Lokmat Sakhi >Inspirational > ‘मी कायम संघर्षच एन्जॉय करतेय!’- झुलन गोस्वामीच्या सुसाट छकडा एक्सप्रेसच्या सातत्याची कमाल

‘मी कायम संघर्षच एन्जॉय करतेय!’- झुलन गोस्वामीच्या सुसाट छकडा एक्सप्रेसच्या सातत्याची कमाल

वय वाढलं की, ‘बॉलर’चा प्रवास संपतो, पण झुलन वयाच्या चाळिशीत असूनही तिच्याकडून अपेक्षा आहेत, हेच तिचं आणि तिच्या संघर्षाच्या गोष्टीचं यश आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2022 05:04 PM2022-03-24T17:04:12+5:302022-03-24T17:36:11+5:30

वय वाढलं की, ‘बॉलर’चा प्रवास संपतो, पण झुलन वयाच्या चाळिशीत असूनही तिच्याकडून अपेक्षा आहेत, हेच तिचं आणि तिच्या संघर्षाच्या गोष्टीचं यश आहे.

Jhulan Goswami Chakdaha Express- at the age of forty, cricket is her joy for life. | ‘मी कायम संघर्षच एन्जॉय करतेय!’- झुलन गोस्वामीच्या सुसाट छकडा एक्सप्रेसच्या सातत्याची कमाल

‘मी कायम संघर्षच एन्जॉय करतेय!’- झुलन गोस्वामीच्या सुसाट छकडा एक्सप्रेसच्या सातत्याची कमाल

Highlightsछकडा एक्स्प्रेसकडून आजही मोठ्या अपेक्षा आहे, हेच तिचं यश आहे..

अभिजित पानसे


ओल्ड इज गोल्ड म्हणतात. एजिंग लाइक अ वाईन असंही म्हणतात. भारतीय टीममधील झुलन गोस्वामी अगदी अशीच म्हणता येईल. चाळिसाव्या वर्षातही भारतीय महिला क्रिकेट टीमच्या बॉलिंगचा ती कणा आहे. वर्ल्डकपमध्ये नुकताच तिने सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम केला. याशिवाय वनडे क्रिकेटमध्ये २५० बळी घेणारी ती पहिली महिला क्रिकेटर बनली. झुलन गोस्वामी. संघर्ष, जिद्द आणि सातत्य यांचा चेहरा आहे.
आज साऱ्या जगाला स्वत:कडे मान उंचावून बघायला लावेल इतकं उत्तुंग यश तिनं मिळवलं. शारीरिक उंची ५.११, निसर्गाने दिलेल्या या गिफ्टचा तिनं पूर्णपणे फायदा करुन घेतला आणि त्यासाठी उपसले वारेमाप कष्ट.

खरंतर ही बंगालमधली मुलगी. तिथं पुरुष क्रिकेटने जेमतेम अलीकडे मूळ धरलं. बंगालचं पाणी फुटबॉलला पोषक. एकतर फुटबॉल खेळायला तरी लावतं किंवा बघायला तरी. पण, झुलन मात्र क्रिकेटच्या दिशेनं निघाली. २५ नोव्हेंबर १९८२, झुलन बंगालमधील छकडा नावाच्या गावात जन्माला आली. बंगाली असल्याने झुलन देखील सुरुवातीपासून फुटबॉलप्रेमी होती. पण, जसं दर क्रिकेट वर्ल्डकप काही क्रिकेटरचं करिअर संपवत असतो, तसंच दूर कुठेतरी टीव्ही समोर बसलेल्या मुलामुलींना क्रिकेटची प्रेरणा देखील देत असतो. १९९२ चा क्रिकेट वर्ल्डकप बघून फुटबॉलप्रेमी झुलन गोस्वामीला क्रिकेटची किक बसली. १९९७ मध्ये महिला वर्ल्डकप झाला असता त्यात ऑस्ट्रेलियाच्या बॅटर बेलिंडा क्लार्क हिची बॅटिंग बघून झुलनचं क्रिकेट खेळण्याचं वेड आणखीन वाढलं.
अर्थात स्वप्न पाहणं आणि सोयी-संधी मिळणं हा प्रवास अवघड असतोच. झुलनच्या गावातही क्रिकेटच्या सोयी नव्हत्या. पण, तिला तर क्रिकेटच खेळायचं होतं. मग, ती क्रिकेट खेळायला कोलकाताला प्रवास करत जायची. कधी रेल्वे चुकली तर गावातच मैदानात एकटी बॉलिंग करायची.
तिच्या आई-वडिलांना तिच्या क्रिकेट खेळण्याचं वेड समजायचं पण जिथं महिला क्रिकेट नावाचा काही खेळच आसपास दिसत नव्हता तिथं आपली वयात येणारी मुलगी क्रिकेटवेडी झाली ते त्यांना तरी कसं पटावं. कुमार वयातील मुलगी प्रवास करत क्रिकेट खेळायला जाते ही आजूबाजूच्या समाजासाठीही वेगळी गोष्ट होती. पण, आई-वडिलांना नीट समजावून सांगितल्यावर तिला घरून पूर्ण पाठिंबा मिळाला.
सुरुवातीला झुलन मुलांसोबत क्रिकेट खेळायची. पण, तिची बॉलिंग इतकी स्लो असायची की तिला सगळे हसायचे. तिने नंतर एमआरएफ अकॅडमी जॉईन केली. इथे ऑस्ट्रेलियाचे फास्ट बॉलर डेनिस लिली यांच्याकडून तिला फास्ट बॉलिंगचं प्रोफेशनल शिक्षण मिळालं.

