मनाचा निर्धार पक्का असला आणि हेतू चांगला असला तर माणूस अवघडातली अवघड गोष्टही साध्य करु शकतो हे सांगण्यासाठीची उदाहरणं फक्त इतिहासात आहेत असं नाही तर वर्तमानातही आहेत. निर्वासितांच्या (refugee) व्यथा आपण नेहमीच माध्यमातून वाचतो, पाहातो. पण प्रत्यक्षात त्यांच्यासाठी करायचं काय असा प्रश्न एक सामान्य माणूस म्हणून आपल्याला पडतो. असाच प्रश्न इंग्लडमधील डर्बिशायर येथे राहाणाऱ्या केट जेडन (Kate Jayden) या ब्रिटीश महिलेलाही पडला. पण प्रश्न पडून ती सुस्कारा सोडून शांत बसली नाही. तिने मनाचा निर्धार पक्का केला आणि नोकरी, अपघात अशी आव्हानं पार करत तो पूर्णही केला. 35 वर्षीय केट जेडन ही 31 डिसेंबर ते 15 एप्रिल या 106 दिवसात 106 मॅरेथाॅन (marathon) धावली. आणि आपल्या या मॅरेथाॅन मोहिमेतून निर्वासितांसाठी तिने 41 लाख रुपये जमा केले. आज केड जेडन हिची जगातील सर्वात जास्त दिवस सलग मॅरेथाॅन धावणारी महिला म्हणून गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये (Guinness World Record) नोंदही झाली आहे.
Image: Google
सुरुवातीला केट जेडन हिने 100 मॅरेथाॅन पूर्ण करण्याचं ध्येय ठेवलं होतं. पण तिनं ठरवलं त्यापेक्षा जास्त करुन दाखवलं. 31 डिसेंबर 2021 रोजी केटनं मॅरेथाॅन धावायला सुरुवात केली . ती रोज 42 किमी धावायची. ही मॅरेथाॅन केट अलेप्पो, सिरिया आणि इंग्लड मधील त्या रस्त्यांवर धावली ज्या रस्त्यांवर निर्वासित प्रामुख्याने असतात. 106 दिवसात तिने 4, 216 कि.मी अंतर पूर्ण केलं. रोजची 8 ते 9 तासांची नोकरी करुन केट सलग 6 तास मॅरेथाॅन धावायची. तिने आपल्या या मॅरेथाॅन मोहिमेतून निर्वासितांसाठी 41.5 लाख रुपये जमा केले. नोकरी सांभाळून ही मॅरेथाॅन मोहीम पूर्ण करणाऱ्या केट जेडनला दुखापतीलाही सामोरं जावं लागलं. मॅरेथाॅनच्या 46 व्या दिवशी केटचा गुडघा दुखावला. पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. मॅरेथाॅन पूर्ण केल्यानंतर जेव्हा तिनं डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार गुडघ्याचा एमआरआय केला तेव्हा गुडघा फॅक्चर असल्याचं आढळलं. म्हणजे गुडघा फॅक्चर असताना देखील केट मॅरेथाॅन पळत होती. मे 2022 मध्ये तिच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली.
Image: Google
106 दिवसात 106 मॅरेथाॅन पूर्ण करणाऱ्या केटने 95 दिवसात 95 मॅरेथाॅन पूर्ण करणाऱ्या ॲलिसा क्लार्कचा विक्रम मोडला तर 19 फेब्रुवारी ते 4 जून 2022 असे 106 दिवसात 106 मॅरेथाॅन पूर्ण करणाऱ्या फे कनिंगहॅम आणि एमा पेट्री या स्काॅटिश जोडप्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.
Image: Google
आपल्या विक्रमानं आनंदित झालेल्या केटचा निर्धार एवढ्या पुरताच मर्यादित नसून या दुखापतीतून सावरल्यानंतर तिला आणखी विक्रम करायचे आहेत. केटची दांडगी इच्छाशक्ती पाहिल्यास ती लवकरच आणखी एखादा विक्रम करुन आपलं नाव पुन्हा नव्या विक्रमासाठी गिनीज रेकाॅर्डमध्ये नोंदवेल हे नक्की!