ती यातून मुक्त झाली. या आजारावरील उपचारांसाठी मनिषा ६ महिने अमेरिकेत राहीली होती. याविषयी मनीषाने हिलिंग नावाचे एक पुस्तक लिहीले असून त्यात तिने आपल्या कर्करोगाशी झुंज देतानाचे सगळे अनुभव शेअर केले आहेत.