५.११ उंचीची ही मुलगी भारतीय टीममध्ये परफेक्ट बॉलर मटेरिअल आहे असं अकॅडमीमधील कोचचं म्हणणं होतं.
वयाच्या १९ व्या वर्षी झुलननं क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. एकेकाळी स्लो बॉलिंग करते म्हणून तिच्यावर सहखेळाडू हसायचे त्याच झुलनला २००७ च्या महिला वर्ल्डकपमध्ये सगळ्यात वेगवान महिला बॉलर म्हणून अवॉर्ड मिळाला. तिला महिला क्रिकेटर ऑफ द इअर म्हणूनही अवॉर्ड मिळाला. हा पुरस्कार तिला महेंद्रसिंग धोनीच्या हस्ते देण्यात आला.
इथून झुलनने अनेक रेकॉर्ड केले.
नुकतीच झुलन गोस्वामी ही वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी बॉलर ठरली आहे.
वय चाळिशीच्या टप्प्यावर आहे तरी झुलन सतत खेळतेच आहे. अर्जुन आणि पद्मश्री पुरस्कार मिळवणारी ही क्रिकेटपटू, तिच्यातली जिद्द आणि खेळण्याची आग आजही कायम आहे.
लोक म्हणतात, वय वाढलं की क्रिकेटरचा फॉर्म हरवत जातो. बॅट्समनला तरी संधी अधिक मिळतात पण, वय वाढलेला बॉलर पहिले संपतो. पण आजही झुलन भारताची प्रमुख बॉलर आहे. सुरुवातीला परिस्थितीशी संघर्ष करत तिने यश मिळवलं आज ती वाढत्या वयासोबत अथक मेहनत करून स्वतःला फिट ठेवते आहे. ती म्हणतेच, मी संघर्ष कायमच एन्जॉय करते. तसा ती आजही करतेय. खेळतेय.

आता तर झुलनचा बायोपिक येतोय. अनुष्का शर्मा झुलनची भूमिका करणार आहे. लवकरच झुलनचा संघर्ष मोठ्या पडद्यावर बघायला मिळेल.
तिची संघर्षाची गोष्ट आनंदाच्या गोष्टीत रुपांतरित होऊ लागली आहे.
आणि त्यावर आनंदाचं शिखर असेल जर सध्या सुरू असलेला महिला वर्ल्डकप भारताने जिंकला तर ..
टीमने झुलनला आणि झुलनने स्वतःला आणि देशवासीयांना दिलेलं सर्वोत्तम गुडबाय गिफ्ट असेल.
छकडा एक्स्प्रेसकडून आजही मोठ्या अपेक्षा आहे, हेच तिचं यश आहे..
 

Web Title: Jhulan Goswami Chakdaha Express- at the age of forty, cricket is her joy for life.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.