लहान-मोठ्या गोष्टीला कारणं देणारे आपण आणि पाठीच्या कण्याचा दुर्मिळ आजार असलेली तरुणी सगळ्या मर्यादांवर मात करत थोडंथोडकं नाही तर सीएपर्यंतचं शिक्षण पूर्ण करते. वाचायला कदाचित हे काहीसं सोपं वाटू शकतं पण तिच्या आयुष्यातील रोजचा झगडा नक्कीच कमी नसणार. परिस्थीतीशी दोन हात करत लढण्याची तिच्यातील जिद्द, कष्ट घेण्याची तयारी आणि पालकांचा खंबीर पाठिंबा यांमुळेच हे शक्य झाले आहे. केरळमधील प्रीथू जयप्रकाश हिला स्पायनल मस्क्युलर अॅट्रोफी हा आजार आहे. या आजारामुळे चालणे तर सोडाच पण तिची दैनंदिन कामेही ती मदतीशिवाय पूर्ण करु शकत नाही. मात्र ठरवले तर काही अशक्य नाही हे तिने आपल्या कृतीतून सिद्ध करुन दाखवले आहे. पाठीच्या कण्याचा हा आजार असणाऱ्या प्रीथूने प्रचंड मेहनत घेत सीएची पदवी मिळवल्याने तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
दळणवळणाची पुरेशी साधने नसलेल्या केरळमधील लहानशा गावात प्रीथू हिचा जन्म झाला. लहानपणापासूनच ती चालू शकत नव्हती, तेव्हा जयप्रकाश आणि राधामणी या तिच्या आईवडिलांनी तिला डॉक्टरांकडे नेले. “हे मूल चालू शकणार नाही, तिची हाडे दिवसेंदिवस ठिसूळ होत असून वय वाढेल त्यानुसार ही समस्या आणखी वाढणार” असे तिरुअनंतपुरम येथील एका मोठ्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तिच्या पालकांना सांगितले. हे ऐकल्यावर आपल्या लहानगीला कुशीत घेऊन तिचे आईवडिल त्यावेळी ढसाढसा रडले. मुलगी चालू शकणार नाही हे दु:ख पचवणे त्यांच्यासाठी कठिण होते. खरंच ती कधीच चालू शकली नाही, त्यामुळे शाळा, महाविद्यालयात जाणे शक्यच नव्हते. मात्र तिच्या आई-वडिलांनी हार न मानता घरातूनच तिला शिकवायचे ठरवले. यातच तिचा सगळ्यात जवळचा मित्र असणाऱ्या तिच्या भावालाही तिने गमावले. त्यामुळे या आई-वडिलांवर दु:खाचा आणखी एक डोंगर कोसळला.
या सगळ्या परिस्थितीवर मात करत प्रीथू हिने आपले चार्टर्ड अकाऊंटंट व्हायचे स्वप्न पूर्ण करायचे ठरवले. १० वी, १२ वी आणि बी.कॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती पहिल्या प्रयत्नात कोणत्याही क्लासशिवाय सीएची CPT ही पहिली पास झाली. यानंतरही सीए होणे आणि त्यानंतर या क्षेत्रात नोकरी करणे हे वाटते तेवढे सोपे नाही, व्हीलचेअरवर असलेल्या मुलीला नोकरीला ठेवताना लोक विचार करतील, त्यापेक्षा एम.कॉम, एम.बी.ए असे काहीतरी कर असे सल्ले तिला अनेकांकडून देण्यात आले. मात्र प्रीथू तिच्या कमकुवत असण्याला कधीच बळी पडली नाही, तर तिने त्यावर मात करण्यासाठी आपल्या स्तरावर पर्याय शोधले. अखेर मागील वर्षी तिने सी.ए ची पदवी मिळवली आणि सर्वच स्तरातून तिचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले.
तिचा झगडा इथे थांबला नाही. तर परिस्थीतीवर मात करत सी.ए सारखी अवघड पदवी मिळवल्यानंतर केरळमधील अनेक सी.ए. फर्ममधून तिला नोकरीसाठी नकार देण्यात आला. पण इथेही ती थांबली नाही, तर ही आपल्यासाठी संधी आहे असे मानत प्रीथूने प्रयत्न सुरू ठेवले. सध्या ती हैद्राबादमधील डेलॉईट यूएसआयमध्ये काम करत असून तिच्या पालकांना तिचा सार्थ अभिमान वाटतो. मात्र पालकांच्या खंबीर पाठिंब्याशिवाय ही गोष्ट शक्यच झाली नसती हेही तितकेच खरे.