(Image Credit - The Better India)
नोकरी करत असो किंवा गृहिणी असो. आपला स्वत:चा बिझनेस असावा. स्वत: ची ओळख असावी असं प्रत्येक महिलेला वाटतं. लहानपणापासून आपण ज्या वातावरणात वाढतो त्याकडे एक बिझनेस आयडिया म्हणून पाहणाऱ्या महिलेची कहाणी पाहूया. मुंबईतील ठाण्याच्या रहिवासी असलेल्या ५१ वर्षीय कमलजीत कौर या पंजाबमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या. मार्च २०२०मध्ये जगभरातील इतर लोकांप्रमाणेच त्यासुद्धा कोरोनाशी लढत होत्या. त्यावेळी त्यांच्या कुटुंबातील लोकही नैराश्यात होते. (kimmus kitchen takes ludhiana bilona ghee to poland)
त्यांची शारीरिक स्थिती अधिकच खालावत होती. आपण कधीच बरं होऊ शकणार नाही असं त्यांना वाटू लागलं. त्यानंतर अचानक त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. आपल्या आजाराशी लढण्याची शक्ती कशी मिळाली, आपण बरे कशामुळे झालो. याच विचारात त्या होत्या. मग त्यांना आपल्या लहानपणाचे दिवस आठवले लहानपणी त्या शेतात उगवलेल्या ताज्या, भाज्या फळं खायच्या, म्हशीचं ताजं दूध प्यायच्या. तेव्हा त्यांना कळलं की हा खाण्यापिण्याचा परिणाम आहे. त्याचवेळी त्यांच्या डोक्यात एक बिझनेस आयडिया आली.
लुधियानाच्या एका लहानश्या गावात लहानाच्या मोठ्या झालेल्या कमलजीत यांच्याघरी दुधाची काहीही कमतरता नव्हती. पनीर, दूधापासून तयार झालेले पदार्थ खाण्याला त्या प्राधान्य द्यायच्या. मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर त्यांना ताज्या दुधाची कमतरता जाणवायची.
(Image Credit- The Better India)
कोविडमधून बरं झाल्यानंतर काही महिन्यांनी, कमलजीत यांनी जवळपास तीन महिन्यांच्या मार्केट रिसर्चनंतर डिसेंबर 2020 मध्ये 'किम्मूज किचन' सुरू केले. फार्मफ्रेश बिलोना तूप हे एक स्टार्टअप आहे. लुधियानाच्या गावांमध्ये पारंपारिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या तुपाला बिलोना तूप म्हणतात. यामध्ये कोणतेही पदार्थ, संरक्षक किंवा हानिकारक रसायने वापरली जात नाहीत
द बेटर इंडियाशी बोलताना कमलजीत यांनी सांगितले की, ''स्वत:चा बिझनेस सुरू करण्यासाठी मी सुरूवातीला स्थानिक विक्रेत्यांकडून दूध विकत घेतलं. पण मला त्यातून गावाच्या दूधाची अस्सल चव मिळत नव्हती. मला माझ्या उत्पादनाच्या गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड करायची नव्हती. म्हणून मी गावावरून मुंबईला दूध आणण्याची व्यवस्था केली. मी कधीच दुकानातून तूप विकत घेतलं नाही. बाहेरून तूप आणणं माझ्यासाठी देवाचा अपमान करण्यासारखं आहे. मी ज्या वातावरणात वाढले ते कल्चर लोकांपर्यंत पोहोचवणं ही माझी बिझनेस आयडिया होती. ''
तूप बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत. पण कमलजीत यामध्ये दह्यापासून तूप बनवतात, थेट लोणी किंवा मलईपासून नाही. बाजारात विकले जाणारे बहुतेक तूप, लोणी किंवा मलईपासून बनवले जातात. दुधापासून तूप बनवण्याची ही पारंपारीक पद्धत असली तरी त्याला एक खास स्वाद आणि सुगंध असतो. यासाठी गाईचं दूध उकळवून थंड केलं जातं. त्यात एक चमचा विर्जण घालून रात्रभर दही लावलं जातं. सकाळी दह्यातून लोणी काढून तूप मंद आचेवर शिजवलं जातं. जेणेकरून त्यातील पाण्याची वाफ होईल आणि शुद्ध तूप तयार होईल.
किम्मूज किचनमध्ये तूप बनवण्यासाठी म्हशीच्या दुधाचा वापर केला जातो.
कमलजीत म्हणतात, ''असे काही दिवस असतात जेव्हा आम्हाला 100 च्या आसपास ऑर्डर मिळतात, काही दिवस निम्म्या आणि काही दिवस आम्हाला अजिबात ऑर्डर मिळत नाहीत. त्यामुळेच व्यवसाय कसा चालेल हे सांगणे थोडे अवघड आहे. पण ज्या प्रकारे प्रगती होत आहे त्याबद्दल मी आनंदी आहे."
आज किम्मूज किचन दर महिन्याला 20 लाख रुपये कमवत आहे. दर महिन्याला देशभरात 45 हजारांच्या आसपास तुपाच्या बाटल्या विकल्या जातात. कमलजीत सांगतात, ''कमाईचा काही भाग सेवेसाठी वापरला जातो. मग ते गुरुद्वारामध्ये लोकांना खाऊ घालणे असो किंवा इतर कोणत्याही प्रकारची सेवा असो.''