भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर देशातील शक्ती आणि संस्कृती यांचे दर्शन घडवणारी परेड आयोजित करण्यात आली होती. या परेडमध्ये सैन्य दलाचा वाद्यवृंद आणि कवायत करणाऱ्या तुकडीचा सहभाग होता. यामध्ये सैन्यदलातील विविध पदावरील अधिकाऱ्यांनी अनेक साहसी खेळ सादर केले. यंदाच्या वर्षी २६ जानेवारीला महिलाशक्तीचे दर्शन झाले. लेफ्टनंट शिवांगी सिंह, भारतीय हवाई दलाच्या चित्ररथाचे नेतृत्व करत होत्या. राफेल लढाऊ विमान चालवणारी पहिली महिला असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. याबरोबरच लेफ्टनंट मनिषा बोहरा यांनाही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. याचे कारण म्हणजे भारतीय सैन्यात पुरुष सैन्य गटाचे नेतृत्व करणाऱ्या मनिषा या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या.
कोण आहेत मनिषा बोहरा?
मनिषा यांचे शालेय शिक्षण सिकंदराबाद येथील आर्मी स्कूलमध्ये झाले आहे. तर उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी बीएससीची पदवी घेतली आहे. एसएसबी परीक्षा पास केल्यानंतर त्यांनी चेन्नई येथील ओटीए येथे प्रशिक्षण पूर्ण केले. मनिषा या उत्तराखंड येथील चंपावतमध्ये राहतात. तर त्यांचा परिवार लोहाघाट विकासखंड येथील खूनाबोरा गावात राहतो. त्यांचे वडिल दिनेश बोहरा हे सैन्यात सुभेदार पदावर कार्यरत असून त्यांच्या मागील तीन पिढ्यांनी सैन्यात काम केलेले आहे.
सैन्यातील पुरुषांच्या गटाचे नेतृत्व करणारी पहिली महिला
भारतीय सैन्यदल हे पुरुषांचे वर्चस्व असलेले क्षेत्र आहे. मात्र गेल्या काही वर्षात या क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. असे असले तरी सैन्यातील बहुतांश महत्त्वाची पदे ही पुरुषांकडेच असल्याचे चित्र आहे. मात्र काही स्त्री अधिकारी याला अपवाद असून त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. मनिषा याही अपवाद असून पुरुष गटाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. प्रजासत्ताक दिनाच्या आधीही १५ जानेवारी रोजी सेना दिवसाच्या निमित्ताने मनिषा यांनी ऑल मेल आर्मी ऑर्डीनन्स रेडिमेंटचे नेतृत्व केले होते. त्यामुळे सैन्यदलात त्यांच्या नावाची विशेष चर्चा आहे.