आईपण ही प्रत्येक स्त्रीसाठी एक सुखद आणि तितकीच थकवणारी प्रक्रिया असते. मग ती स्त्री सामान्य असो किंवा असामान्य. आई होणे ही केवळ शारीरिक प्रक्रिया नाही तर स्त्री म्हणून हा प्रत्येकीचा एक भावनिक, मानसिक आणि सामाजिक प्रवास असतो. हा प्रवास आपण कशापद्धतीने निभावतो यातच स्त्री म्हणून आपला खरा कस लागतो. आपण सामान्य असल्याने आपल्यालाच अनेक अडचणी असतात आणि सेलिब्रिटींचे सगळे अगदी सहज-सुलभ असते असा आपला समज असतो. पण जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी काही गोष्टी या कधीच बदलत नाहीच याचा प्रत्यय आपल्याला काहीवेळा आल्याशिवाय राहत नाही. याचेच उदाहरण म्हणजे बॉलिवूडची धकधक गर्ल असलेली माधुरी दिक्षित हिचा आईपणाचा अनुभव (Madhuri Dixit Reveals She Was Told to Not to Dance After Motherhood).
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दिक्षित एक अशी अभिनेत्री आहे की आज वयाच्या पन्नाशीतही तिचे सौंदर्य थोडेही कमी झालेले नाही. अनेकींसाठी माधुरी आजही डान्स आयकॉन आहे, तर तिच्या स्माईलवर फिदा असणाऱ्यांची तर गणतीच होऊ शकत नाही. ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर गारुड निर्माण करणाऱ्यांपैकी एक असलेली माधुरी दिक्षित आज दोन मुलांची आई आहे. मात्र हा प्रवास तिच्यासाठी अजिबात सोपा नसल्याचे तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले.
माधुरी सांगते मला मुलगा झाल्यावर अनेकांनी मला आता डान्स कशाला करते, आता घरी बसून मुलाचा सांभाळ कर अशाप्रकारचे सल्ले दिले. मात्र माझ्यावर लोकांच्या या बोलण्याचा विशेष परीणाम झाला नाही. पुढे माधुरी म्हणते, आपण गृहीणींना अनेदा गृहीत धरतो. संसार करायलाच हवा मात्र लोक आपल्याबद्दल काय बोलतात याचा एका मर्यादेपर्यंतच विचार करावा. महिला म्हणून त्यांच्याही काही आकांक्षा, गरजा, भावना असू शकतात त्यामुळे ‘ऐकावे जनाचे, करावे मनाचे’ हे कायम लक्षात ठेवायला हवे असे माधुरी म्हणते. सध्या माधुरी झलक दिख ला जा या एका रिअॅलिटी डान्स शोमध्ये आपल्याला दिसते.