Join us  

मा तुझे सलाम! मातेनं थोडंथोडकं नाही तर तब्बल १६०० लीटर दूध केलं दान, गिनिज बुक रेकॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2023 12:11 PM

Largest Breast Milk Donation Record by US Woman with Hyperlactation Syndrome Elisabeth Anderson : रेकॉर्ड ब्रेक करत सर्वाधिक दूध दान करणारी महिला म्हणून मिळाला सन्मान...

नवजात बाळासाठी आईचे दूध किती महत्त्वाचे असते आपल्या सगळ्यांना माहितच आहे. पहिले किमान ६ महिने बाळ आईच्या दूधावरच असते. आजकाल आईला उशीरा दूध आले किंवा पुरेशा प्रमाणात दूध आले नाही तर फॉर्म्युला मिल्क देण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. मात्र आईच्या दूधाची सर इतर कोणत्याही गोष्टीला नाही हेच खरे. मातेच्या शरीरात बाळंतपणानंतर नैसर्गिकरित्या तयार होणारे दूध हे बाळासाठी पूर्णान्न असते. मात्र काही बाळांना काही कारणाने हे दूध मिळू शकत नाही. हे दूध न मिळाल्याने या मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास खुंटण्याची शक्यता असते. यासाठीच ज्या महिलांना जास्त प्रमाणात दूध येते त्यांना दूध दान करण्याचे आवाहन वारंवार केले जाते. गेल्या काही वर्षात जगभरात त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून अनाथ किंवा आईचे दूध न मिळणाऱ्या बाळांना त्याचा अतिशय चांगला फायदा होत असल्याचे दिसत आहे (Largest Breast Milk Donation Record by US Woman with Hyperlactation Syndrome Elisabeth Anderson). 

(Image : Google)

एका महिलेने नुकतेच थोडेथोडके नाही तर १६०० लीटर दूध दान करुन रेकॉर्ड तयार केला आहे. अमेरिकेत राहणाऱ्या एलिझाबेथ एंडरसन मागील काही वर्षांपासून आपले दूध दान करत आहे. २ मुलांची आई असलेली एलिझाबेथ हीला प्रमाणापेक्षा जास्त दूध येण्याची समस्या आहे. त्यामुळे २० फेब्रुवारी २०१५ पासून २० जून २०१८ पर्यंत तिने १६०० लीटर दूध दान केले आहे. तिने केलेल्या या रेकॉर्डची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद केली असून इतक्या मोठ्या प्रमाणात दूध दान करणारी ती एकमेव महिला आहे. अलिझाबेथ हिला हायपरलॅक्टेशन सिंड्रोम आहे. त्यामुळे तिच्या शरीरात प्रमाणापेक्षा जास्त दुधाची निर्मिती होते. हे दूध वाया जाऊ नये म्हणून ती ते दान करते. 

तिने दान केलेल्या दुधामुळे हजारो बाळांना याचा अतिशय चांगला फायदा होत असल्याचे दिसते. अशाप्रकारे जास्तीत जास्त महिलांनी आपले जास्तीचे दूध दान करावे असे आवाहनही एलिझाबेथ हीने यावेळी केले आहे. किती बाळांना याचा नेमका फायदा झाला असेल हे मोजणे अवघड असल्याचेही एलिझाबेथ हीचे म्हणणे आहे. अशाप्रकारे आईचे दूध मिळू न शकणाऱ्या बाळांना आपण आपले दूध देऊ शकतो ही खूप जास्त आनंद देणारी गोष्ट असल्याचेही ती म्हणाली. सुरुवातीला ती जास्तीचे दूध फेकून देत होती. मात्र नंतर आपण असे फेकून देण्यापेक्षा त्याचा चांगल्या पद्धतीने उफयोग करु शकतो हे लक्षात आल्यानंतर ती दिवसाला ६ लीटर दूध पंपने बाहेर काढायला लागली आणि मिल्क बँकला हे दूध दान करुन तिने हे अतिशय महत्त्वाचे काम केले आहे. अनेकदा प्रीमॅच्युअर मुलांचा दूध न मिळाल्याने मृत्यू होण्याची शक्यता असते. मात्र अशाप्रकारे दूध दान करणाऱ्यांमुळे या मृत्यूचे प्रमाण निश्चितच कमी होईल. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीदूध पुरवठादूध