तृतीयपंथी म्हटल्यावर आजही आपल्यातील अनेकांच्या भुवया उंचावतात. आजही सामान्यपणे ज्यांना मुख्य प्रवाहात स्थान नाही असा हा समाजातील एक महत्त्वाचा घटक अनेक गोष्टींपासून कायमच वंचित राहिला आहे. पण व्यक्ती म्हणून जगताना त्यांच्याही काही समस्या, अडचणी असू शकतात. याच समस्यांसाठी लढणाऱ्या एक धाडसी न्यायाधीश म्हणजे जोयिता मंडल (Joyita Mondal). तृतीयपंथी (first transgender judge in India) असून सामान्यांप्रमाणे शिक्षण घेणे आणि न्यायाधीश पदापर्यंत पोहोचणे हे जोयिता यांच्यासाठी नक्कीच सरळसोपे नसणार. मग आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहणाऱ्या समाजासोबत राहून, शिक्षण घेऊन या पदापर्यंतची कामगिरी करण्याऱ्या जोयिता यांची कहाणी नक्कीच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरु शकते.
कसे होते बालपण...
आपला मुलगा किंवा मुलगी ट्रान्सजेंडर आहे हे पचवणे आजही सामान्य घरात अतिशय अवघड गोष्ट असते. त्याचप्रमाणे जोयिता यांच्या घरच्यांसाठीही ही अतिशय अवघड गोष्ट होती. जोयिता यांना ट्रान्सजेंडर असल्याच्या कारणाने शाळेतून काढून टाकण्यात आले, इतकेच नाही तर पालकांनीही त्यांना घराबाहेर काढले. रस्त्यावर आल्य़ावर राहायचे कुठे हा प्रश्न निर्माण झालेल्या जोयिता यांना हॉटेलमध्येही राहण्यासाठी नाकारण्यात आले. अशा परिस्थितीत जोयिता यांच्यावर अक्षरश: बसस्टँडवर झोपण्याची वेळ आली होती. इतकेच नाही तर पोट भरण्यासाठी जोयिता यांना भीक मागावी लागत होती. असे असूनही त्यांनी थोडेथोडके नाही तर न्यायाधीश होण्यापर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असू जिद्दीच्या जोरावर त्या भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर न्यायाधीश झाल्या आहेत.
पैसे मिळवण्यासाठी जोयिता यांनी केले समोर येईल ते काम
मूळ पश्चिम बंगाल येथील असलेल्या जोयिता यांचे आज देशभरातून कौतुक होत आहे. पण त्यांच्यावर एक वेळ अशी आली की त्यांना भीक मागून किंवा डान्स करुन पैसे मिळवावे लागले. वयाच्या १८ व्या वर्षानंतर त्यांनी आपली खरी ओळख लपवून ठेवायची नाही असे ठरवले आणि तिथून त्यांच्या आयुष्याच्या लढाईला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. रस्त्यावर राहून त्यांनी काहीही झाले तरी शिक्षण पूर्ण करायचे असे ठरवले आणि अतिशय कष्टाने आपले शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयात असतानाही इतर मुले आणि मुली आपली चेष्टा करायच्या. मात्र शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक लढाई लढत जोयिता यांनी आपले ध्येय साध्य केले.
WB:There are many transgenders,if they are given a chance they can do a lot- Joyita Mondal,India’s 1st Transgender Lok Adalat Judge,Islampur pic.twitter.com/tqHzsC1faQ
— ANI (@ANI) October 20, 2017
स्वत:शी लढाई सुरू असतानाच ट्रान्सजेंडर समूहाच्या अधिकारांसाठीही दिला लढा
एकीकडे स्वत:चे आयुष्य इतके उध्वस्थ असताना ऐन तारुण्यात जोयिता यांनी आपल्याप्रमाणे आयुष्य जगणाऱ्या ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या प्रश्नांसाठी लढा उभारला. ट्रान्सजेंडर व्यक्तींना मतदान ओळखपत्र मिळवणाऱ्या जोयिता या पहिल्या व्यक्ती होत्या. येत्या काळात आपण ट्रान्सजेंडर समुहासाठी लढा देणार असून किमान आपल्या शहरातील काही ट्रान्सजेंडर व्यक्तींना नोकरी मिळाली तरी माझी झालेली नियुक्ती मी फायद्याची समजेन असे त्या म्हणाल्या. एका दुर्लक्षित समाजातील ट्रान्सजेंडर व्यक्तीला न्यायाधीश होण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी यंत्रणेचे आभारही मानले.