लंडनची राणी कॅमिला यांनी ब्रिटीश भारतीय जासूस असलेल्या नूर इनायत खान यांच्या एका चित्राचे नुकतेच अनावरण केले. शाही खानदानातील एक असलेल्या कॅमिला यांनी रॉयल एअरफोर्स क्लबच्या एका खोलीलाही नूर इनायत खान असे नामकरण करण्यात आले. या खोलीत रॉयल एअर फोर्समध्ये योगदान देणाऱ्या महिलांचे फोटो लावण्यात आले आहेत. ज्याचे उद्घाटन कॅमिला यांची सासू व तत्कालिन महाराणी दुसरी एलिझाबेथ यांनी केले होते. आता नूर इनायत खान यांनी दिलेल्या योगदानासाठी ब्रिटनने त्यांना खास सलाम केला आहे. त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांचे काम येणाऱ्या पिढ्यांना समजावे यासाठी त्यांच्या या चित्राचे नुकतेच अनावरण करण्यात आले. त्यानिमित्ताने त्यांचे कार्य समजून घेऊया (Know Who is British Indian Spy Noor Inayat Khan Queen Camilla unveils her Portrait )...
कोण आहेत नूर इनायत खान?
नूर इनायत खान यांना नोरा बेकर म्हणूनही ओळखले जाते. त्यांना गुप्तहेर म्हणून रेडीओ ऑपरेटरच्या रुपाने फ्रान्समध्ये पाठवण्यात आले होते. तेव्हा त्यांना मेडेलिन या कोड नावाने ओळखले जायचे. नंतर त्या रॉयल एअर फोर्सच्या शाखा महिला सहाय्यक होत्या. त्यांची १९४२ मध्ये स्पेशल ऑपरेशन्स एक्झिक्युटीव्ह म्हणून मध्ये भरती करण्यात आली. अत्यंत खडतर परिस्थितीत साहस दाखवणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या जॉर्ज क्रॉस या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. दुसऱ्या जागतिक युद्धात नूर यांनी ब्रिटनकडून अंडरकव्हर एजंट म्हणून काम केले होते. इतकेच नाही तर नूर या टिपू सुलतान यांच्या वंशज होत्या.
या कार्यक्रमादरम्यान ब्रिटीश भारतीय लेखिका असलेल्या श्रबानी बसू यांनी राणी कॅमिला यांना नूर इनायत खान यांच्यावर लिहीण्यात आलेल्या ‘स्पाय प्रिन्सेस: द लाईफ ऑफ नूर इनायत खान’ हे पुस्तक भेट म्हणून दिले. बसू म्हणाल्या, राणी कॅमिला यांच्याकडून नूर यांच्या चित्राचे अनावरण होणे ही अतिशय आनंदाची बाब आहे. नूर यांच्या कार्याची ओळख करुन देणे ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. हे चित्र आता पुढील बऱ्याच पिढ्यांपर्यंत पोहोचेल आणि नूर यांचे काम कधीच विस्मरणात जाणार नाही.