Join us  

ज्या विमान कंपनीत कर्मचारी म्हणून नोकरी केली, त्याच विमान कंपनीची झाली मालक! जिद्द असावी तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2024 7:44 PM

विमान कंपनीत कर्मचारी ते अध्यक्ष! असा प्रवास करणाऱ्या महिलेच्या जिद्दीची गोष्ट.

ठळक मुद्देविकसित म्हणवणाऱ्या देशातही महिलांसाठीच्या वाटा किती अवघड असतात

माधुरी पेठकरमित्सुको टोटोरी जपान एअर लाइन्सच्या अध्यक्षपदी पोहोचल्या, जगभरात ही असामान्य गोष्ट ठरली आहे.एक कामगार म्हणून नोकरीला लागलेला कोणी पुढे जाऊन त्या कंपनीचा मुख्य होतो, असं सिनेमात घडतं, पण प्रत्यक्ष घडतं का?मित्सुको टोटोरी या जपानी महिलेचा प्रवास म्हणजे सिनेमात सुद्धा खरी वाटणार नाही, अशी गोष्ट आहे. ५९ वर्षांच्या टोटोरी आज जपान एअर लाइन्स कंपनीत अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. ४० वर्षांपूर्वी त्या जपान एअर लाइन्समध्ये केबिन क्रू मेंबर्सपैकी एक होत्या. जपानमध्ये आजही पितृसत्ताक समाजव्यवस्थेत एका महिलेचे अध्यक्ष होणे विशेष आहे. क्रू मेंबर ते अध्यक्ष हा पल्ला गाठताना त्यांना अनेक अदृश्य आणि अभेद्य अडथळ्यांचा सामना करावा लागला.

जपान एअर लाइन्स जगातल्या महत्त्वाच्या एअर लाइन्सपैकी एक आहे. एअर लाइन्सच्या अध्यक्षपदी महिला असणे ही बाब जागतिक पातळीवरही सर्वसामान्य नसल्याने जपान एअर लाइन्सच्या अध्यक्षपदी टोटोरी यांची निवड होण्याची चर्चा जगभरात झाली. १ एप्रिल २०२४ पासून मित्सुको टोटोरी या जपान एअर लाइन्सच्या अध्यक्ष म्हणून काम पाहू लागल्या.

एवढी चर्चा या बातमीची अशासाठी की, जपानमध्ये अजूनही महिला कितीही कर्तबगार असल्या, तरी काॅर्पोरेट क्षेत्रात उच्च पदासाठी/प्रमुख म्हणून त्यांची दावेदारी कायमच नाकारली जाते. तो हक्क पुरुषांचाच, असे मानले जाते. पण, टोटोरी यांनी केबिन क्रू आणि विमान सुरक्षा व्यवस्था सांभाळण्याचे काम समर्थपणे पार पाडले. आता अध्यक्षपद मिळवून एक प्रकारे जपानमधील काॅर्पोरेट पुरुषी परंपरेला आव्हान दिले आहे.

या बदलामुळेच कधीतरी जपानच्या पंतप्रधानपदी महिलेला बघण्याची संधी मिळेल, अशी आशा आता खुद्द टोटोरी यांना वाटू लागली आहे. उच्चपदावर जाण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक जपानी महिलेला जोरकसपणे पावले टाकण्याची उमेद आपल्यामुळे मिळेल, अशी आशा टोटोरी यांना वाटते. विकसित म्हणवणाऱ्या देशातही महिलांसाठीच्या वाटा किती अवघड असतात आणि तरीही हिमतीने महिला चालतच राहतात, याचे हे उदाहरण आहे. 

टॅग्स :जपानमहिला