मेघना ढोके
आसामच्या गोलाघाट जिल्हयातलं बरमुखिया गाव. त्या गावची लवलीना बोरगोहाईं. (Lovlina borgohain) 22 वर्षाची. वडील शेतकरी, लहानमोठं दुकान चालवतात. चहाच्या मळ्यातही काम करतात. थोडीशी शेतीही आहे. लवलिनाला दोन मोठय़ा जुळ्या बहिणी, लिमा आणि लिचा. त्या मू थाई नावाचा एक प्रकारचा मार्शल आर्ट शिकत. नंतर बॉक्सिंगही करु लागल्या. नॅशनल लेव्हलपर्यंत खेळल्या. लवलीना मात्र अशी जिद्दी, की थांबणं तिच्या स्वभावातच नाही. टोक्यो ऑलिम्पिकसाठी ती पात्र ठरली तेव्हा तिला फोन केला. अर्थात खुश होती पण म्हणाली, ‘अभी जो कॉम्पिटिशन हुआ उसमें मेडल तो मै लाया, लेकीन परफॉर्म अच्छा नहीं किया, मैने मन में बोल दिया था की, जो हो ऑलिम्पिक में गोल्ड लाने का, और कुछ नहीं सोचनेका.’
ऑलिम्पिक हे एकच लक्ष्य तिच्यासमोर होतं. हायपर ट्रेनिंगही सुरू होतं. ऑलिम्पिकपूर्वी तिची नजर होती ती वर्ल्ड चॅम्पिअनशिपवर. ते पदक जिंकून तिला ऑलिम्पिकच्या दिशेनं जायचं होतं. मात्र कोरोनाकाळातल्या जगभरातील लॉकडाऊनमुळे ती स्पर्धाही रद्द झाली, आणि ऑलिम्पिकही पुढे ढकलण्यात आलं.
लवलीना आपल्या गावी घरी परत गेली, बरेच वर्षांनंतर ती इतका सलग काळ आपल्या घरच्यांसोबत, गावी राहत होती. म्हणाली, ‘ क्वॉलिफाय कर लिया इसका खुशी था, मगर मुझे मालूम था मेरा परफॉर्मन्स खराब था ! माझ्या स्वत:कडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षेनुसार मी खेळले नव्हते, मला ती रुखरुख होती आणि वाटत होतं की आता गोल्डशिवाय दुसरं काही बोलायचंच नाही. त्यानुसार मी तयारी सुरूकेली. ट्रेनिंग लेव्हल हाय होती. जास्तीत जास्त ट्रेनिंगच करत होते. आणि मग एकदम ब्रेक लागला. पुढे काय असा प्रश्न होताच. हायपॉवर ट्रेनिंगही सतत जास्त काळ नाही करू शकत. म्हणून मग मी घरी आले. माझ्याकडे घरात फिटनेस ट्रेनिंगची साधनं आहेत. त्यावर मी सराव करत राहिले. पण फार सरावही नाही करता येत, इंज्युरीची भीती असते. म्हणजे इंज्युरीपण व्हायला नको आणि स्लोही व्हायला नको असं सगळं बॅलन्सिंग सुरू झालं. घरी राहायची सवयच नव्हती. फ्री टाइम नावाची गोष्टच नव्हती आयुष्यात. आता दोन-तीन महिने मी घरीच आहे. बॉक्सिंगचे व्हिडिओ पाहतेय सलग, ॲनालिसिस करेक्शनही करतेय. आमच्याकडे शेतात लावणीही सुरू झाली, मग पापांबरोबर मी लावणीलाही गेले. घरी आई खूप आजारी आहे. त्यामुळे आता बरंही वाटतं आहे की, मला स्वयंपाक, तिची देखभाल हे सगळं नीट करता आलं. गावात माझ्या नदी वाहते छान, तिथं जाता येतं, बसता येतं. घरच्या माणसांबरोबर काही काळ तरी राहता आलं. आता पुढची स्पर्धा जाहीर झाली की पुन्हा नव्यानं नव्या तयारीला लागायचं. यहीं लाइफ है. पॉझिटिव्ह मोड में रहना है बस!’लवलीना अगदी मोजकं बोलते. हसते बोलताना. मात्र त्यामागची जिद्द अशी की त्या जिद्दीला सलाम करावा.
लॉकडाऊन काळातच तिची आई किडनीच्या आजाराने त्रस्त होती. आईला दवाखान्यात लांब सहा तास प्रवास करुन ती गुवाहाटीलाही घेऊन जायची. आपण आजारापणात आईच्या सोबत आहोत यानंही तिला बरं वाटत होतं. कारण ‘साई’तर्फे तिची निवड झाली आणि नंतर ती गुवाहाटीतच राहत होती. तिच्या दोन्ही बिहणी सीआयएसएफ आणि बीएसएफमध्ये नोकरीला आहेत. त्यामुळे आईपाशी राहून तिनं त्याकाळात घर सांभाळलं. तेव्हाच अर्जून पुरस्कारही तिला मिळाला. कोरोनाचा संसर्गही झाला. मात्र त्यासाऱ्यातून सावरत तिने पुन्हा पुण्यातल्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग सुरु केलं. दरम्यान तिच्या आईला किडनी डोनर मिळाला, आईचं किडनीचं कोलकात्यात ऑपरेशनही झालं. फक्त दोन दिवस ती आईला भेटून आली, आणि पुन्हा तयारीला लागली..त्यासाऱ्या कष्टांचं फळ म्हणून आज तिचं ऑलिम्पिक पदक पक्कं झालं आहे.मात्र लवलिनाची जिद्द अशी की ती पूर्ण प्रयत्न करेल गोल्ड मेडलसाठी..
पॉझिटिव्ह मोड में रहना.. हा मंत्रच आहे तिचा.