बॉलिवूड अभिनेत्री म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते एक ठराविक देखणी फिगर. कमनीय बांधा, रंग गोरा, केस घनदाट लांबसडक, गालावर एखादी खळी, टपोरे बोलके डोळे, चाफेकळी नाक, डाळिंबासारखे लालचुटुक ओठ आणि ठराविक फिगर. हिरोईन म्हटलं की मग ती या समाजाने मान्य केलेल्या ठराविक साच्यातलीच पाहिजे तर तिला हिरोईन म्हणून लोक आनंदाने स्वीकारतात. पण आता अभिनेत्रीही ही बंधनं झुगारत आहेत. आपलं काम बघा बाकी तुमचे निकष आम्ही मानत नाही म्हणून अनेकजणी आपली नवी वाट चालत आहेत. त्यातलीच एक अभिनेत्री कीर्ती कुल्हारी. तिनं नुकतेच आपले केस कापून बारीक बॉयकट करुन टाकला. अनेकांनी तिला नावं ठेवली तर कुणी कौतुकही केलं. पण तिला वाटलं ते करुन ती मोकळी झाली.
बॉलिवूड आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सुप्रसिद्ध अभिनेत्री कीर्ती कुल्हारीने नुकताच एक धाडसी निर्णय घेतला. कीर्तीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून नुकताच तिचा एक फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा नवीन लूक चाहत्यांसमोर आणला आहे. कीर्तीने आपले केस शॉर्ट केले आणि नव्या हेअरस्टाइल बद्दल उघड सांगितलं. ती म्हणते, 'एका महिन्यापूर्वी मी निर्णय घेतला आणि आता करुनच टाकला बारीक हेअरकट!'(Kirti Kulhari reveals massive change in her look, says ‘I have no time to not do what I want to do).
कीर्ती म्हणते...
१५ वर्षे झाली मी या फिल्म इंडस्ट्रीत आहे. करिअर सुरू होतं, अनेकदा विचार केला की, कामातून ब्रेक मिळेल तेव्हा हे एकदा तरी नक्की करेन. मी खूप काही मोठं केलं नाही. मनात आलं ते केलं. आयुष्य जगाताना आता असे निर्णय घेत राहणार आहे. आणि हे मी माझ्यासाठी केलंय. कोणत्याही भूमिकेसाठी नाही. मी इतकी वर्षे माझ्या मनाप्रमाणे काहीच करू शकले नव्हते. जर मी काही करायला गेलेच तर ते समाजाने ठरवून दिलेल्या मापदंडाप्रमाणे नव्हते. पण आज मी माझ्या मनाप्रमाणे वागायला सुरूवात केली आहे आणि यामुळे मला फार आनंद होतो आहे आणि माझ्या मनासारखं आयुष्य जगते आहे.
उत्तर प्रदेशची धाकड गर्ल बनली भारतातील पहिली महिला बाउन्सर, धीट मुलीचा प्रेरणादायी प्रवास...
प्रियांका चोप्राने तिसाव्या वर्षीच केले होते एग्ज फ्रिजिंग! ते नेमके काय असते?
कीर्तीच्या या नवीन लुकचं तिच्या चाहत्यांनी कौतुक केलं असलं तरी, अनेकांनी कीर्तीला सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. काहींनी तिच्या धाडसाचे आणि तिच्या स्वतःवरील प्रेमाचे कौतुक केले आहे. तुझा हा नवीन लूक खूप आवडला अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर काहींनी ट्रोल केलं. पण आपल्याला आवडतं ते करायचं असं ठरवलेल्या कीर्तीला यानं काही फरक पडत नाही हे उघडच आहे.