आसामच्या मीनाक्षी दासने एकटीने बाईकवरून ६४ देशांचा दौरा करून एक अनोखा विक्रम रचला. हा प्रवास फक्त तिच्या धाडसाची गोष्ट नाही तर महिला सक्षमीकरणाचंही उत्तम उदाहरण आहे. १७ डिसेंबर २०२३ रोजी गुवाहाटी येथून सुरू होऊन २२ डिसेंबर २०२४ रोजी संपणाऱ्या या प्रवासात मीनाक्षीने जगभरातील विविध देशांचा प्रवास केला. आपण एखादं स्वप्न पाहावं आणि ते पूर्ण करावं अशी ही धाडसी गोष्ट.
मीनाक्षीचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. व्हिसा समस्या, बाईकमधील तांत्रिक समस्या, धुळीचं वादळ आणि अपघात अशा अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं. पण मीनाक्षीने कधीही हार मानली नाही आणि या सर्व समस्यांना धैर्याने तोंड दिलं. अनेक देशांमधील लोकांकडून मिळालेल्या मदतीमुळे तिचा प्रवास सोपा झाला. मीनाक्षीने या दौऱ्याचं वर्णन एक अद्भुत अनुभव असं केलं आणि म्हणाली, "हा एक रोमांचक आणि खूप काही शिकवणारा अनुभव होता."
ज्येष्ठ आसामी पत्रकार नव ठाकुरिया यांना दिलेल्या खास मुलाखतीत तिनं आपला प्रवास मांडला.प्रवासातील आर्थिक समस्या हे मीनाक्षीसाठी आणखी एक मोठं आव्हान होतं. कोणत्याही मोठ्या प्रायोजकांशिवाय, मीनाक्षीने तिच्या वैयक्तिक बचतीचा, देणग्यांचा वापर करून आणि जमीन गहाण ठेवून हे मिशन पुढे नेलं. आसाम सरकारकडूनही मर्यादित मदत मिळाली, आसामच्या क्रीडा मंत्री नंदिता गारलोसा यांनी १ लाख रुपयांची देणगी दिली.मीनाक्षीचा एकूण प्रवास खर्च सुमारे २० लाख रुपये होता, परंतु तिच्या चिकाटीमुळे तिला हा कठीण प्रवास पूर्ण करण्यास मदत झाली.
मीनाक्षीने व्हिडीओ ब्लॉगद्वारे तिच्या प्रवासाच्या प्रत्येक गोष्टी सांगितल्या आहेत आणि भारतीय बायकिंग संस्कृतीबद्दल तिचे विचार देखील शेअर केले. आता या दौऱ्यानंतर, मीनाक्षी तिच्या कुटुंबाकडे परतली आहे आणि भविष्यात देशाच्या कानाकोपऱ्यात बाईकने प्रवास करण्याचा प्लॅन करत आहे. महिला सक्षमीकरणाचा संदेश पसरवण्याचं तिचं उद्दिष्ट आहे.