Join us  

तीन लेकरांच्या आईनं ठरवलं पुन्हा शिकायचं, दहावीच्या परीक्षेत मिळवले ९४ टक्के, काश्मिरी तरुणीची शाब्बास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2022 5:20 PM

सासूबाईंनी भरला सुनेच्या परीक्षेचा फॉर्म आणि लहान लेकरं सांभाळून परीक्षा देत सुरु केला पुन्हा शिकण्याचा प्रवास

ठळक मुद्देइच्छा असेल, मेहनत घेण्याची तयारी असेल तर काय अशक्य आहे..

ट्विंकल खन्ना आपलं राहिलेलं मास्टर्स पूर्ण करायला परेशी शिकायला गेली, ती बातमी वाचून अनेकींच्या ( आणि अनेकांच्याही) मनात आलंच असेल की तिला काय कमी आहे? पैसा आहे, मुलांच्या दिमतीला नोकर आहेत. ती जाऊच शकते शिकायला. सामान्य मध्यमवर्गीय बायकांना ते कसं जमावं? शिक्षण एकदा सुटलं की सुटलंच. पण मनात इच्छा असेल तर अवतीभोवतीच्या अत्यंत प्रतिकुल वातावरणातही उत्तम भरारी घेता येऊ शकते. त्याचंच एक उदाहरण म्हणजे काश्मिर कुपवाडाची रहिवाशी असलेली सबरिना खलिद. दहा वर्षांपूर्वी तिचं शिक्षणं थांबलं, लग्न झालं. आता पदरात तीन मुलं आहेत.. पण तरी तिनं यंदा ठरवलं होतं की दहावीची परीक्षा द्यायचीच..

(Image : google)

आणि तिनं परीक्षा दिलीही. आश्चर्य म्हणजे बाहेरुन दहावी परीक्षेचा फॉर्म भरत, अभ्यास करत तिनं बोर्डात ९३.४ टक्के मार्क मिळवले आहेत. खरीच वाटू नये अशी सबरिनाची गोष्ट आहे. सबरिना आणि तिचं कुटुंब अवूरा गावात राहते. कुपवाडाजवळ. तिला तीन बहिणी. मोठं कुटुंब. दहावीची परीक्षा देण्यापूर्वीच शिक्षण सुटलं. मग लग्न झालं. तीन मुलं. मोठ्या दोन मुली अनुक्रमे ८ आणि ६ वर्षांच्या. आता छोटा मुलगा सहा महिन्यांचा आहे. सबरिनाच्या मनात आपलं शिक्षण सुटल्याची खंत होती. तिच्या बहिणी सगळ्या ग्रॅज्युएट झाल्या, नणंदाही उच्चशिक्षित. त्यांनी सगळ्यांनी सबरिनाला प्रोत्साहन दिलं. पण सबरिनाला वाटत होतं आता इतक्या वर्षांनी आपण दहावी परीक्षा दिली तर लोक काय म्हणतील? मुख्य म्हणजे आपल्याला जमेल का?मात्र तेवढ्यात तिच्या सासूबाईंनी तिचा दहावी परीक्षेचा फॉर्म भरुन टाकला. आणि सबरिना अभ्यासाला लागली. सबरिनाचं गणित कच्चं आहे असं वाटल्यानं तिच्या नवऱ्यानं, सज्जाद अहमद दर, त्यानं तिला गणित शिकवलं. खासगी ट्युशनही लावण्यात आली. आणि सबरिनाने दहावीची परीक्षा दिली.रिझल्ट लागला तर तिला ९३.४ टक्के मार्क पडले. सबरिनाच्या कुटुंबाला तर आनंद झालाच पण साऱ्या गावानं तिचं यश साजरं केलं.इच्छा असेल, मेहनत घेण्याची तयारी असेल तर काय अशक्य आहे..सबरिनाच्या जिद्दीची ही खरी मिसाल आहे! 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी