Lokmat Sakhi >Inspirational > आठ वर्षांचा मुलगा गमावला, त्याच्या आठवणीत आई भाजीपाला पिकवते-मोफत वाटून देते आणि..

आठ वर्षांचा मुलगा गमावला, त्याच्या आठवणीत आई भाजीपाला पिकवते-मोफत वाटून देते आणि..

आपलं मूल गमावल्याचं दु:ख बाजूला ठेवून तिनं ठरवलं की ज्यांना गरज आहे त्यांना वाटून टाकायची मुलाच्या आवडत्या बागेतली दौलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2022 03:14 PM2022-05-26T15:14:05+5:302022-05-27T12:12:31+5:30

आपलं मूल गमावल्याचं दु:ख बाजूला ठेवून तिनं ठरवलं की ज्यांना गरज आहे त्यांना वाटून टाकायची मुलाच्या आवडत्या बागेतली दौलत

Lost eight year old son, in his memory mother grows vegetables - distributes them for free and .. | आठ वर्षांचा मुलगा गमावला, त्याच्या आठवणीत आई भाजीपाला पिकवते-मोफत वाटून देते आणि..

आठ वर्षांचा मुलगा गमावला, त्याच्या आठवणीत आई भाजीपाला पिकवते-मोफत वाटून देते आणि..

Highlightsजगण्यावर प्रेम करणाऱ्या मुलासाठी मी एवढं तर करायला हवं.

म्हंटलं तर ही एका आईची गोष्ट आहे. आणि तिच्या देवाघरी गेलेल्या आठ वर्षांच्या मुलाची गोष्ट आहे. मात्र ती गोष्ट दु:खाचे कढ काढत बसण्याची नाही, तर जगण्याची आणि जगणं वाटण्याची आहे. अमेरिकेतल्या अलेक्झांड्रिया शहरात राहणारी जेम फर्नेल नावाची ही आई. ती काय करते तर दर शनिवारी घरासमोर अंगणात एका मोठ्या टेबलावर भाज्यांचे ढीग मांडून ठेवते. पालेभाज्या, वांगी, छोटी टरबुजं, घरीच केलेला ब्रेड कधी, मफिन्स आणि फुलं भरपूर. जो कोणी येईल, ज्या जे हवं-जेवढं हवं ते फर्नेल मोफत देऊन टाकते. लोक येतात. तिथं गप्पा मारतात थोड्या. हवं तेवढं घेतात जातात. अगदी कोरोना काळातही देहदूरी पाळून हा उपक्रम सुरुच होता. जेम त्याला फार्म स्टॅण्ड म्हणते. तिचा १४ वर्षांचा मुलगा लील आणि नवराही तिला मदत करतात. मुख्य म्हणजे सगळ्या भाज्या, फुलं तिच्या गार्डनमधल्याच असतात. जे जे सिझनल असेल ते ते सारं. मोफत देणं आणि आपण ‘देतोय’ असं न वाटता आणि वाटू देता देणं हे जेम आणि कुटुंबानं जमवलं आहे.
त्याची सुरुवात झाली दोन मुलं असलेल्या या सुखी कुटुंबाच्या कहाणीतून. त्यांना दोन मुलं मोठा लील आणि धाकटा ओली. त्याला प्राणी फार आवडत. आपण प्राण्यांसाठी काय करु शकतो, त्यांना अन्न मिळेल म्हणून काही पैसे देऊ शकतो का या विचारातून त्यांना वाटलं की आपण आपल्या घराच्या मोठ्या बागेत भाज्या-फळं लावू. ते विकून येतील ते पैसे ॲनिमल वेलफेअरला देऊ. तशी कुटुंबानं सुरुवातही केली. २०१८च्या आसपासची ही गोष्ट. मुलं मातीत हात घालू लागली होती. स्वतंत्रपणे काम करायची, हौशीनं बागकामाचं वेड लागलं होतं. फुलं विकून या मुलांनी जवळच असलेल्या पेट शेल्टरला आपल्या नफ्याचे पैसे देऊन टाकले.
पण एकदिवस अचानक ओलीचं पोट दुखायला लागलं. पोटात जंत असतील असं सुरुवातीला वाटलं.मात्र ओलीला ॲडरनल इनसफिशियंसी नावाचा आजार झाला होता. सहसा हा आजार लहान मुलांना होत नाही पण ओलीला झाला. आणि त्याला दवाखान्यात दाखल केलं काय आणि तो गेलाच. म्हणजे आपलं मूल आता आहे आणि आता नाही असं सगळं संपलं जेमसाठी.

(Image : Google)

ती सांगते, आम्हालाच कळत नव्हतं नक्की काय झालं. दु:खाच्या पलिकडे होतं सगळं. अवतीभोवतीच्या लोकांनी आम्हाला खूप धीर दिला. किती दिवस डबे दिले. आधार दिला. आणि मग एकदिवस शाळेतून ओलीची नोटबूक आली. त्यात त्यानं एक निबंध लिहिलेला. त्याला विषय देण्यात आला होता, तुला १०० डॉलर्स देण्यात आले तर तू काय काय करशील?
त्यात त्यानं लिहिलं होतं मी डॉग्ज बेड घेईन, डॉग फूडसाठी पैसे देईन, त्यांचा औषधोपचार करीन. त्यावेळी आम्हाला वाटलं की ओलीचं हे प्रेमळ रुप, त्याची देण्याची भावना आता आपण जगली पाहिजे. त्याच्या आवडत्या गार्डनमध्येच आपण याचं उत्तर शोधावं. आम्ही तासंतास बागेत बसायचो. मग आम्ही बागच मोठी करायची ठरवली. त्यात भाज्या-फळं लावली. त्यांची काळजी घेतली. लीलने त्याचं नाव ठेवलं एल ॲण्ड ओ फार्म.’
त्या बागेतून पिकणारी फळं-भाज्या न विकता त्यांनी ते सारं वाटून टाकायचं ठरवलं. २०२०पासूनच ते सुरु झालं. नेमका कोरोनाकाळ. सगळं लॉकडाऊन. पहिले काही दिवस फार काही कुणी आलं नाही. पण हळूहळू लोकांना माहिती कळत गेली आणि मग लोक स्वत:हून या फार्म स्टॅण्डवर येऊन हवं ते नेऊ लागले. 
जेम सांगते, आपण जेव्हा दु:ख वाटून घेतो तेव्हा आपणही दुसऱ्याची गोष्ट ऐकतो. आपलं मन हलकं होतं, त्यांचंही मन हलकं होतं. आपल्याला एकटं वाटत नाही, आपणही कुणाला एकटं वाटू देत नाही. ही सोबत, हे जगणं आपल्याला ताकद देतं. देणं-घेणं काही नसतं मग असते ती फक्त सोबत.’
लेकाच्या आठवणी जपत ही आई मग आपल्या बागेत फुललेला आनंद असा मोफत वाटून टाकते आहे. ती म्हणते तसं, वेदना तर आयुष्यभराची आहे, पण जगण्यावर प्रेम करणाऱ्या मुलासाठी मी एवढं तर करायला हवं.


 

Web Title: Lost eight year old son, in his memory mother grows vegetables - distributes them for free and ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.