पैशांची बचत करा असा सल्ला नेहमीच मोठ्यांकडून दिला जातो. मात्र महागाई आणि रोजचे खर्च पाहता अनेकदा ते अवघड होतं. पण अशातच एका जपानी महिलेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जबरदस्त बचत करून तिने आयुष्य कसं बदलायचं आणि यशस्वी व्हायचं हे दाखवून दिलं आहे. साकी तमोगामी असं या महिलेचं नाव असून जी आता "देशातील सर्वात मोठी बचत करणारी मुलगी" म्हणून ओळखली जाते.
साकीने फक्त अनावश्यक खर्चच कमी केला नाही तर तब्बल ३ घरे खरेदी केली आहेत. विशेष म्हणजे तिने एक कॅट कॅफे देखील उघडला आहे. १५ वर्षात तिने ही किमया केली आहे. २०१९ मध्ये लोकप्रिय असलेला जपानी टेलिव्हिजन कार्यक्रम 'हॅपी! बॉम्बी गर्ल'मध्ये ती सर्वप्रथम दिसली होती. साकी तमोगामीने तेव्हाच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ज्या तरुणींनी आपल्या ध्येयासाठी अनेक आव्हानांचा सामना केला त्यांची यशोगाथा या कार्यक्रमात लोकांसमोर यायची.
वयाच्या १९ व्या वर्षीच निश्चित केलं ध्येय
साकी तमोगामीची गोष्ट ही पूर्णच वेगळी होती. तिने पैशांची बचत करून तिची अनेक स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केला. वयाच्या १९ व्या वर्षीच तिने तिचं ध्येय निश्चित केलं होतं आणि आता वयाच्या ३४ व्या वर्षी तीन घरे घेतली आहेत. अनेकांसाठी जे स्वप्न अशक्य असतं ते तिने तिच्या कडक आर्थिक शिस्तीमुळे साकार करून दाखवलं आहे.विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर तिने प्रॉपर्टी एजंटकडे नोकरी केली. त्यावेळी साकी तमोगामी फक्त २०० येन (जवळपास १२० रुपये) खर्च करायची. ती तिचं सर्व जेवण घरीच बनवायची, टोस्ट, नूडल्स यासह काही स्वस्त पदार्थांवर अवलंबून राहायची. अशाप्रकारे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने खूप बचत केली.
नवीन कपडे खरेदी करणं टाळलं
नवीन कपडे खरेदी करणं देखील तिने टाळलं, त्याऐवजी ती नातेवाईकांनी दिलेल्या कपड्यांवर अवलंबून राहिली. टाकाऊ वस्तूंपासून तिने फर्निचर बनवलं. वयाच्या २७ व्या वर्षी साकी तमोगामीने तिचं पहिलं घर खरेदी करण्यासाठी पुरेशी बचत केली होती, ज्याची किंमत १० मिलियन येन (६१ लाख रुपये) होती. कर्ज फेडण्यासाठी तिने मालमत्तेतून मिळणाऱ्या भाड्याचा वापर केला. दोन वर्षांनी १८ मिलियन येन (१.१ कोटी रुपये) मध्ये दुसरं घर खरेदी केलं. नंतर ३७ मिलियन येन (२.३ कोटी रुपये) किमतीत तिसरं घर खरेदी करण्याचे ध्येय साध्य केलं.