खरं सांगायचं तर बारावीची परीक्षा दिली आणि त्याच्यापुढे काय करायचे, कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे, हे काही माझे निश्चित ठरत नव्हते. मग माझे वडील नरेंद्र सोनवणे यांनी मला युपीएससी परिक्षेबाबत (UPSC) सांगितलं. त्यांनी स्वत: त्यासाठी प्रयत्न केले होते. पण वय बाद झाल्याने त्यांचं ते स्वप्न पुर्ण होऊ शकलं नव्हतं. त्यांनी परीक्षेची, या करिअरची माहिती दिल्यावर मी त्याबाबत आणखी शोध सुरू केला.. परीक्षेचं स्वरुप, परीक्षा पास झाल्यानंतर पुढे कशा स्वरुपाचं काम असणार हे सगळं वाचून माझं मत बनत गेलं आणि मग मी ही युपीएससी करायचं ठरवलं..
औरंगाबादची मानसी तिच्या या यशाबद्दल अतिशय आनंदाने पण तेवढ्याच संयमाने बोलत होती. आई- वडील दोघेही उच्चपदस्थ अधिकारी. त्यामुळे अभ्यास, करिअर या गोष्टींचे संस्कार लहानपणापासूनच तिच्यावर आणि तिच्या धाकट्या बहिणीवर होत होते.. अमूक क्षेत्रातच करिअर कर, असा आई- वडिलांचा हट्ट कधीच नव्हता. पण करिअरमध्ये दिशा दाखवण्याचं काम मात्र त्यांनी नक्कीच केलं.. मानसीचं १२ वी पर्यंतचं शिक्षण नाशिकच्या (Nasik) सेंट झेवियर्स शाळेत झालं. त्यानंतर वडीलांची बदली झाल्याने ते औरंगाबादला त्यांच्या मुळगावी आले. तोपर्यंत मानसीने युपीएससीची तयारी करायची हे फायनल झालं होतं. म्हणून मग तिने औरंगाबादच्या शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात बीएला प्रवेश घेतला. मधे काही काळ ती दिल्लीला जाऊन युपीएससीचे क्लासेस करून आली. पण त्यानंतर मात्र स्वअभ्यासावर तिने फोकस केला. कारण तुम्हीही कितीही चांंगले क्लासेस लावले तरी शेवटी तुम्ही स्वत:चं त्यात किती देता, यावर तुमचं यश अवलंबून असतं असं ती म्हणाली.
इंग्रजीवर फोकस हवाच...
मानसीचं सगळं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं. त्यामुळे इंग्रजी पक्कं असण्याचा नक्कीच अधिक फायदा झाला. कारण त्यामुळे वेगळाच आत्मविश्वास मिळतो, यावर मानसी ठाम आहे. त्यामुळे मराठी माध्यमातून शिकत असलात तरीही युपीएससीचं ध्येय असेल तर इंग्रजीकडे दुर्लक्ष करू नका. समजण्यासाइतकं आणि आत्मविश्वासाने बोलण्याइतकं इंग्रजी तुम्हाला यायलाच हवं, असं ती म्हणाली.
अभ्यासाचा स्ट्रेस वाढला की ती.....
मानसीचं फ्रेंड सर्कल खूपच मर्यादित होतं. फेसबूक, इन्स्टा किंवा इतर सोशल मिडिया तिने वापरलाच नाही. व्हॉट्सॲपवर कधी कधी ॲक्टीव्ह असायची पण खूपच मर्यादित वेळेसाठी. मग अशावेळी अभ्यासाचा कधी कधी खूप ताण यायचा. सकाळी ती सलग ७ ते ९ तास अभ्यास करायची. दुपारच्या सत्रात थोडा ब्रेक घेतला की संध्याकाळी पुन्हा अभ्यास सुरू. हा सगळा अभ्यासाचा ताण घालविण्यासाठी मग ती इतरांशी गप्पा मारण्यापेक्षा चित्रपट पहायची आणि स्ट्रेस फ्री व्हायची... एखादा चित्रपट पाहिला की पुन्हा दुसऱ्यादिवशी अभ्यासासाठी तयार... या काळात आपण खूप चित्रपट पाहिले, असंही तिने हसत हसत सांगितलं.