Join us  

वडिलांचं बास्केटबॉलचं स्वप्न पूर्ण करणारी लेक; भारतीय बास्केटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदापर्यंत मारली उंच उडी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2022 3:52 PM

अर्णिका गुजल-पाटील. भारतीय बास्केटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून आता काम पाहणार आहेत.

ठळक मुद्देबास्केटबॉल खेळणाऱ्या अर्णिकाची जिद्द अनेक खेळाडूंना मार्गदर्शक ठरावी.

- प्रगती जाधव-पाटील

अर्णिका गुजर-पाटील. भारतीय बास्केटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून आता काम पाहणार आहेत. मूळच्या सातारा जिल्ह्यातल्या. एक आंतरराष्ट्रीय खेळाडू ते प्रशिक्षक पदापर्यंतचा अर्णिका यांचा प्रवास अत्यंत खडतर, पण तितकाच हिमतीचा आहे. मुळात बास्केटबॉल खेळणाऱ्या मुलींची संख्या आपल्याकडे कमी. मात्र, अर्णिका यांची गोष्ट काहीशी वेगळी आहे. त्यांच्या वडिलांच्या बास्केटबॉल प्रेमाची आणि तितक्याच जिद्दीची.१९९० च्या दशकात दिवंगत रणजित गुजर यांनी बास्केटबॉल खेळाच्या प्रचार प्रसारासाठीच एक शाळा सुरू केली. शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खेळाविषयी आवड निर्माण होण्यासाठी त्यांनी त्यांची थोरली लेक अर्णिकाला बास्केटबॉलचे बाळकडू दिले. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली अर्णिकाने शालेय स्तरापासून राज्यस्तरापर्यंत मैदान गाजविले. दुर्दैवाने एक स्पर्धा संपवून संघासह परतत असताना एका भीषण अपघातात अर्णिकाचे वडील रणजित गुजर जागीच ठार झाले. शालेय वयात झालेल्या या आघाताने अर्णिका पुरती हादरली; स्वत:सह आई आणि दोन भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी अगदी कमी वयात तिच्यावर पडली. मात्र, वडिलांनी दाखविलेल्या मार्गाने जाण्याचा हिय्या करून तिने बास्केटबॉलचा सराव सुरू ठेवला. यासाठी तिला साथ लाभली ती तिच्या आईची. वडिलांच्या मृत्यूचे दु:ख काळजात ठेवून बास्केटबॉल खेळणारी ही मुलगी सतत पुढेच जात राहिली. १९९७-१९९८मध्ये राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कारानेही तिला गौरविण्यात आले.

वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी हाँगकाँग येथे १९ वर्षांखालील स्पर्धांसाठी १९९४ मध्ये तिची निवड झाली होती. त्यानंतर बँकॉक येथे तेराव्या जुनिअर एशियन बास्केटबॉल चॅम्पियनशिपसाठीही ती संघात सहभागी झाली होती. २००६ मध्ये ऑस्ट्रेलियात मेलबर्नमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्येही तिने भारताचे प्रतिनिधित्व केले. २००५ मध्ये निमंत्रितांच्या महिला आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल संघात सहभागी होऊन तिने सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धा थायलंड येथील फुकेतमध्ये झाल्या होत्या. १९९० ते २००० असे सुमारे दहा वर्षे तिने महाराष्ट्राचे नेतृत्व केले. बास्केटबॉलचं पॅशन तिचे ड्रायव्हिंग फोर्स बनले.

अर्णिका सांगते, माझे वडील रणजित आणि आई रूपाली यांचेच सारे श्रेय आहे. वडिलांची शिकवण आणि आईचे संस्कार या दोन्हीचा मिलाप झाला नसता तर आयुष्यात हे यश बघायला मिळाले नसते. वडिलांनी पाहिलेलं बास्केटबॉलचं स्वप्न मी पूर्ण करावं यासाठी आईचा पाठपुरावा मोठा होता. ज्या काळात मुलींना खेळासाठी तालुक्याबाहेर पाठवणं म्हणजे दिव्य होतं अगदी तेव्हा पितृछत्र हरपलेल्या लेकीला भारतभर आणि विदेशात जाण्याची हिंमत आईमुळेच मिळाली.आणि आता त्यापुढे एक पाऊल टाकत बंगळूर येथे ५ ते ११ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या महिला आशियाई अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेसाठी बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाने भारतीय संघाची घोषणा केली. या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अर्णिका गुजर - पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बास्केटबॉल खेळणाऱ्या अर्णिकाची जिद्द अनेक खेळाडूंना मार्गदर्शक ठरावी.

टॅग्स :बास्केटबॉलप्रेरणादायक गोष्टी