संदीप आडनाईक
कोल्हापूरची तेरा वर्षांची ऐश्वर्या जाधव. एवढीशी मुलगी पण तिच्या कर्तबगारीचं कौतुक करावं असं आहे. नुकतंच तिनं टेनिसमध्ये जागतिक स्थान मिळविले आहे. एशियन टेनिस फेडरेशनतर्फे इंग्लंड येथे होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेसाठी ऐश्वर्याची आशियाई संघात निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी निवड झालेली ती देशातील एकमेव खेळाडू आहे. ऐश्वर्या ही कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनची (केडीएलटीए) खेळाडू आहे. ऐश्वर्याने गेल्या सात वर्षात १०, १२ आणि १४ वर्षाखालील मुलींच्या गटातून २५ हून अधिक राज्यस्तरीय आणि ४० हून अधिक राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत प्रतिनिधित्व करत ३१ स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. रोज चार तासाचा सराव आणि एक तासाचा व्यायाम करणाऱ्या ऐश्वर्याचे विम्बल्डनमध्ये खेळण्याचे स्वप्न साकारते आहे. १३ वर्षाच्या ऐश्वर्याचे आणखी कौतुक म्हणजे तिने १६ वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एकेरी आणि दुहेरीत नामांकित खेळाडूंचा पराभव केला आहे.
सोपा नव्हता विम्बल्डनपर्यंतचा प्रवास
ऐश्वर्या मूळची पन्हाळा तालुक्यातील यवलूज गावची. मध्यमवर्गीय कुटुंब. ऐश्वर्याचे वडील दयानंद विमा कंपनीत सर्व्हेअर आहेत तर आई अंजली गृहिणी. ऐश्वर्याच्या टेनिसमधील कारकीर्दीसाठी या कुटूंबाने गाव सोडून कोल्हापूर गाठले. शालेय शिक्षण घेताना एखाद्या खेळाचा सराव असावा म्हणून ऐश्वर्याचे वडील दयानंद यांनी मेरीवेदर ग्राउंडवरील कोल्हापूर जिल्हा लाॅन टेनिस असोसिएशनच्या टेनिस संकुलात दाखल केले, तेव्हा ती फक्त सहा वर्षाची होती. छत्रपती शाहू विद्यालयात शिक्षण घेत तिने टेनिसचा सराव सुरु केला. नंतर अर्शद देसाई टेनिस अकॅडमी जॉईन केली. रोज कसून केलेल्या सरावामुळे टेनिसकोर्टावर दीड दोन तास टिकून राहण्याची क्षमता निर्माण झाली. यावरच दहा वर्षाखालील मुलींच्या दहा राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होउन त्यातील ९ स्पर्धा जिंकत ती राष्ट्रीय खेळाडू बनली.
सर्किट हाउस परिसरात भाड्याच्या घरात राहून ऐश्वर्याने तिच्या सरावात खंड पडू दिला नाही. २०१९ च्या महापूरात ते रहात असलेल्या घरात पाणी शिरले. पुढे कोरोनाचेही संकट आले. सरावात अनेक अडचणी आल्या. पण तरी जमेल तसा प्रामाणिक सराव, मेहनत तिनं सुरु ठेवली. जागतिक कीर्तीची टेनिसस्टार सेरेना विल्यम्स तिचा आदर्श आहे. तिचे सामने पहात तिने तसाच सराव सुरु ठेवला. वडिलांचे कष्ट आणि प्रोत्साहन, प्रशिक्षक अर्शद देसाई आणि मनाल देसाई यांच्यामुळेच मी टेनीस खेळतेय. त्यांचं पाठबळ मोलाचं आहे असं ऐश्वर्या आवर्जुन सांगते.
दहा वर्षाखालील मुलींच्या गटात ती महाराष्ट्रात दुसऱ्या आणि १२ वर्षाखालील मुलींच्या गटात देशात सहाव्या क्रमांकावर राहिली. २०२१च्या सुरुवातीला ती १४ वर्षाखालील मुलींच्या गटात ९४ व्या क्रमांकावर होती आणि अखेरीस सातव्या स्थानावर राहिली. प्रशिक्षकांचे सातत्याने मिळणारे प्रोत्साहन आणि वैयक्तिक मार्गदर्शन यामुळे आज ती १४ वर्षाखालील मुलींच्या गटात देशांत अव्वल क्रमांकावर आहे.
शूज फाटल्यामुळे पराभव झाल्याची खंत
केवळ शूज फाटल्यामुळे क्वार्टर फायनलमध्ये एक गेमने पराभव झाल्याचा अनुभव ऐश्वर्या सांगते. १४ वर्षाखालील एआईटीए सुपर सीरीज़मध्ये एकेरीत आंध्र प्रदेशच्या मनोज्ञा मदासु विरोधात खेळताना क्वार्टर फायनलच्या सामन्यात शूजमुळे पराभव स्वीकारावा लागल्याची तिला खंत आहे. मनोज्ञाविरोधात यापूर्वी ती गुवाहटीत अंडर १६ सामन्यात पराभूत झाली होती. हा पराभव गाठी बांधून तिने मजबूत खेळी करत पहिला सेट ६-३ असा जिंकला होता, आणि ५-४ ने ती पुढे होते, पण तेवढ्यात तिचा शूज फाटला. त्याचा फायदा प्रतिस्पर्धी खेळाडूंनी घेतला. तिसरा सेट खेळण्यापूर्वी तिने वडिलांच्या मदतीने शूज तात्पुरता दुरुस्त केला, कारण तिच्याकडे दुसरा जोड नव्हता. परंतु मनोबल ठीक न राहिल्यामुळे तिसरा सेट ४-६ ने हारला. ही माझी मोठी खंत होती असा अनुभव ऐश्वर्याने सांगितला.
कोल्हापूरातील अर्शद देसाई टेनिस अकॅडमीचे अर्शद देसाई आणि मनाल देसाई हे तिचे प्रशिक्षक आहेत. ते म्हणाले, अशाप्रकारचे अनुभव आल्यानेच तिला कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी सज्ज केले आहे. १२ वर्षाखालील एका सामन्यातही शूज फाटल्यामुळे विचलित झाल्याने कसे पराभवाला सामोरे जावे लागल्याचा अनुभवही त्यांनी सांगितला. भविष्यातही ती उत्तमच खेळेल असा विश्वास प्रशिक्षक अर्शद देसाई यांनी व्यक्त केला आहे.
ऐश्वर्या म्हणते, छोट्या छोट्या घटनांमुळे खेळावर परिणाम करु न देता सामन्यावर लक्ष्य केंद्रीत करत चांगले खेळणे आणि जिंकणे हेच जुन्या अनुभवातून शिकले. पराभवामुळे मनोबल कमी झाले खरे, पण तेव्हा माझ्या प्रशिक्षकांनी मला समजावले. नंतर दुहेरीत खेळण्यासाठी शूजच्या नव्या जोडीची खरेदी केली. आता विम्बल्डन जिंकणार असा मला आत्मविश्वास आहे, असे तिने सांगितले.
(लेखक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत उपमुख्य उपसंपादक आहेत.)