प्रगतीा जाधव-पाटील
‘वजन उचललं तेव्हा पहिल्यांदा माझे प्रशिक्षक मयुर सिंहासणे यांचा चेहरा नजरेसमोर आला तर ते खाली ठेवताना वाटलं आपल्या आईवडिलांच्या कष्टाचं चीज झालं..!’ हरयाणातील पंचकुला येथे आयोजित खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत सांगलीची काजल महादेव सलगर हिने वेटलिफ्टिंगच्या ४० किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले. त्या जिंकणाऱ्या क्षणांविषयी काजल सांगत होती.सांगलीपासून हरयाणातल्या पंचकुलापर्यंतचा सोपा नव्हता तिचा प्रवास. हातातोंडाचा ताळमेळ घालताना पालकांची होणारी दमछाक तिनं पाहिली होती. तिचा मोठा भाऊही वेटलिफ्टिंग करतो. त्याचं आणि काजलच डाएट सांभाळता सांभाळता आईवडील किती रक्ताचं पाणी करतात ते या लेकीनं पाहिलं होतं. आणि समोर उभी होती खेलो इंडियाची संधी. त्या संधीचं सोनं करत काजलनं आपल्या वजनाच्या तिप्पट वजन उचलून सुवर्णपदक जिंकलं. ती सांगत असते, हे वजन उचलण्याचं बळ मला माझ्या प्रशिक्षकांनी आणि पाठबल देणाऱ्या पालकांमुळेच मिळालं.
(Image : google)
काजलचे वडील महादेव सलगर सांगलीतील संजयनगर परिसरात दहा बाय दहाच्या छोट्या टपरीत चहा-भजी विकण्याचा व्यवसाय करतात. तिची आई राजश्री मेसचे डबे पुरवते. तिला दोन भाऊ. पाच माणसांचं हे कुटुंब. त्यात धाकटी १७ वर्षांची काजल. ११३ किलोचे बारबेल उचलून सुवर्णपदकाची कमाई करुन ती आता घरी येते आहे हे यश खरोखरच वजनदार आहे.काजलला संकेत आणि जीवन हे दोन मोठे भाऊ. संकेतमुळेच तिला वेटलिफ्टिंग स्पर्धेची आवड निर्माण झाली. गेल्या चार वर्षांपासून ती सरावही करते आहे. मात्र घरची परिस्थिती लक्षात घेता तुम्हाला मुलीच्या खेळाचा खर्च झेपणार नाही, असे सल्ले अनेकांनी तिच्या वडिलांना दिले. पण हा बाप आपल्या लेकीच्या मागे उभा होता. काजलच्या जन्माच्या आधीपासूनच त्यांनी ठरवलं होतं की लेक झाली तर तिलाही आपल्याला जमेल ते सारं द्यायचं. ते त्यांनी स्वत:ला दिलेलं वचन आजवर निभावलं. पोटाला चिमटा काढून तर कधी अनावश्यक खर्च टाळून त्यांनी काजलला प्रोत्साहन दिलं. स्थानिक स्पर्धांमध्ये पदके जिंकण्याव्यतिरिक्त काजलने कनिष्ठ गटात जिल्हा विजेतेपदही जिंकेले. दोन मुलांच्या सरावासाठी पैसे पुरवताना कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होताच. पण प्रशिक्षक मयुर सिंहासणे यांनी त्यांना सहकार्य केले. आणि त्यांच्या लेकीनं राष्ट्रीय स्तरावर पदक जिंकत हा विश्वास सार्थ ठरवला.
(Image : google)
प्रशिक्षकांचा चेहराच दिसला..
वेटलिफ्टींगमध्ये करिअर करण्याचं स्वप्न आई वडिलांनी दाखवलं पण प्रशिक्षक मयुर सिंहासणे यांच्यामुळेच हे स्वप्न सत्यात उतरलं असं काजल सांगते. तिच्या मते ज्या ज्या वेळी माझ्या परिस्थितीची आणि आई वडिलांच्या कष्टाच्या आड संकट आलं ते संकट केवळ सिंहासणे सरांनी परतवले. या स्पर्धेत यश मिळवून ये असं पालकांनी सांगितले होतं पण यश तुलाच मिळणार हा सरांचा विश्वास होता. त्यामुळे वजन उचलल्यानंतर जेव्हा माझा हात हवेत होता तेव्हा डोळ्यासमोर कौतुक करणाऱ्या सिंहासणे सरांची छबी उमटली होती.
(Image : google)
पदक मिळालं तरी मेस सोडणार नाही!
वेटलिफ्टींगचा सराव, अभ्यासाची वेळ यांचा ताळमेळ साधून आईच्या मेसमध्ये तिला मदत करणं हे काजलच्या दिनचर्येचा भाग आहे. सुवर्णपदक मिळविल्यानंतरही आपल्या या दिनचर्येत काहीच बदल होणार नाही, असं काजलनं मनापासून सांगितलं. ती म्हणाली, ‘मेसचे जेवण वेळेत तयार करावे लागते, तिथे उशीर चालत नाही. आईला मदतनीस ठेवणं शक्य नाही, त्यामुळे कितीही पदके मिळाली तरीही आईबरोबर मेसचं काम करणं मी कधीच सोडू शकत नाही. या कामातूनच तर परिस्थितीबरोबर झुंजण्याची ताकद मिळाली.’